सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (20:45 IST)

नाओमी ओसाकाः जपानच्या शांत समाजाला हादरा देणारी 23 वर्षांची मुलगी

माईक हेन्सन
ती फ्लोरीडाची आहे. जगातील सर्वोत्तम तरुण टेनिसपटू याठिकाणी एकमेकांना स्पर्धेत आव्हान देत असतात.
 
ओसाका अत्यंत प्रतिष्ठीत अशा 'ऑरेंज बाऊल टूर्नामेंट'ची तयारी करत होती. त्यावेळी तिचं वय 10 वर्षे असेल. एक प्रतिस्पर्धी खेळाडू तिच्याबाबत बोलताना तिनं ऐकलं होतं.
 
ती मुलगी तिच्या मैत्रिणीबरोबर बोलत होती. पण ओसाकाला जपानी भाषा समजते हे कदाचित तिला माहिती नव्हतं.
 
'आज तुझ्या विरोधात कोण आहे?' असं त्या मुलीच्या मैत्रिणीनं तिला विचारलं. त्यावर तिनं 'ओसाका' असं उत्तर देताच तिची मैत्रीण लगेचच म्हणाली, "अरे, ती काळी मुलगी. तिला तर जपानी म्हणायला हवं?" त्यावर ओसाकाबरोबर सामना असलेल्या मुलीनं "मला तसं वाटत नाही" असं उत्तर दिलं.
 
वॉल स्ट्रीटनं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एक मोठा लेख प्रकाशित केला होता. त्यावेळी नाओमी ओसाकानं 'द वॉल स्ट्रीट जर्नल' ला हे सर्व सांगितलं होतं.
मूळ हेटी वंशाचे वडील आणि जपानी आई यांच्या घरी जन्मलेली, अमेरिकेत लहानाची मोठी झालेली ओसाका ही टोकियो-2020 ऑलिम्पिकचा मुख्य चेहरा आहे हे सर्वांनाच माहिती आहे.
 
टोकियोच्या प्रत्येक बस स्टॉपवर 23 वर्षीय ओसाकाचे पोस्टर लावलेले आहेत. त्यात ती स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा चाहत्यांचं स्वागत करताना दिसतेय.
 
विशेष म्हणजे हे पोस्टर अर्धं इंग्रजी आणि अर्धं जपानी भाषेत तयार करण्यात आले आहेत. एक 'नवं विश्व' आणि 'नवी पिढी' यांचा विचार करून हे पोस्टर तयार करण्यात आले आहेत.
ओसाकानं 2019 मध्ये जपानचा वारसा निवडत अमेरिकेचं नागरिकत्व त्यागलं होतं. मातृभूमिसाठी जास्तीत जास्त पदकं मिळवण्याबरोबरच एक बदलही ती निर्माण करत आहे.
 
मिश्र वंशाची खेळाडू
पण ओसाका जपानच्या समाजामध्ये कशाप्रकारे मिसळू शकेल? ही शंका येण्यासाठी तुम्हाला पुन्हा तिच्या बालपणाचा विचार करण्याची गरज नाही.
 
सध्या जपानची तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू असलेली नाओ हिबिनो हिनं 2018 मध्ये 'द न्यूयॉर्क टाइम्स' ला एक मुलाखत दिली होती. "प्रामाणिक पणे सांगायचं तर, आम्हाला ती आमच्यापेक्षा जरा वेगळी वाटते. कारण शारीरिकदृष्ट्या ती फार वेगळी आहे," असं तिनं या मुलाखतीत म्हटलं होतं.
 
"ती एका वेगळ्या ठिकाणी लहानाची-मोठी झाली असून जपानी भाषेत कमी बोलते. ती केई (निशिकोरी) सारखी शुद्ध (प्युअर) जापानी खेळाडू नाही."
 
पण अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करायला ओसाका ही काही पहिलीच मिश्र वंशाची खेळाडू नाही.
 
साचिओ किनुगासा आणि हायदेकी इराबू हे दोघंही बेसबॉल स्टार होते. ते दोघंही मिश्र वंशाचे खेळाडू होते.
 
पण जपानचे लोक किंवा त्या दोघांनाही त्यांच्या पालकांबाबत (विशेषतः अमेरिकन पिता) बोलण्यात काहीही रस नव्हता. शिवाय दुसऱ्या महायुद्धानंतर देशावर ताबा घेतलेल्या सैनिक किंवा त्यांनी केलेल्या मतभेदांबाबतही ते कधी बोलत नव्हते.
 
