मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट लेख
Written By मनोज पोलादे|

आयपीएल-५ मध्ये गोलंदाजांची दादागिरी

WD
WD
आयपीएलच्या गेल्या चार हंगामाच्या तुलनेत यंदा सर्वात कमी धावा झाल्या असून गोलंदाजांचा जलवा राहिलेला आहे. फलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या टी-२० लीग प्रकारात यंदा फलंदाज बॅकफूटवर असून मैदानावर गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत.

यंदाच्या हंगामात जेमतेम सुरूवात झालेली असताना ५ गोलंदाजांनी एका सामन्यात ४ बळी घेतले आहेत तर रविंद्र जडेजाने १६ धावांत ५ बळी घेऊन सवौत्तम कामगिरी नोंदवली आहे.

यंदाच्या हंगामात या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यातून कमी धावा झाल्या आहेत. पहिल्या हंगामात या टप्प्यावर ३,००० धावा फळ्यावर लागल्या होत्या. यंदा सर्व हंगामांच्या तुलनेत सर्वाधिक बळी नोंदवल्या गेले असून मोठमोठे फलंदाज आतापर्यंत षट्कार आणि चौकारांचीही आतिषबाजी करू शकलेले नाहीत. फलंदाजांच्या 'दादागिरी'स गोलंदाजांनी अजूनपर्यंत आळा घातला असून आपला आवाज बुलंद केला आहे.

झटपट क्रिकेटच्या या मारझोड प्रकारातही गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करू शकते, हे यंदा सिद्ध झाले आहे. याची कारणमिमांसा करायची झाल्यास खेळपट्टया गोलंदाजांना साथ देत असल्याचे एक विश्लेषण नोंदवता येईल, मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहिल्यास फलंदाजही धावा करू शकतो, हे यंदा दिसून येत आहे. मारझोड करणार्‍या फलंदाजांपेक्षा मुलभूत तंत्रावर भर देत कलात्मकरित्या खेळणारे फलंदाजच धावा करू शकत असल्याचे आपणांस दिसून येईल.

मात्र मैदानं तर तीच आहेत, मग खेळपट्टया काळाच्या ओघात बदलल्या कि गोलंदाजांनी नवीन डावपेच शोधून काढलेत कि संघांची व्युहरचना व क्षेत्ररक्षणात बदल होऊन फलंदाजांना लगाम घालण्यात आला आहे, हे शोधावे लागेल.