मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (21:24 IST)

दंगल! पैलवान बाळू बोडकेची साताऱ्यात ‘सुवर्ण’कामगिरी

pahalwan
सातारा येथे चालू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करत नाशिक जिल्ह्यातील पैलवान बाळू बोडके याने 86 किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
दरम्यान सातारा येथे तब्बल 62 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आमदार रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत हे उदघाटन झाले होते. नाशिक जिल्ह्यातील पैलवान बाळू बोडके याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 86 किलो वजनी गटात नगरच्या ऋषी लांडेवर 10:0 ने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
 
तत्पूर्वी बोडके याने सेमीफायनलमध्ये सोलापूर येथील पैलवान वावरे यास धूळ चारतफायनलमध्ये धडक मारली होती. अखेर फायनलमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत बाळू बोडकेने डावपेच आखत ऋषीचा पराभव केला आहे. त्यामुळे पैलवान बोडकेच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची कमाई झाली आहे. त्यामुळे त्याचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
 
पैलवान बाळू बोडकेने यापूर्वी पुणे विद्यापीठात प्रथम गोल्ड मेडलिस्ट म्हणून नाव कोरले आहे. त्यानंतर 2018 महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 74 किलो वजनी गटात गोल्ड मिळवले आहे. 2017 मध्ये पनवेल येथे 74 किलो वजनी गटातील कुमार महाराष्ट्र केसरी हि स्पर्धा जिंकली आहे. तर २०१७ मध्ये वाशीममध्ये आयोजित युवा महाराष्ट्र केसरी चा ‘किताब पटकावला आहे. 2017 ला पुणे येथे झालेल्या युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तर विशेष म्हणजे तो ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी देखील झाला आहे.