शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By

पांडेश्वर - शिवलिंग, शिल्प व वास्तुरचना

श्री क्षेत्र जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर पर्यटक सासवड किंवा मोरगाव सारख्या मुख्य रस्त्यावरील मंदिराकडे वळतात, परंतु थोड्याश्या आडवाटेने गेल्यास दोन सहस्त्रांमधील वास्तुकला पहावयास मिळते. जेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे, महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात' अशी लोकधारणा आहे .
 
या मंदिराला गौरवशाली वारसा आहे या मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर,  दगडी मुखमंडप, नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या, मराठा कालीन भित्तीचित्रे, रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात. भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे.४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते.मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर,उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे .विटांच्या या प्राचीन वस्तूला चौथ्या शतकात आकार मिळाला असावा तर पुढील जोडकाम सतराव्या किंवा अठराव्या शतकात झाले असावे.दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत.सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने,प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक, भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.