शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. लेख
Written By वेबदुनिया|

फुलविक्रेती ते मॅरेथान विजेती

सीमा कुलकर्णी

NDND
वयाच्या चाळीसाव्या वर्षी एखाद्या सर्वसामान्य महिलेची मानसिकता काय असू शकते? आयुष्याच्या या उंबरठ्यावर असताना मुले मोठी झालेली असतात. जबाबदारी थोड्या फार प्रमाणात कमी झालेली असते. मग अशा वेळी स्वत:चा छंद आणि कला विकसित करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. अशाच प्रकारच्या वयातील एका महिलेने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. तेव्हापासून तिने आजपर्यंत मागे वळून बघितलेच नाही. मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या एकविसाव्या खुल्या मास्टर्स मॅरेथॉन स्पर्धेत तिने दोन विजेतेपद मिळवून आपली जिद्द व चिकाटी जगाला दाखवून दिली. तिचे नाव आहे संगीता पोपटराव खंडागळे.

पुण्यातील बोपोडी येथील नाईक चाळीत एका छोट्याश्या घरात राहणार्‍या खंडागळे कुटुंबात नवरा-बायको आणि पाच मुले आहेत. संगीताचे पती पोपटराव खंडागळे किर्लोस्कर ऑइल इंजिन या कंपनीत ठेकेदारीचे काम करतात. कुटुंबांला आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी संगीता हार-फुलांचा व्यवसाय करते. सकाळीच लवकर उठून मंडईत जाऊन फुले विकत आणणे आणि त्यांचे हार तयार करून नेमक्या घरी वेळेत पोह‍चविणे हा त्यांचा दिनक्रम. एकदा पतीबरोबर मॅरेथॉन स्पर्धा पाहण्यासाठी गेली असता धावणार्‍या स्पर्धकांना लोक टाळ्या वाजून प्रोत्साहन देत असल्याचे पाहून त्यांनाही वाटले की मीही धावू शकते. विशेष म्हणजे तिच्या पतीने तिला विरोध न करता समजावून सांगितले की या स्पर्धेसाठी सरावाची खूप आवश्यकता असते. तिने मनात विचार पक्का केला. दुसर्‍याच दिवशी सकाळी लवकर उठून खंडागळे दाम्पत्य जवळच असलेल्या विद्यालयाच्या प्रागंणात सरावासाठी गेले. संगीताचे वय त्यावेळी 38 होते.

विशेष म्हणजे तिला कोणत्याही खेळाची पार्श्वभूमी नव्हती. ती शाळेतही गेली नव्हती. लहान भावंडांना सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे इच्छा असूनही शिक्षण घेता आले नव्हते. पण लहानपणी काहीतरी करून दाखविण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा अचानक मनात निर्माण झाली. आणि त्यानंतर सुरू झाला लक्ष्याच्या दिशेने प्रवास.

संगीता रोज धावण्याचा सराव करू लागली. गुडघ्यापर्यंत साडी गुंडाळलेल्या, पायात चप्पल न घालता धावण्याचा सराव करणाऱ्या संगीताला लोकही उत्सुकतेने पहात. ज्या शाळेत संगीता सरावाला जात त्या शाळेचे प्रशिक्षक दत्ता महादम आणि त्यांचे विद्यार्थीही संगीताल रोज कुतुहलाने पाहत असत. महादम सरांनी पहिल्यांदा तिला ट्रॅक सूट दिला. त्यानंतर बूट पायात कसा घालायचा हेही शिकवले. नंतर संगीता शंभर मीटर, नऊशे मीटरचा सराव करू लागली.

आणि 1997 सालचा तो दिवस उजाडला. त्या दिवशी असलेल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे संगीताने ठरविले होते. ही अर्ध मॅरेथॉन होती. तिला एकवीस किलोमीटर धावायचे होते. एकवीस किलोमीटर अंतर तिच्यापुढे काहीच नव्हते. पण प्रश्न होता तो मार्गावर लिहिलेले संकेत वाचण्याचा. कारण तिला लिहिता-वाचताही येत नव्हते. स्पर्धेच्या एक दिवस अगोदर तिच्या पतीने तिला त्या रस्त्याने चालत नेले. दुसऱ्या दिवशी ती संपूर्ण रस्ता लक्षात ठेवून स्पर्धेत उतरली. तिचा नंबर आला नाही. पण स्पर्धा पूर्ण केली. त्यानंतर तिची विजययात्रा सुरू झाली ती आजतागायत. याचदरम्यान तिने चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे तिला लिहिता-वाचता येऊ लागले. 1998 मध्ये तिने राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर दिल्ली, बंगळूर, गोवा, इंफाळच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन विजय मिळविला.

मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या खुल्या मास्टर्स स्पर्धेतही तिने सहभाग घेतला. त्यासाठी तिला आर्थिक अडचण भासत होती. त्यावेळी घरातील सर्व नातेवाईकांनी मदत केली. शेवटी कर्ज घेण्याचे ठरविले. पण नंतर त्याचीही गरज पडली नाही. कारण किर्लोस्कर ऑइल इंजिन, स्थानिक रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी तिला आर्थिक मदत केली. नंतर संगीताने आपले स्वप्न साकारत आंतराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे सांगीताबाईचा जीवन प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे.