सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By

गुड टच, बॅड टच लहान मुलांना कसा शिकवावा? पालकांची भूमिका काय असावी?

Parenting tips
ठाण्यामध्ये नुकत्याच घडलेल्या मुलांच्या लैंगिक छळाच्या बातमीने पालकांमध्ये शाळांमध्ये सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
शाळेमध्ये Good Touch- Bad Touch संदर्भात मुलांबरोबर उपक्रम आणि चर्चासत्र झाल्यामुळे बऱ्यापैकी मुलांना याची जाणीव होती आणि त्यामुळे निदान ते पालकांपर्यंत घडलेला प्रसंग पोहोचवू शकले आणि त्यानंतर त्यावर कायद्याने देखील कारवाई करण्यात आली.
 
हा आणि यासारखे अनेक प्रसंग आपल्या वाचनात ऐकण्यात येतात. पालक म्हणून मुलांची काळजी आणि त्या संदर्भातली आपली भूमिका या संदर्भात मनात शेकडो प्रश्न निर्माण होतात.
 
सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श, मुलांची त्याबाबत समज आणि त्याबाबतची पालकांची भूमिका या संदर्भात अधिक विस्ताराने बोलूयात.
 
बऱ्याचदा मुलांची सुरक्षितता या विषयावर बोलत असताना मुलांशी नक्की काय बोलायचं? आपण अशा माहितीने मुलांना घाबरवून टाकणार नाही ना? कोणी तुला त्रास देतंय असं वाटलं तर त्या प्रसंगातून तुला बाहेर कसं पडता येईल? या सगळ्या संदर्भामध्ये मुलांची नक्की काय आणि कसं बोलायचं? असे प्रश्न पालकांना पडलेले असतात.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनातील याबाबतची पालकांची मते आणि त्यांच्या मनातल्या वेगवेगळ्या भीती इथे नमूद कराव्याशा वाटतात.
 
माझ्या मुला किंवा मुलीच्या बाबतीत तर लैंगिक किंवा शारीरिक छळ यासारखं काही घडत नसेल ना?
असे काही घडत असल्यास तिला किंवा त्याला जे चालू आहे ते चूक आहे याची जाणीव होईल ना?
अशा पेच प्रसंगात त्याला किंवा तिला तिथून पळ काढता येईल का ?
अशा पेच प्रसंगात माझे पाल्य माझ्यापर्यंत पोहोचून मला ही अडचण सांगेल का?
जर माझ्या पाल्याने आई-वडील खेरीज इतर कोण्या मोठ्या माणसाला हे सांगितले तर ते आई वडील
म्हणून आमच्याबाबत काय विचार करतील?
असे काही घडल्यानंतर इतर लोक किंवा समाज माझ्या मुलीला किंवा मुलीला Judge करतील का?
 
हे विचार वाचले की पालकांचे प्रश्न किती ज्वलंत आहेत आणि परिस्थितीचे गांभीर्य किती आहे याची जाणीव होते. त्यात पालकांचाही काही दोष नाही.
 
आजची पालकांची पिढी तशा अर्थाने हे प्रश्न deal करणारी नवीनच पिढी आहे कारण त्यांच्या बालपणीचे प्रश्न काही औरच होते. टेक्नॉलॉजी -त्याचे दुष्परिणाम, मीडिया च्या अयोग्य वापराचे दुष्परिणाम, मानसिक अस्वस्थता आणि त्यातून निर्माण होणारे वर्तणुकी संदर्भातले प्रश्न या सगळ्यांनी इतकं टोकाचं वळण घेताना हे पालक पहिल्यांदाच अनुभवत आहेत.
 
त्यातून आपलं पालकत्व देखील आज नवीनच आव्हानांना तोंड देत आहे. दोन्ही पालक working असणं, काम संपेल पण कामाचं ताण नाही की बहुधा प्रत्येकच घरातली परिस्थिती, स्पर्धात्मक अभ्यासाच्या धोरणामुळे मिळालेला वेळ जास्तीत जास्त अभ्यास, गृहपाठ यांच्यासाठी वापरला जाणे, मीच किती करायचं असा प्रश्न पडलेला प्रत्येक पालक- मुलांची सुरक्षितता, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य यासाठी धडपडताना दिसतो.
 
