गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Modified: सोमवार, 21 जुलै 2014 (15:31 IST)

केदारनाथ : मृत्यूलोकात डोकावण्याचे व्दार

अनेक युगांपासून भारतीयांचे श्रध्दास्थान असणारी 'केदारनाथ' यात्रा एकदा तरी घडलीच पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. भक्तगणांबरोबरच ऋषि-मुनी आणि साधकांना ही यात्रा आकर्षित करते आहे. हिमालयात नैसर्गिक वातावरणात असलेले केदारनाथ महत्वाचे धार्मिक तीर्थस्थळ आहे. येथे बघाल तिकडे बर्फच बर्फ असतो. 
 
बर्फाच्या नजीकच अत्यंत मादक सुगंध देणारे सिरंगा हे आगळे फूल या‍च ठिकाणी आढळते. हे संपताच गवतातून मार्ग निघतो ‍आणि याच्यानंतर केदारनाथचा हिमनग आणि त्यातून दगडांना छेद देत फेसाळत, तुषार उडवत वाहणारी मंदाकिनी नजरेस पडते. केदारनाथाचे मंदिर 6 हजार 940 मीटर उंच हिमशिखरावर आहे. जसजसे चढण चढत जाऊन उंची गाठत जातो तसा स्वर्गीय अनुभव येतो. उंचीवर मं‍दिराचे दर्शन होताच मन भारावून जाते. वरून खाली पाहिल्यास स्वर्गातील देवतांचे मृत्युलोकात डोकावण्याचे व्दार असल्याचा भास होतो. 
 
ऋषिकेशपासून 223 किमीच्या अंतरावर केदारनाथ आहे. शेवटच्या दहा किलोमीटरमध्ये म्हणजे गौरीकुंडापासून केदारनाथचे अंतर चालत अथवा घोडे, पालखीतून पार करावे लागते. राणीखेत, कर्णप्रयाग, चमोली, ऊखीमठ, गुप्त काशी येथूनही केदारनाथला जाण्यासाठी मार्ग आहेत. 
 
हे उत्तराखंडातील सर्वात मोठे शंकराचे मंदिर आहे. दगड आणि मोठे रंगाचे मोठे शिलाखंड जोडून याची उभारणी झाली आहे. सहा फूट उंच चबूत-यावर मंदिर उभारण्यात आले आहे. याचे गर्भगृह अतिप्राचीन आहे. 
 
मंदिराच्या गर्भगृहात चार मोठे दगडी स्तंभ आहेत. येथूनच प्रदक्षिणा घातली जाते. आतमधील भव्य सभामंडप लक्ष वेधून घेतो. येथे आठ पुरुष प्रमाण आकर्षक मूर्ती आहेत. मंदिराच्या मागे दगडांच्या ढिगा-यानजीक भगवान इशानाचे मंदिर आहे. या ढिगा-यामागे शंकराचार्यांचे समाधीस्थळ आहे. 
 
येथून जवळपास 1 किमी अंतरावरील खोल आणि निळ्या रंगाचे चौर सरोवर पर्यटकांना आकर्षित करते. याठिकाणी महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या असून याला गांधी स्मारकही म्हटले जाते.
 
येथून पाच किमी अंतरावर वासुकी ताल हे सुंदर ठिकाण आहे. पारदर्शी पाणी आणि त्यामध्ये हिमखंड उतरतानाचे दृश्य होळे दिपवणारे असते. याशिवाय गुग्गुल कुंड, भीम गुहा तसेच भीमशिला ही देखील दर्शनीय स्थळे आहेत. येथून नजीकच भैरवनाथाचे मंदीर आहे. केदारनाथाचे पट उघडते आणि बंद होते, त्यादिवशीच याठिकाणी पूजा होते. उत्तराखंडात भैरवाचे स्थशन क्षेत्रपाल अथवा भूमिदेवाच्या रूपात महत्वपूर्ण मानले जाते. 
 
सोनप्रयागवरून 5 किमी पुढे आणि केदारनाथच्या 6 किमी अगोदर येणारे महत्वपूर्ण तीर्थस्थळ आहे. हे 1982 मीटर उंच आहे. गरम पाणी आणि गार पाण्‍याचे कुंड येथे पहावयास मिळतील. येथे अलीकडच्या काळातील गौरीचे मंदिर आहे. शंकराला मिळवण्यासाठी याठिकाणी पार्वतीने तपश्चर्या केल्याचे मानले जाते. नजीकच राधाकृष्ण मंदीर आहे. 
 
केदारनाथपासून 19 किमी अलीकडे गंगौत्री, केदार सोनप्रयागच्या मार्गावर त्रियुगी नारायण नावाचे प्रसिद्ध धार्मिकस्थळ आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवान नारायणाची सुंदर मूर्ती आहे. भू-देवी तसेच लक्ष्मीच्याही देखण्या मूर्ती याठिकाणी पहावयास मिळतात. ब्रह्म कुंड, रुद्र कुंड आणि सरस्वती कुंड अशी काही कुंडही येथे आहेत. याठिकाणी सदैव दिवा सुरू असतो. 
 
याच अग्निला साक्षी ठेऊन शंकर आणि पार्वती यांनी लग्न केल्याचे पुराणात आहे. पार्वतीचे माहेर अर्थात हिमालय नरेशचे निवास हेच असल्याचे सांगितले जाते. 
 
भारतीय सैन्याकडून व्यवस्था
दिवाळीच्या दुस-या दिवशी पाडव्याला मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. येथून सहा महिने दिवा तेवत रहतो. बंद करताना भारतीय सैन्याकडून भक्तगणांना प्रसाद दिला जातो. यानंतर होटेल, लॉज, धर्मशाळाही बंद होतात. 
 
मंदीराचे पुजारी पुजाविधीने व्दार बंद करून दंडासहीत देवाचे पुर्ण साहित्य डोंगराच्या खाली ऊखीमठमध्ये आणतात. सैन्याचे जवान हे साहित्य सवाद्य मिरवणूकीने खाली आणतात. त्यांनंतर मे महिन्यामध्ये केदारनाथाचे व्दार उघडते आणि भक्तगणांची गर्दी सुरू होते.