श्रावण विशेष : मंगळागौर आणि त्याच्या पारंपरिक खेळाबद्दल जाणून घेऊ या..
मंगळागौर चा सण हिंदू धर्मातील एक व्रत कैवल्य आहे. मंगळागौरीची पूजा श्रावण महिन्याचा प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने लग्नानंतर पहिल्या 5 वर्षे करायची असते. 5 वर्षानंतर या मंगळागौरीचे उद्यापन करून या व्रताची सांगता केली जाते. आई वडिलांना वाण देण्याचे महत्त्व आहे. ही पूजा मंगळागौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा केली जाते. पूजेसाठी वेगवेगळ्या झाडांची पाने व फुले वाहिले जातात. अर्जुन सादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दूर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती ही सर्व पाने वाहिली जातात. सर्व काही मंगल होवो घरात सुख संपन्नता नांदो, गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून सर्व काही मंगळदायी होवो. या साठी ही पूजा केली जाते. या दिवशी लग्न झालेल्या नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्र पूजा केली जाते. ही पूजा केल्यावर मौन राहून काही ही न बोलता जेवण करतात. संध्याकाळी आरती केली जाते. रात्री जागरण केले जाते आणि खेळ खेळले जातात. या खेळामध्ये परंपरागत गाणी म्हणतात. पिंगा गं बाई पिंगा, लाट्या बाई लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं या सारखी गाणी म्हणतात. नऊवारी लुगडं नेसून नाकात नथ घालून, पारंपरिक दागिने घालून पारंपरिक पद्धतीने मंगळागौर साजरी केली जाते. या दिवशी सवाष्ण स्त्रियांना घरी बोलावून हळदी-कुंकू समारंभ केला जातो.
मंगळागौरीचे पारंपरिक खेळ :
मंगळागौरीला पारंपरिक खेळ खेळले जाते. या खेळाचा मुख्य हेतू आपल्या संस्कृतीची ओळख या नव्या पिढीला झाली पाहिजे. तसेच शरीराचा व्यायाम देखील व्हायला हवा. हे खेळ खेळल्याने चपळता मिळते, चैतन्य आणि आनंद देणारे असे हे मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आहेत. या सर्व खेळामुळे शरीराच्या विविध अवयवांचा व्यायाम होतो. या खेळामध्ये खेळले जाणारे खेळ - वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटाबाई लाटा, घोडाहाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सुपलं, सासू-सून भांडण, अडवळ घुमा पडवळ घूम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा हे सर्व खेळाचे प्रकारांचा समावेश यात असतो. साधारणपणे 110 प्रकाराचे खेळ या मध्ये खेळले जातात. 21 प्रकारच्या फुगड्या, 6 प्रकाराचे आगोटया पागोट्या असतात. पूर्वीच्या काळी घरातील कामे करणाऱ्या बायकांना या खेळातून आनंद मिळत. खेळ खेळताना बायका गाणी देखील म्हणतात.