पण ओसाका वेगळी आहे.
 
''काही जुन्या लोकांनी जपानमध्ये महिला क्रीडापटूनं सार्वजनिकरित्या कसं बोलावं आणि वागावं हे आधीच ठरवलेलं आहे. पण ओसाका त्या साचामध्ये बसत नाही. तिनं तिची वक्तव्य आणि कामांद्वारे जपानमधील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे," असं एका जपानी वृत्तपत्राचे पत्रकार हिरोकी वाडा यांनी म्हटलं.
 
ओसाकानं मांडले अनेक मुद्दे
"ओसाका विचार करणारी आणि त्यावर लोकांना विचार करायला भाग पाडेल अशी प्रतिक्रिया देणारी व्यक्ती आहे. तिनं काही राजकीय वक्तव्य केली आहेत. त्यामुळं सोशल मीडियावर सध्या वंश आणि व्यक्तिची ओळख याबाबत अधिक गांभीर्यानं चर्चा सुरू झाली आहे." असंही वाडा म्हणाले.
 
गेल्यावर्षी यूएस ओपनमध्ये ती एका खास विचारानं सहभागी झाली होती. तिच्या किटमध्ये सात वेगवेगळे मास्क होते.
 
प्रत्येक मास्कवर पोलिसांच्या दडपशाही किंवा वंशद्वेषी हिंसाचारात मारल्या गेलेल्या एकेका कृष्णवर्णीय अमेरिकन व्यक्तीचं नाव लिहिलेलं होतं.
 
तिनं स्पर्धेत प्रत्येक मास्कचा वापर केला. त्यापैकी काहींवर जॉर्ज फ्लॉयड, ब्रेओना टेलर आणि ट्रॅव्हन मार्टिन यांची नावं होती. जगाला ही नावं समजावी आणि ती लक्षात ठेवली जावी, हा यामागचा उद्देश होता.
 
पण वंशाच्या दृष्टीनं सर्वात कमी वैविध्य असलेल्या जपानला या मुद्द्यावर चर्चेसाठीही संघर्ष करावा लागत आहे.
 
जपानच्या एनएचके या सरकारी वाहिनीला गेल्या वर्षी एका अॅनिमेशन फिल्ममध्ये वंशीय न्यायाच्या विरोधात कृष्णवर्णीयांचं व्हीडिओ चित्रण केल्यानं माफी मागावी लागली होती. एनएचकेनं या फिल्ममध्ये आंदोलनाच्या काही प्रमुख कारणांचा समावेशही केला नव्हता.
 
2019 मध्ये जपानी इन्स्टंट नूडल कंपनी निसिननं एका जाहिरातीत ओसाकाला गोरं दाखवलं होतं. पण नंतर कंपनीलाही जाहिरात मागं घ्यावी लागली.
 
पण अनेक पिढ्यांपासून चालत आलेले हे विचार आहेत. ओसाका तीन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांना अमेरिकेला स्थलांतरीत व्हावं लागलं होतं. त्याचं कारण म्हणजे, ओसाकाच्या आईच्या आई-वडिलांनी त्यांच्याशी नातं तोडलं होतं.
 
रॉबर्ट व्हाइटनिंग यांनी जपानच्या समाजाबाबत 'टोकियो जंकी' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या मते, "गेल्या वर्षी किंवा तेव्हापासून आतापर्यंत जे काही घडलं आहे, ते जपानी समाजासाठी शिकण्याच्या एका प्रकियेसारखं आहे."
रॉबर्ट जवळपास 60 वर्षे टोकियोमध्ये राहिले आहेत. "दरम्यानच्या काळात टीव्हीवर विविध शोमध्ये नाओमीमध्ये असं पाहिलं तरी काय, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर ती हे सर्व बोलली,"असं ते म्हणतात.
 
"जपानमध्ये मुळातच लोक वाद किंवा संघर्ष टाळतात. अमेरिकेसारखी जपानमध्ये भांडणाची परंपरा नाही. जपानमध्ये तुम्ही जेवढे प्रसिद्ध असता तेवढेच अलिप्तही असतात.
 
