बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By वेबदुनिया|

स्वाइन फ्ल्यू बरा होणारा आजार- डॉ. तायडे

-मिनल जोगळेकर

MH News
MHNEWS
स्वाइन फ्ल्यू हा आजार बरा होणार आजार आहे. जनतेने अफवाना बळी न पडता दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. वासुदेव तायडे यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : आता शाळा, कॉलेज पूर्ववत सुरु झाले आहेत, अशावेळी काय दक्षता घ्यावी?
उत्तर : स्वाईन फ्लू आजाराविषयी आता मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. शिक्षकांना देखील आजाराविषयी भरपूर माहिती मिळाली आहे, त्यामुळे शाळा, महाविद्यालयात आवश्यक त्या सूचना शिक्षकांनी द्याव्यात. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास त्याला तत्काळ डॉक्टरकडे घेऊन जावे.

प्रश्न : स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे कसे ओळखावे? प्रतिबंधासाठी काय करावे?
उत्तर : ताप, घसा खवखवणे, लूज मोशन, उलट्या ही स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. हा आजार टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. जायचे असेल तर तोंडाला रुमाल बांधावा. लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांना त्वरीत दाखवावे.

प्रश्न : काहीजणांना या आजाराचा संसर्ग लगेच होतो, यामागील कारण काय?
उत्तर : लहान मुले आणि वृध्दांना या आजाराचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. वृध्दांना मधूमेह, ह्रदयविकार असे आजार असतात त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. लहान मुलांची देखील प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांना या आजाराची लागण लगेच होते. गरोदर मातांनी देखील आवश्यक ती काळजी घ्यावी.

प्रश्न : स्वाईन फ्लूची लक्षणे आढळलेल्या रुग्णाच्या स्वापच्या नमुन्यांची प्रयोगशाळेतून माहिती येईपर्यंत बराच वेळ जातो, अशावेळी रुग्ण दगावू शकतो, याबाबत काय सांगता येईल?
उत्तर : ज्या रुग्णामध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे खरोखर आढळतात त्याच रुग्णाच्या स्वापचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जातात आणि त्याची माहिती येईपर्यंत रुग्णाला टॅमी फ्लू गोळ्या दिल्या जातात. त्यामुळे आजार बळावत नाही.

प्रश्न : टॅमी फ्लू गोळ्यांबाबत काय सांगता येईल?
उत्तर : स्वाईन फ्लू आजारावर टॅमी फ्लू गोळ्या रामबाण उपाय आहे. या गोळ्या परेदशात तयार होतात. शासकीय आणि या आजारावर उपचारासाठी मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयात त्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दहा गोळ्यांची किमत साधारण ८५० रुपये इतकी आहे.

प्रश्न : स्वाईन फ्लू ज्या ठिकाणाहून पसरतो तेथे काय व्यवस्था करण्यात आली आहे?
उत्तर : परदेशातून या आजाराचा भारतात शिरकाव झाला आहे. त्यामुळे देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणार्‍या प्रवाशांच्या तपासणीसाठी विमानतळावरच व्यवस्था करण्यात आली आहे. बंदरांवर देखील तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.

प्रश्न : डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे काय?
उत्तर : मुंबईतील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये देखील कार्यशाळा घेण्यात आली.

प्रश्न : जनतेच्या मनातील स्वाईन फ्लू विषयीची भिती घालवण्यासाठी काय आवाहन कराल?
उत्तर : स्वाईन फ्लू हा बरा होणारा आजार आहे. त्यामुळे भितीचे कारण नाही. स्वाईन फ्लूची लागण झालेले १ हजार ५७५ रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या आजाराचा जास्त बाऊ करु नये. वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घ्या.

साभार- महान्यूज