शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (20:15 IST)

कॉमनवेल्थ गेम्स : बीडच्या अविनाश साबळेनं रचला इतिहास, स्टीपलचेस शर्यतीत रौप पदकाची कमाई

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने बर्मिंगहॅम कॅामनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आणि नवा इतिहास रचला. अविनाशने 8 मिनिटे 11.20 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ असून हा नवा राष्ट्रीय विक्रमही आहे. कॅामनवेल्थ गेम्समध्ये स्टीपलचेस शर्यतीत भारताचं हे पहिलंच पदक आहे.
 
याआधी भारताच्या ललिता बाबरनं 2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसचं कांस्यपदक मिळवलं होतं आणि तिनं 2016 साली ॲालिंपिकची फायनलही गाठली होती.
 
अविनाशनं या पदकासोबतच पुरुषांच्या स्टीपलचेसमध्ये केनियाच्या वर्चस्वालाही तडा दिला आहे.
 
1994 पासून कॅामनवेल्थ गेम्समध्ये या स्पर्धेतली तीनही पदकं केनियन धावपटूंनी जिंकली होती.
 
यावेळीही केनियाचे तेच यश मिळवणार अशी चिन्हं होती कारण अविनाश अखेरच्या लॅपपर्यॅत चौथ्या क्रमांकावर होता. पण त्यानं मुसंडी मारली आणि दुसरं स्थान मिळवलं.
अविनाशच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं अभिनंदन करत, अविनाशसोबतचा आधीचा संवादाचा व्हीडिओ सुद्धा ट्वीट केला आहे.
 
तसंच, कॉमनवेल्थमधील विजयानंतर अविनाशनं एएनआयशी संवाद साधला. त्यावेळी त्यानं पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादाचा उल्लेख केला. हा व्हीडिओ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलल्यानंतर प्रेरणा मिळाली होती. मलाही वाटलं की, आपण पदक जिंकलं पाहिजे. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभागी झालो होतो. पण तिथं पदक जिंकता आलं नव्हतं.
 
बीडच्या बांधावरून बर्मिंगहॅमपर्यंत... अविनाशचा प्रेरणादायी प्रवास
अविनाश बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावचा आहे. एका शेतकरी कुटुंबात 13 सप्टेंबर 1994 रोजी त्याचा जन्म झाला.
 
वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश घरापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या शाळेत चालत किंवा पळत जात असे. बारावीचं शिक्षण झाल्यावर त्यानं लष्करात प्रवेश केला. अविनाश 5 महार रेजिमेंटचा जवान म्हणून 2013-14 साली सियाचेन या अतिथंड युद्धभूमीवर तैनात होता. मग राजस्थान आणि सिक्कीममध्येही त्यानं ड्यूटी बजावली.
 
2015 साली तो लष्कराच्या क्रॅास कंट्री शर्यतीत सहभागी झाला आणि त्याच्या ॲथलेटिक्समधल्या कारकीर्दीला सुरूवात झाली.
 
अविनाशनं पुढे स्टीपलचेसची निवड केली आणि या स्पर्धेत वेगवेगळे राष्ट्रीय विक्रमही रचले. टोकियो ॲालिंपिकमध्येही तो सहभागी झाला होता.