गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. तीर्थ-क्षेत्र
Written By वेबदुनिया|

श्रीक्षेत्र पहारपूर

WD
बंगालमध्ये असणार्‍या आणि आता बांगला देशात गेलेल्या पहारपूर येथील बौद्धविहाराचे अवशेष तेथे एकेकाळी होत असलेल धा‍र्मिक संपन्नतेची कल्पना देणारे आहेत. येथील सोमपुरा विहार 12 व्या शतकापर्यंत धार्मिक पंडित्य आणि भिक्षूंच्या गजबजाटाने नजरेत भरत असे. सातव्या शतकापासून बंगालमध्ये पसरलेल्या महायान बौद्ध शाखेची भरभराट या केंद्रातून प्रत्ययास येत असे.

धरमपाल (770 ते 810) या राजाच्या कारकिर्दीत या विहाराची निर्मिती झाली असावी. हे ठिकाण आजच्या जमालगंजपासून 5 कि.मी. आहे. एकंदर 11 हेक्टर जागेवर हा विस्तार होता. या विहाराच्या सभोवार 5 मीटर उंचीची भिंत होती. विहाराच्या मधोमध एक मोठा चौरस सभामंडप, उत्तरेला 45 आणि बाकी तिन्ही दिशांना प्रत्येकी 44 याप्रमाणे एकंदर 177 कक्ष, जिथे एकेक भिक्षू राहात असे, अशी रचना होती.

या रेखीव रचनेवर कंबोडिया आणि जावा येथील बौद्ध शिल्पशास्त्राची छाप होती. या विस्तारावरून तेथे धर्मसभा, धन-धारणा वगैरे धार्मिक कार्यक्रम किती भव्यतेने होत असतील याची कल्पना करता येते. कालांतराने बौद्ध धर्माची पीछेहाट होत गेली. केंद्र ओस पडू लागले. ढासळत गेले आणि दुर्लक्षित राहिले.

विसाव्या शतकात तेथे उत्खनन सुरू झाले. त्यात विविध देवतांच्या पाषाणमूर्ती, भांडी, नाणी ङ्कजकूर खोदलेल्या आणि नक्षी खोदलेल्या विटा इत्यादी वस्तू सापडल्या. त्यांचा संग्रह जपण्यासाठी 1956-57 मध्ये एक वस्तुसंग्रहालय तयार झाले. हिमालयापासून बंगालच्या उपसागरार्पतच पट्टय़ातील सर्वात मोठ्या विहाराचे अवशेष या उत्खननातून समोर आले आहेत. 1985 मध्ये या स्थानाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला. पहारपूर हे बौद्ध धर्मियांचे पुण्यक्षेत्र मानले जाते.

म.अ. खाडिलकर