शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (15:45 IST)

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार? नाना पटोले म्हणाले….

Nana Patole
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार का, यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे नव संकल्प शिबीरातून परतताच पटोले आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
 
पटोले यांनी आजही घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस छुप्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला मदत करीत असल्याचा आरोप पटोले यांनी यापूर्वीच केला आहे. याबाबत त्यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. पटोले आज म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचे राजकारण करत आहे. सरकारसाठी समान कार्यक्रम आम्ही निश्चित केला. मात्र, आता अडीच वर्षांनंतर लक्षात येत आहे की, ज्या मुद्द्यांवर आम्ही सरकार बनवलं होते त्याचे उल्लंघन होत आहे. याद्वारे आमच्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचाच अपमान होत आहे. तो आम्ही कसा सहन करावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारण आणि भूमिकेबाबत आम्ही सोनियाजींसह पक्षश्रेष्टींकडे तक्रार केली आहे. त्याची योग्य ती दखल ते घेतील आणि त्याबाबत ठोस निर्णय होईल. येत्या काही दिवसातच त्याचे परिणाम दिसतील, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद आणि असमन्वयाची चर्चा सुरू झाली आहे.