अर्थातच कित्येकदा या सगळ्याचा परिणाम मुलांच्या वागण्यात सुद्धा डोकावतो. कित्येकदा मुलं आपल्यासमोर असतात पण सुसंवादाच्या कमी झालेल्या frequencies मुळे की त्यांच्या एका जगात आणि पालक म्हणून आपण आपल्या. त्यामुळे Safe- Unsafe Touch, Well- being यासारख्या विषयांवर संवाद होणे कठीणच.
 
पण तरीही अनुभवातून हे सांगायला नक्कीच आवडेल की, मुलांबरोबरच्या विसंवादामुळे किंवा मुलांना पालक काय म्हणतील याची भीती वाटल्यामुळे अनेकदा लैंगिक छळाचे - अयोग्य स्पर्शासंदर्भातील, प्रश्न कित्येक मुलं घरी सांगत नाहीत. किंबहुना त्याबाबत अनेकदा ते स्वतःलाच दोष देत राहतात.
 
त्यानंतर हे प्रसंग उघडकीस आल्यानंतर सुद्धा कायद्याच्या कारवाईनंतर मुलांना मानसिकरित्या या धक्क्यातून बाहेर काढणं त्यांचा आत्मविश्वास ताळ्यावर आणणं आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य पुन्हा वसवणे या एका दिव्य प्रवासातून समुपदेशक, पालक आणि त्या मुलाला किंवा मुलीला जावे लागते.
 
थोडक्यात निखळ संवाद, आपल्या मुलांसोबत परखड पण मैत्रीपूर्ण नातं, भीती न वाटता मुलांना त्यांच्या सुरक्षिततेची जाणीव करून देणे हे या प्रश्नावरचे निश्चित उपाय ठरतील.
 
कधी पालक म्हणून मुलांची सुरक्षितता या संदर्भातले Red Flag ओळखूया.
 
1. मुलांनी अचानक शांत होणे
 
2. संवादामध्ये , खेळण्यांमध्ये मुलांचे हसणे- खिदळणे -दंगा करणे अचानक थांबणे किंवा कमी होणे
 
3. काही लोक विशिष्ट व्यक्ती -व्हॅन मधले प्रसंग मुलांनी टाळण्याचा प्रयत्न करणे. त्याबाबत प्रश्न विचारले असता टाळण्याचा प्रयत्न करणे. अशा प्रसंगी नजरेला नजर न मिळवू शकणे.
 
4. आई-वडिलांनी येता जाता मुलांना जवळ घेतले असता, मिठी मारली असता- त्यातही मुलांना अस्वस्थ वाटणे
 
5. आहार, झोप , अभ्यास या किंवा यांपैकी एका गोष्टीवर जाणवेल इतका परिणाम होणे
 
6. छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये सुद्धा, तू बरोबर आहेस ना? तिथे अजून कोण कोण असणार आहे? मी नाही आले/ आलो तर चालणार नाही का? असे सतत प्रश्न विचारणे.
 
असे किंवा यापैकी काहीही जाणवल्यास मुलांबरोबर याबाबत बोलायला सुरुवात करूयात. काही प्रॉब्लेम नाही ना? तुला कोणी काही बोलले का? तुला माहिती आहे ना की काही अडचण असेल तर मी तुला मदत करू शकते किंवा शकतो. असे मुद्दे बोलल्यानंतर मुलांच्या प्रतिक्रियेचे निरीक्षण करूयात.
 
कित्येकदा याबाबत सांगावे की नाही अशी मुलांच्या मनात घालमेल सुरू असते. कधी कधी आई-बाबांपेक्षाही- मावशी ,काका, मामा ,आजी आजोबा यांच्याशी मुले अधिक मोकळेपणाने बोलायला तयार असतात. असे असल्यास माझा मुलगा किंवा मुलगी माझ्याशी बोलायला तयार नाही अशा विचारांनी खच्ची होण्यापेक्षा या इतर support sysytem ची मदत नक्की घेऊयात.
 
