नवस पूर्ण करणारी श्री मनसादेवी
मनसादेवीचे मंदिर चंदीगढ (पंजाब) जवळ मनीमाजरा या ठिकाणी आहे. हे एक प्रमुख शक्तिपीठ आहे. येथे सतीचे मस्तक पडले. चैत्र आणि नवरात्र काळात येथे मोठा उत्सव होतो. मोठी जत्रा भरते. मनीमाजराचा राजा गोपालसिंह याने सन 1868 चैत्र शुक्लपक्ष अष्टमीला या मंदिराचे बांधकाम सुरू केले आणि सन 1872 शुक्ल अष्टमी आश्विनला मंदिर पूर्ण झाले. या मंदिराचे बांधकाम मुस्लीम कारागिरांनी केले.
मंदिरात दुर्गासप्तशती, रामायण, कृष्णलीलामधील काही चित्रे आहेत. मंदिरात महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तीन पिंडी आहेत. प्रदक्षिणा करताना आपल्याला वैष्णोदेवी, कालीदेवी, हनुमान, गणेश मंदिराचेही दर्शन घडते. या मंदिराजवळच पटियालाचे राजे यांनी स्थापलेले मनसादेवी मंदिर आहे. दोन्ही ठिकाणाचे पुजारी राजपुरोहित आहेत. त्यांना राजाश्रय आहे. पंडित ज्वालाप्रसाद यांचे अध्यक्षतेखाली मंदिराचे कामकाज चालते. येथे दिवस-रात्र अन्नछत्र चालविले जाते.
जनता अन्नक्षेत्र हरियाणा व्यापारी मंडळ व ग्रेन मार्केट व्यापारी मंडळ चालविते. विविध सामाजिक संस्था, सेवक दल, कार्यकर्ते यांचाही सहयोग या मंदिराच्या कामकाजासाठी झालेला आहे. मंदिर काहीसे गुरुद्वारापद्धतीचे, थोडी मोगल बांधकामाची छाप असलेले दिसते.
मनसादेवीच अनेक कथा आहेत. मोगल सम्राट अकबर येथील लोकांकडून धान्य वसूल करीत असे. एकदा येथील लोकांना, जहागीरदारांना दुष्काळामुळे धान्यकर देता आला नाही. अकबराने बर्याच लोकांना कैद केले. धान्यकराची सक्ती केली तेव्हा देवीच्या एका भक्तीने जो कवी होता त्याचे नाव गरीबदास होते.
त्याने देवीची पूजा केली, यज्ञ केला. देवी प्रसन्न झाली. देवीने गरीबदासाची इच्छा पूर्ण केली व सर्व लोक, जहागीरदार यांना कैदेतून मुक्त केले. अकबराने धान्यकर वसूल केला नाही. मनातील इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणजे मनसादेवी असे नाव या देवीला लोकांनी दिले.
पटियालाचे राजे देवीभक्त होते. स्वप्नात देवीने राजाला दर्शन देऊन मंदिर निर्माण करण्यास सांगितले. राजाने देवीची आज्ञा मानून मोठे मंदिर बांधले. पटियाला येथे महाल तसेच भव्य विशाल मंदिर आहे. या मंदिराला राजाश्रय आहे. भरपूर उत्पन्न असल्याने भाविकांसाठी येथे अन्नछत्र चालविले जाते.
मनसादेवी मंदिराला भारतातून सर्व राज्यातील भाविक नवरात्रात येतात. नवस, इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून मनसादेवी प्रसिद्ध आहे. येथे नैनादेवी मंदिरा (हिमाचल प्रदेश भाकरा नानगल आनंदपूर) प्रमाणे भाविक सोने, चांदीचे दागिने, वस्तू देवीला अर्पण करतात.
जगदीशचंद्र कुलकर्णी