सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. लेख
Written By वेबदुनिया|

बॅडमिंटनमधील मक्तेदारी भारत मोडणार

जितेंद्र झंवर

भारत आणि बॅडमिंटन याचा संबंध प्राचीन काळापासून आहे. बॅडमिंटनला आधुनिक स्वरुप भारतात आले. पुण्यामधून हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला. नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण आणि पी. गोपीचंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा तिरंगा फडकविला होता. अपर्णा पोपट, साईना नेहवाल यांच्यासारख्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीवर कळस चढविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जागतिक मानांकनात जगातील पहिल्या 50 खेळाडूंमध्ये भारतातील पाच पुरुष खेळाडू आहेत. शंभर खेळाडूंमध्ये भारताचे सात खेळाडू आहे. येत्या दहा ऑगस्टपासून प्रथमच भारतात जागतिक बॅडमिंटन स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत चीन, डेन्मार्क आणि इंडोनेशियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार का? हाच खरा प्रश्न आहे.

PR
PR
बॅडमिंटनच्या इतिहासात डोकाविल्यास दोन हजार वर्षांपूर्वी आशिया आणि युरोपात या खेळाचा जन्म झाल्याचे दिसून येते. 16 व्या षटकात इंग्लंड आणि युरोपियन देशात या खेळास सुरवात झाली. यामध्ये दोन जण 'शटलकॉक' बॅटने एकीकडून दुसरीकडे टोलवत असायचे. खर्‍या अर्थाने आज खेळल्या जाणार्‍या बॅडमिंटनचा शोध पुण्यामध्येच लागला. 18 व्या षटकात इंग्रज आपल्या मनोरंजनासाठी हा खेळ खेळू लागले. त्यांनी हा खेळ ब्रिटनमध्ये नेला. त्यानंतर सध्या असलेले राजस रुप घेवून हा खेळ जगभर पसरला.

शटलसाठी गूस पक्षाचा पिस
बॅडमिंटनसाठी रॅकेट आणि शटल हे महत्वाची साधने आहेत. बॅडमिंटनच्या शटल किंवा फुल हे 16 पिसांनी गोलाकार पद्धतीने जोडलेले असते. एका शटलचे वजन 4.75 ते 5.50 ग्रॅम दरम्यान असते. शटल तयार करण्यासाठी गूस पक्षाच्या पिसांचा उपयोग करतात. गूस हा हंसाचा जातीचा पक्षी आहे. त्याची पैदास चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. सध्या बांगलादेश आणि आपल्याकडे पश्चिम बंगालमध्येही गूस पक्षांची पैदास केली जाते. या पक्ष्यांची पिसे काढणेही मोठे कौशल्याचे काम आहे. गूस पक्षांची पिसे काढताना त्या पक्षाला रक्त येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. काढलेल्या पिसांची प्रतवारी केली जाते. त्यासाठी त्यासंदर्भातले चांगले ज्ञान आवश्यक आहे. त्या प्रतवारीवरुनच शटलची किंमत ठरते. या पक्षांच्या डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूंच्या पिसांमध्येही फरक असतो. तज्ज्ञ व्यक्ती हे शटल कोणत्या बाजूच्या पिसांचे हे पाहून सांगू शकतात.

बॅडमिंटनचे रॅकेट हे उच्च प्रतीच्या 'मटेरियल' पासून तयार केले जाते. त्यात कार्बन फाबरचा वापर केला जातो. यामुळे त्याच्यावर आदळणारी वस्तू (शटल) वेगाने दुसरीकडे जावू शकते. रॅकेटचे वजन फक्त 80 ते 100 ग्रॅम असते. त्याची लांबी आणि रुंदीचेही नियम ठरलेले आहेत.