आपलं नाव एखाद्या वादाशी जोडल्या गेल्यामुळं त्याचा परिणाम तुमचे सहकारी, संस्था किंवा प्रायोजकावर होऊ नये," असं त्यांना वाटत असल्याचंही रॉबर्ट म्हणाले.
 
पाश्चिमात्य संस्कृतीचे लोक स्वतःबद्दल विचार करण्याला महत्त्व देतात, तर जपानमध्ये शांतता आणि समन्वयासाठी प्राधान्य असतं, असं रॉबर्ट म्हणाले.
 
कोर्टवर पुनरागमानाची आशा
गेल्या वर्षी 'ओसाका कुठली आहे?' याची सगळीकडं चर्चा होती. तर यावेळी 'ओसाका कुठं आहे?' असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
 
मे महिन्यात माध्यमांशी बोलणार नसल्याचं ओसाका म्हणाली होती. त्यानंतर मानसिक स्थिती ठिक नसून काही दिवसांपासून नैराश्याचा सामना करत असल्याचं सांगत तिनं आधी फ्रेंच ओपन आणि नंतर विम्बल्डनमधून माघार घेतली.
 
पण दोन महिने टेनिसपासून दूर राहिल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती टेनिस कोर्टवर पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 
मानसिक आरोग्याचा मुद्दा सार्वजनिकरित्या लोकांसमोर आणणारी ओसाका ही आतापर्यंतची सर्वात प्रसिद्ध आणि निवडक अशा लोकांपैकी एक असल्याचं सर्वांनाच माहिती आहे.
 
27 वर्षीय कुमी योकोयामा या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूनं गेल्या महिन्यातच लोकांना ती ट्रान्सजेंडर असल्याचं सांगितलं होतं. निवृत्तीनंतर पुरुष म्हणून जगण्याचा विचार होता, असंही तिनं सांगितलं होतं.
 
अमेरिका आणि जर्मनीमध्ये खेळल्यामुळं तिला जपानमध्ये या विषयी असलेलं अज्ञान आणि पूर्वग्रह याबाबत समजलं, असंही तिनं सांगितलं होतं.
 
तर 2020 मध्ये व्यावसायिक पहिलवान हाना किमुरा यांनी 'टेरेस हाऊस' या प्रसिद्ध रियालिटी शोमध्ये झळकल्यानंतर आत्महत्या केली होती.
 
आकड्यांचा विचार करता, जपानमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांची तक्रार करणाऱ्यांची संख्या 1999 पासून 2014 पर्यंत वाढून दुप्पट झाली.
 
"40 वर्षांपूर्वीची स्थिती पाहता, तेव्हा मी लहान असताना देशात तुम्ही किंवा तुमच्या नात्यातील कोणी मानसिक समस्येचा सामना करत असेल, तर ती अत्यंत लज्जास्पद बाब समजली जात होती. अशा लोकांना कमकुवत समजलं जातं. त्यातही खेळाडुंमध्ये हा प्रकार अधिक होता. त्यामुळं लोक याबाबत बोलत नाही, असं पत्रकार हिरोकी वाडा सांगतात.
 
"पण आता परिस्थिती हळू-हळू बदलत आहे. लोक ते मानसिकदृष्ट्या तणावात असल्याचं स्वीकारत असून त्याच्याशी संघर्ष करावा लागणार याचीही जाणीव त्यांना होत आहे."
 
हा बदल कशामुळं घडला आहे, याबाबत रॉबर्ट व्हाइटिंग यांना काहीही शंका नाही.
 
"मला वाटतं नाओमी ओसाकासह इतरही मिश्र वंशाच्या जपानींना काही प्रमाणात बाहेरचंच समजलं जातं. मला असंही वाटतं की, सध्याची पिढी ही आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक परिपक्व आहे. इंटरनेट आणि असंख्य टीव्ही वाहिन्यामुळं त्यांचा दृष्टीकोन अधिक वैश्विक बनला आहे, असंही रॉबर्ट म्हणाले.
 
"ही एक व्यापक विचारसरणी आहे. 1960 किंवा 80-90 च्या दशकात मी आलो तेव्हा ती नव्हती. जग आता फार जवळ आलं आहे, त्याचा जपानला फायदा झाला आहे. हे एक नवं जग आहे, नवी पिढी आहे आणि ओसाका त्याचा एक मोठा भाग आहे, असं म्हणायला हरकत नाही, " असं मतही रॉबर्ट यांनी मांडलं.