सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. लेख
Written By वेबदुनिया|

विश्वनाथन आनंद : 64 घरांचा राजा

जितेंद्र झंवर

ND
ND
बुद्धिबळ म्हणजे 64 घरांचा 'माइंड गेम' आहे. यामध्ये प्यादी, हत्ती, घोडा, ऊंट, वजीर यांच्यात आपल्या राजाला वाचविण्यासाठी घमासान युद्ध चालते. या खेळात आपला ‍विश्वनाथन आनंद पुन्हा जगज्जेता ठरला. त्याने बुल्गेरियात‍ील सोफियात इतिहास घडविला. सोफियाच्या वॅसेलीन टोपालोवला पराभूत करुन जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक त्याने केली. बुद्धिबळातील सर्व प्रकारात जिंकलेला आनंद हा एकमेव खेळाडू आहे. चार वेळा जगज्जेता, पाच वेळा बुद्धिबळातील ऑस्कर विजेता, सर्वात कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम करणारा आनंद गेल्या तीन दशकांपासून बुद्धिबळाचा राजा आहे. आपण सर्वकालिन महान खेळाडू असल्याचे त्याने आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे.

आनंदसाठी बुल्गेरियातील स्पर्धा सोपी नव्हती. त्याच्या अडचणी प्रवाशातून सुरु झाल्या. युरोपातील आकाशात ज्वालामुखीच्या राखेचे ढग असल्यामुळे आनंद जर्मनीत अडकला होतो. दीर्घकाळ विमानसेवा खंडीत राहणार असल्यामुळे 40 तासांचा प्रवास करुन आनंद पत्नी अरुणासह फ्रॅंकपर्टने सोफियात दाखल झाला. पाच देशांतून दोन हजार किलोमीटरचा प्रवास करताना आनंद आणि त्याच्या टीमला अनेक अडचणी आल्या. परंतु त्यांनी अडचणींना दाद दिली नाही. ब्लगेरियात आनंदच्या प्रसिद्धीचा परिचय आला. बल्गेरिया चेकपोस्टपासून चार तासांचे अंतर सोफिया होते. चेकपोस्टवर आनंद ही अक्षरे वाचल्यावर कोणतेही चेकिंग झाले नाही. त्याची कार वेगाने जात असल्यामुळे पोलिसांनी रोखली. परंतु आत आनंद आहे, असे सांगताच त्याच्या गाडीला हिरवा कंदील पोलिस देत होते. आनंद हा बुद्धिबळातील 'कोहीनूर' भारतात नव्हे तर जगात प्रसिद्ध असल्याचे यामधून दिसून आले.

ND
ND
भारतात बुद्धिबळ हा राजे-महाराजांच्या काळापासून चालत आलेला खेळ आहे. परंतु कालांतराने यामध्ये रशियाने वर्चस्व निर्माण केले. गॅरी कॅस्पारॉव्ह, मिखेल बोत्वीनिक, बोरिस स्पॅस्की, अ‍ॅलेक्झांडर अलीखाईन आणि व्लादिमीर क्रॅमनिक या रशियातील खेळाडूंचे वर्चस्व विश्वनाथन आनंदने मोडून काढले.

आनंदचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी तमिळनाडूतील लहान शहरात झाला. आनंदला घरात ‘विशी’ म्हणतात. त्याच्या जन्मानंतर त्याचे कुटुंब लवकरच चेन्नईला स्थायिक झाले. त्याचे वडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेचे निवृत्त महाव्यवस्थापक आहेत. त्याची आई सुशीला ही गृहिणी आणि त्याची गुरु आहे. त्याला एक बहीण आणि एक भाऊ आहे. सर्वांमध्ये आनंदच मोठा. त्याची बालपण फिलिपाईन्समधल्या मनाली शहरात गेले. तेथेच त्याला बुद्धिबळ खेळाची आवड जडली.

वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्याने बुद्धिबळाच्या पटाशी गट्टी जमविली. बघता बघता त्याने या खेळात नैपुण्य प्राप्त केले. फिलिपाईन्समध्ये टीव्हीवर येणारे पझल्स गेम सोडवून तो पुस्तके जिंकायचा. जिंकलेल्या पुस्तकांचे ढीगच्या त्याच्याकडे लागले होते.

आनंदला बुद्धिबळाची प्रेरणा आई आणि मामांकडून मिळाली. ते बुद्धिबळ खेळत असल्याने आनंद त्याकडे आकर्षिला गेला. मग बुद्धिबळात यश मिळवणे सुरु केल्यावर त्याने कधी पाठीमागे पाहिले नाही. 1983 मध्ये नऊ पैकी नऊ गुण घेत तो कनिष्ठ गटाचा राष्ट्रीय विजेता बनला. पंधराव्या वर्षी तो 'इंटरनॅशनल मास्टर' बनला. हा विक्रम करणारा आशियातील तो एकमेव खेळाडू आहे. सोळाव्या वर्षीच म्हणजे 1986मध्ये ‘राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ जिंकली. 1987 मध्ये फिलिपाईन्समध्ये जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकणारा तो पहिला आशियाई ठरला. 1987 मध्ये तो ग्रॅण्डमास्टर बनणारा तो एकमेव भारतीय होतो. 1991 मध्ये गॅरी कॅस्पारॉव्ह आणि अनातोली कारपोव मागे टाकून 'रेगिया इमीलिया' स्पर्धा त्याने जिंकली. 1998 मध्ये लिनारेस विजेतेपद त्याने मिळविले. पाच वेळा कोरस बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे.

सन 2000 मध्ये आनंद आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर पोहचला. यावेळी त्याने एलेक्सी शिरोव याला पराभूत करुन 15 वा जगज्जेता झाला आणि या खेळावरील रशियाचे वर्चस्वही संपविले.

आनंदमुळे भारतात लहान मुले आणि युवकांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याला आदर्श मानूनच नवीन खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आता चमकत आहे. क्रिकेटवेड्या देशात आनंदने बुद्धिबळाला एक वेगळी प्रतिष्ठा आणि नवसंजीवनी मिळवून दिली आहे.

आनंदचे यश...
चार वेळा जगज्जेतेपद 2000, 2007, 2008 आणि 2010
पाच वेळा बुद्धिबळातील ऑस्कर (खेळातील सर्वोत्तम पुरस्कार)
बुद्धिबळातील सर्व प्रकाराचे जगज्जेतेपद जिंकलेला एकमेव
सर्वांत कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा पहिला मानकरी (1991)