बॅडमिंटन हा खेळ लोकप्रिय होवू लागल्यावर 1898 मध्ये पहिल्यांदा 'ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप' स्पर्धा घेण्यात आली. मग बॅडमिंटनचा हळूहळू विकास होवू लागला. या खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी एखाद्या जागतिक संस्‍थेची स्थापना करण्याची गरज वाटू लागली. अखेरी 1934 मध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनची (आयबीएफ) स्थापना करण्यात आली. 24 सप्टेंबर 2006 रोजी या संघटनेचे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्लूएफ) असे नामकरण करण्यात आले. भारत या संघटनेचा 1936 मध्ये सदस्य झाला. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन या संस्थेच्या अंतर्गत पाच विभागीय संस्‍थाही आहेत. त्यात आशिया खंडासाठी बॅडमिंटन आशिया कॉन्फडेरशनही संस्था आहे. आफ्रिका, अमेरिका, युरोप खंडासाठीही स्वतंत्र संस्था आहेत.

आयबीएफची स्थापना झाल्यानंतर 1948 मध्ये पुरुषांसाठी प्रथमच 'थॉमस कप' ही स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर महिलांसाठी आणि मिश्र दुहेरी स्पर्धा सुरु झाल्या. राष्ट्रकुलमध्ये बॅडमिंटनचा समावेश 1966 साली झाला. ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनचा समावेश खूपच उशीरा म्हणजे 1992 साली झाला. बर्सिलोना ऑलिंपिकमध्ये हा एकेरी ‍आणि दुहेरीत तर त्यानंतर अटलांटा ऑलिंपिकमध्ये मिश्र दुहेरी प्रकारही सुरु झाला. आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये चीन (8), इंडोनेशिया (5), को‍रिया(5), डेन्मार्क (1) या देशांनाच ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविता आले आहे.
''कितीही मोठे यश मिळविले, तरी तुम्ही ते डोक्‍यात जाऊ द्यायचे नसते. अवकाशात भरारी मारायची असते. परंतु तुमचे पाय जमिनीवरच असले पाहिजे. प्रत्येक यशानंतर त्यापेक्षा मोठे यश तुम्हाला खुणावत असले पाहिजे.''


जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 1977 मध्ये सर्वात प्रथम स्वीडनमध्ये झाली. त्यानंतर 1983 पर्यंत दर तीन वर्षांनी ही स्पर्धा घेण्यात येत होती. 1983 पासून दर दोन वर्षांनी 2005 पर्यंत जागतिक चॅम्पियनशिप घेण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर मात्र ऑलिंपिक वर्ष सोडून दरवर्षी स्पर्धा घेणे सुरु झाले आहे. भारताला प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. 2010 मध्ये फ्रॉन्स (पॅरीस) तर 2011 मध्ये इंग्लंड (लंडन) येथे ही स्पर्धा होणार आहे.

भारतात होणार्‍या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सात दिवसात 255 सामने खेळले जाणार आहे. एकूण पाच प्रकारात हे सामने होणार आहेत. पुरुषांच्या एकेरीसाठी 64 खेळाडू विजेतेपदासाठी लढणार आहे. महिलांच्या एकेरीत 57 खेळाडू आहेत. पुरुषांच्या दुहेरीत 50 तर महिलांच्या दुहेरीत 42 खेळाडू विजेतपदासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. मिश्र दुहेरीत 47 जणांमध्ये लढत होईल.

''कितीही मोठे यश मिळविले, तरी तुम्ही ते डोक्‍यात जाऊ द्यायचे नसते. अवकाशात भरारी मारायची असते. परंतु तुमचे पाय जमिनीवरच असले पाहिजे. प्रत्येक यशानंतर त्यापेक्षा मोठे यश तुम्हाला खुणावत असले पाहिजे. प्रसिद्धीचा झोत अंगावर झेलत राहण्यापेक्षा कामगिरीद्वारेच कारकीर्द वलयांकित कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही सर्वोच्च शिखरावर गेलात, तरी ते स्थान ‍टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नसतो,'' भारताची बॅडमिंटन स्टार साईना नेहवाल हिची ही भूमिका जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला यश मिळवून देईल.