हळूहळू मुलं आपल्या प्रतिक्रियांचा अंदाज घेऊन या विषयावर बोलायला तयार होतात.
 
काही वर्षांपूर्वी, अशाच एका प्रसंगांमध्ये अंतरा ((वय सात वर्षे) आईच्या मैत्रिणीशी ( मावशी) - शारीरिक छळाबद्दल स्वतःच्या वर्ग मैत्रिणीचा संदर्भ देऊन -तिच्या बाबतीमध्ये असं होत असेल तर तिने काय करावे? अशा पद्धतीने आडून आडून प्रश्न विचारत होती.
 
या प्रसंगातील आईच्या मैत्रिणीला या गोष्टीची जाणीव झाल्यावर तिने एकीकडे अंतराला काय करावे ह्याचा सल्ला देत असताना, शांतपणे अंतराच्या आईला या प्रश्नाची जाणीव करून दिली. यात कुठलाही तणाव जाणवू न देता या मावशीने सुरक्षित स्पर्श ,गरज पडल्यास मदत घेणे, अशा प्रसंगी स्वतःला दोष न देणे, अशा संदर्भात गप्पा मारल्यानंतर अंतराला आपल्या आई-वडिलांची याविषयी बोलण्याचा विश्वास वाटायला लागला .
 
पुढे याबाबत आई-वडिलांनी जागरूक होऊन, संबंधित इसमाला (तो कुटुंबाशी संलग्न व्यक्ती होता) घरात येण्यापासून बंदी केली , अंतराला याचा ताण येणार नाही अशा पद्धतीने सदर इसमावर कारवाई देखील केली.
 
आता या संदर्भात पालक म्हणून काय करावे हे बघूयात. हे आवर्जून करूया:
 
1. मुलांशी रोजचा सुसंवाद
मुलांचा रोजचा दिवस कसा होता- त्यावर शक्यतो रात्री जेवताना जेवणानंतर, झोपताना, क्लास किंवा खेळासाठी सोडायला जाताना- गप्पा मारूयात.
 
त्यावेळेस मुलं जे काही सांगतील ते तुमच्या दृष्टीने कितीही रटाळवणे किंवा निरोपयोगी असेल तरी त्यात रस घेऊन ऐकूया.
 
त्याच वेळेस तू नाही ना भांडलास, मार्क किती मिळाले, डबा का नाही खाल्ला, असे टोचले प्रश्न विचारणे टाळूयात. असं केल्यास कितीदा दिवसभरात मुलं सांगण्यासारखं काही झालंच नाही असं उत्तर सर्रास देताना दिसतात. अशी टाळाटाळ आणि अशी उत्तरे येत असतील तर आपणच आपल्या प्रश्नांना आणि प्रतिक्रियांना पालक म्हणून आरसा दाखवूयात.
2. शिस्त लावण्यासाठी किंवा राग आल्यानंतर मुलांना मारणे- योग्य का अयोग्य?
कुठल्याही प्रसंगात जरी राग आला तरी आपल्या मुलाची किंवा मुलीची त्याबाबतची प्रतिक्रिया इतरांना शारीरिकरित्या दुखावणे- मारणे, चिमटा काढणे, ढकलणे अशी नाही ना याची पडताळणी करूया.
 
यासाठी मुळात पालक म्हणून आपले Control mechanisms - मारणे, खेकसणे, झिडकारणे यातील काही नाही ना हे पडताळून बघूया.
 
ज्या गोष्टी किंवा प्रतिक्रिया माझे आई-वडील सर्रासपणे वापरतात त्या इतरांबरोबर वापरताना मला मूळ म्हणून त्यात काहीही चूक वाटत नाही. इतकेच नाही तर इतर कोणी माझ्याबरोबर असे काही वागले तर मला त्यात काहीही गैर वाटत नाही.
 
3. मुलांचे प्रश्न थांबवू नका
मुलांना त्यांनी प्रश्न विचारल्यावर गप्प करणे, दटावणे- टाळूया. मुलांच्या प्रश्नाला सतत mentally available कठीण असू शकते. पण एक दोन मिनिटांनी बोलूयात हा. माझ्या हातातले काम संपवून बोलूयात.
 
