शुक्रवार, 18 जुलै 2025
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

शिल्पकृतींनी नटलेले यवतेश्वर मंदिर

MH Govt
MH GOVT
'भुलेश्वर' हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठीकाण महादेवांच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिध्द आहे. मंदिराचे बांधकाम १३व्या शतकातले असुन भिंतीवरील कोरीवकाम व मुर्तीकाम अद्वीतीय आहे. लढाईच्या काळात बर्‍याच मूर्तींचे नुकसान झाले होते. गणपतीची मुर्ती येथे स्त्री रूपात आहे. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फक्त पुजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. श्रावणात व महाशिवरातत्रीला येथे खास गर्दी होते.

पुणे- सोलापूर रस्त्यावर यवतच्या अलीकडे १० कि.मी. अंतरावर उत्कृष्ट शिल्पकृतींनी नटलेले यवतेश्वराचे मंदिर आहे. यवतेश्वर महादेव हा परिसरात भुलेश्वर नावाने ओळखल जातो. सासवडहूनही माळशिरसमार्गे भुलेश्वर मंदिराकडे जाता येते. तेराव्या शतकात महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली. त्याच दरम्यान भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे.

सह्याद्रीच्या रांगेत भुलेश्वर मंदिर आहे. उत्कृष्‍ट शिल्पकृतीचा नमुना येथे पाहावयास मिळतो. मंदिर अतिशय रेखीव आहे. पूर्वी मूळ मंदिराच्या बाहेर नंदीचा स्वतंत्र मंडप होता. मात्र १८ व्या शतकात मंदिराचा जीर्णेद्धार झाला. तेव्हा मंदिर व नंदी एकाच छताखाली आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरच्या भिंतीवर कोरलेले देवतांचे शिल्पे होय. तसेच मुख्य सभामंडपातील भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती आदी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथानकशिल्प अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तीमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत.

श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने यात्रेचे स्वरूप येत असते. मुंबई- पुणे येथील पर्यटक येथे भटकंतीस मोठ्या संख्येने येतात.