गाडीवर असताना किंवा गाडीत असताना बोलूयात- असे सांगून त्यासाठी वेळ देण्याची इच्छा आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकतो.
 
4. भावनांच्या मदतीने मुलांना सुरक्षित असुरक्षित स्पर्श म्हणजे काय ते समजावूया
आधी मुलांना छान वाटणारा- Good touch- ज्यात तुला समोरच्या व्यक्तीकडून मिळणारे प्रेम, आनंद, भावनेतील ऊब जाणवते- ते स्पष्ट करून उदाहरणातून सांगूयात.
 
जसे की आजी जवळ घेते, आजोबा शाब्बासकी देतात, बाबा गुदगुल्या करून झोपेतून उठवतो, आई खूप वेळाने भेटल्यावर घट्ट मिठी मारते, ह्या सगळ्या स्पर्शातून मुलांना आनंद, प्रेम जाणवते हे मुलांना ओळखायला शिकवूयात.
तसेच अप्रिय स्पर्श ज्यातून मला घृणा वाटते, अस्वस्थ , नको नकोसे वाटते, ते देखील उदाहरणादाखल मुलां शी बोलूयात. जसे की कोणी थट्टा म्हणून केस ओढणे, फटका मारणे, ढकलणे. कपड्यांच्या आत हात घालणे असे वागले तर - तुला मनात राग, चिडचिड, तिटकारा निर्माण होणे सहाजिक आहे, हे काल्पनिक प्रसंगातून अथवा वास्तविक प्रसंगांच्या आधारे मुलांना सांगूया.
 
तुला असुरक्षित वाटणाऱ्या स्पर्शापासून लांब जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, ती व्यक्ती अगदी कोणीही असले तरी सुद्धा- हे नक्की सांगूया.
 
5. अपवाद स्पष्टपणे सांगूयात
आई वडील , कुटुंबातील लोक किंवा काही लोक ( Doctor, Teacher )अपवादाच्या प्रसंगी तुला स्पर्श करू शकतात हे उदाहरणातून सांगावे.
 
जसे की आंघोळ घालताना, घाईच्या वेळेस आवरून देताना, डॉक्टर कडे गेल्यावर तपासणी करताना, इंजेक्शन देताना, तुला स्पर्श केला जाऊ शकतो.
6. स्वावलंबन ही स्व-सुरक्षितत्तेची महत्वाची पायरी
आंघोळ करणे, कपडे बदलणे या कृतींमध्ये लवकरात लवकर मुलांना स्वावलंबी बनवूया.
 
माझ्या मुलाला/ मुलीला सतत कशी प्रत्येक गोष्टीत मीच लागते/ लागतो- अशी हवीहवीशी वाटणारी भावना बाजूला ठेवून- मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना स्वावलंबी बनवूया.
 
7. Safe Circle ची संकल्पना मुलांना शिकवणे
कोणी इजा पोहोचवली असता, घाबरून न जाता तिथून पळ काढणे, कांगावा करणे जबाबदार मोठ्या व्यक्तीला approach करणे ह्याबाबत काल्पनिक उदाहरणे देऊन मुलांना काय करावे हे समजावून सांगूयात.
 
स्वतःच्या संरक्षणासाठी आरडाओरडा करणे, चावणे, हात उचलणे, तक्रार करणे या उपायांबद्दल पुन्हा पुन्हा बोलूयात.
 
पुढे जाऊन, Safe Circle- ची संकल्पना मुलांना समजावून, मुलांच्या बरोबरीने कागदावर मुलांसाठीचे - Safe Circle- चितारूया. Safe Circle- म्हणजे अशा व्यक्तींची यादी करणे -ज्यांच्यावर आपण तुझ्या सुरक्षिततेसाठी विश्वास ठेवू शकतो.
 
8. कठीण प्रसंगी काय करता येऊ शकेल त्याबाबत चर्चा
सुरक्षितते संदर्भात आई –बाबा, कुटुंबातील लोक यांचा दूरध्वनी क्रमांक पाठ असणे, गर्दीत सुरक्षित वाटू शकेल अशा लोकांना शोधून आपल्या अडचणी बद्दल सांगणे याबाबतीत मुलांना काही काल्पनिक प्रश्न देऊन तू अशावेळी काय करशील याबाबतीत चर्चा करूयात.
 
9. Positive Strokes, सुरक्षित स्पर्श यापासून मुलांना वंचित न ठेवणे
स्पर्श ही प्रेम व्यक्त करण्याची सहज सोपी साधी पद्धत आहे. रोजच्या जीवनात सुद्धा मुलांना जवळ घेणे, थोपटणे, गुदगुल्या करणे, मिठी मारणे ह्या सगळ्यातून सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शामधला फरक जाणवणे खूप सोपे होते.
 
अर्थात, मुलांना सतत जवळ घेणे, चोंबाळणे, जात-येता पाप्या घेणे, हा अतिरेक टाळावा. अर्थात या संदर्भात कोणाबरोबर तू हे करू शकतेस/ शकतोस याबाबतीत चर्चा महत्त्वाचीच.
 
10. सतत त्रस्त किंवा पॅनिक होणे टाळावे
छोट्या छोट्या रोजच्या प्रसंगांमध्ये जसे की काही हरवणे, मोडणे, उशीर होणे अशा प्रसंगांमध्ये पालक म्हणून मुलांसमोर आपण त्रस्त होणे, Panic होणे, प्रमाणाबाहेर चिडणे हे टाळता येते का बघूयात.
 
यातून कोणताही प्रश्न किंवा अडचण सोडवण्याची आपली क्षमता आणि मानसिक कुवत मुलांपर्यंत पोहोचते. माझा प्रश्न माझे पालक समजून घेऊ शकतील असा विश्वास मुलांना वाटतो.
 
11. लोक काय म्हणतील ही भीती
लोक काय म्हणतील किंवा लोकांच्या प्रतिक्रियेसाठी तू काहीतरी कर यापेक्षा तुझ्या चांगल्यासाठी तुझ्या इच्छेसाठी तुला पटते म्हणून गोष्टी करणे त्यात बदल करणे याबाबत आपण मुलांची बोलूयात.
 
ह्यातून मुले तुमच्यापासून महत्त्वाच्या गोष्टी लपवणे टाळू शकतील.
 
12. मुलांबरोबरचे खेळ
खेळ आणि एकत्र आनंदाचे प्रसंग निर्माण करणे ह्या दोन गोष्टी मुलांमध्ये पालकांबद्दल अधिक विश्वास निर्माण करणारे आहेत. त्यामुळे रोज मुलांबरोबर जेवणे, अभ्यास करणे, सोडणे-आणणे, एकत्र TV बघणे- हे सोडून एखादा तरी खेळ, Activity- एकत्र केली जात आहे ना - हे बघूया.
 
13. आई आणि वडिलांचा - शक्य तितका समान सहभाग
पालकत्वामध्ये हे सगळं आईबरोबरच बोललं जायला पाहिजे असं मुळीच नाही. किंबहुना बऱ्याचदा मुलींना बाबा बरोबर/ वडिलांबरोबर खेळणे-गप्पा मारणे, आणि मुलग्यांना आईबरोबर बोलताना सहजता वाटणे सहाजिक असू शकते.
 
त्यामुळे आई आणि वडील यांच्यामध्ये मुलांशी खेळणे, त्यांचा अभ्यास, जबाबदाऱ्या ह्याचे बऱ्यापैकी समान विभाजन असावे.
 
14. शिक्षक, समुपदेशक , डॉक्टर यांची मदत घेणे
या संदर्भात कुठलीही अडचण जाणवली असता पालक म्हणून शिक्षक समुपदेशक यांची मदत घेणे टाळायला नको.
 
ही सर्व काळजी घेतली असता आत्ताच्या कठीण वाटणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मुलं आपल्याबरोबर विश्वासानी आणि मोकळेपणाने संवाद साधू शकतील.
 
(लेखिका जिज्ञासा कन्सल्टिंग या संस्थेच्या सहसंस्थापक असून मुले पालक आणि शाळांबरोबर कार्यरत असतात.)
 
Published By- Priya Dixit