1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. टी-20 विश्वचषक 2024
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2024 (14:04 IST)

इंग्लंडविरुद्ध खेळताना भारतीय संघासमोर 'ही' आहेत मोठी आव्हानं

virat rohit
T-20 वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून आज (27 जून) भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सेमीफायनल होत आहे.
 
सेमिफायनलमध्ये भारतानं इंग्लंडवर मात केली तर भारत फायनलमध्ये धडकणार असून दक्षिण आफ्रिकेसोबत अंतिम सामना होईल.
 
याआधी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये सेमीफायनल झाली. पण, अफगाणिस्तानचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. दक्षिण आफ्रिका संघानं 56 धावांमध्येच अफगाणिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवत फायनलमध्ये धडक दिली आहे. 29 जूनला T-20 वर्ल्ड कपचा फायनल सामना होणार आहे.
 
इंग्लंडनं 2010 आणि 2022-23 अशा दोन्हीवेळा T-20 वर्ल्ड कप जिंकला होता, तर भारतानं 2007 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. पण, आता सुरू असलेल्या T-20 वर्ल्ड कपचा विचार केला तर भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय.
 
आतापर्यंतच्या सामन्यात भारतानं चांगली कामगिरी केली आहे. ग्रुप टीममध्ये फक्त पाकिस्तान संघालाच भारताविरोधात प्रबळ दावेदार असल्याचं बोललं गेलं.
 
पाकिस्तानविरोधात खेळताना फलंदाजीमध्ये भारतीय संघ जरा डगमगला तरी, भारतानं उत्तम गोलंदाजी करत विजय खेचून आणला. सुपर 8 सामन्यातही भारतासमोर ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाचं आव्हान होतं.
 
पण, भारतानं गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पराभवाचा वचपा काढत ऑस्ट्रेलियाची धुळधाण उडवली. रोहित शर्मानं उत्कृष्ट फलंदाजी करत भारतासाठी सेमिफायनलची वाट मोकळी केली.
 
भारतानं या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे?
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपप्रमाणेच T-20 मध्येही भारताची कामगिरी शेवटपर्यंत दमदार दिसली. पण, अशा काही गोष्टी आहेत ज्या सेमीफायनलमध्ये भारतासमोर आव्हान ठरू शकतात.
 
या वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी आतापर्यंत ओपनिंग डोकेदुखी ठरली आहे. कारण, दोन सर्वांत अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे जेव्हा ओपनिंगला उतरले तेव्हा त्यांची विशेष कामगिरी दिसली नाही. पूर्ण मालिकेत रोहित शर्मानं फक्त दोन अर्धशतक केली.
 
रोहितनं आयर्लंडच्या विरोधातल्या पहिल्या सामन्या 52 धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाविरोधात 92 धावांची विक्रमी खेळी खेळली होती.
 
पण, या सामन्यात सर्वांत मोठं आव्हान विराट कोहलीसमोर आहे. कारण, आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याची विशेष कामगिरी दिसली नाही. बांगलादेशच्या विरोधात झालेल्या सामन्यात विराटला फक्त 30 धावा पूर्ण करता आल्या. याशिवाय आतापर्यंत तो दोनवेळा शून्यावर आऊटही झालाय.
 
भारताला फलंदाजी करताना फक्त ओपनिंग नाहीतर मधल्या फळीवरही लक्ष केंद्रीत करावं लागेल. ऋषभ पंत, हार्दीक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या एक-दोन खेळींमुळे भारतीय संघ मधल्या फळीकडे लक्ष देत नाहीये.
 
यापैकी फक्त ऋषभ पंतची कामगिरी आतापर्यंतच्या पूर्ण सामन्यांमध्ये ठीक होती, तर सूर्यकुमार यादवनं दोन तर हार्दीकनं एक अर्धशतक केलंय.
 
मधल्या फळीतल्या खेळाडूंपैकी शिवम दुबे, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा अपयशी ठरताना दिसले. शिवम दुबेला दोन सामन्यामध्ये 30 च्या पुढे धावा काढता आल्या नाहीत. जडेजा एक उत्तम गोलंदाज असला तरी त्याला भारतीय संघात अष्टपैलू समजलं जातं.
 
त्यामुळे गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये त्याची कामगिरी चांगली असावी अशी अपेक्षा असते. पण, या वर्ल्ड कपमध्ये जडेजाला स्वतःची छाप पाडता आली नाही.
 
कोहलीला ओपनिंग देणं चुकीचं आहे का?
गेल्या अनेक वर्षांपासून विराट कोहलीकडे एक सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून पाहिलं जातंय. 2023 च्या वर्ल्ड कप सामन्यातही कोहली संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. याच सामन्यात कोहलीनं सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडला होता.
 
यानंतरच्या आयपीएल सामन्यातही कोहलीनं सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. पण, 2024 च्या T-20 वर्ल्ड कपमध्ये कोहली स्वतःची छाप पाडू शकला नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कोहलीची बॅटींग ऑर्डर समजली जात आहे. टेस्ट, वनडे आणि T-20 या सगळ्या सामन्यांमध्ये कोहली नेहमी तिसऱ्या स्थानावर खेळतो.
 
2010 पासून तिसऱ्या क्रमांकांवर कोहलीची जागा ठरलेली आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला त्यावेळी त्यानं सर्वाधिक धावा काढल्या. सामना जिंकवून देणाऱ्या खेळीसुद्धा त्यानं याच स्थानावरुन खेळल्या आहेत. ओपनर लवकर आऊट झाले तर कोहली मधल्या फळीतल्या खेळाडूसोबत मिळून सामना सांभाळून घेत होता.
 
पण, 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीवर ओपनिंगची जबाबदारी सोपवली आहे. पण, कोहलीची कामगिरी पाहिजे तशी दिसली नाही. अशापरिस्थितीत इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात या अडचणी दूर करणं कर्णधार रोहित शर्मासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.
 
गोलंदाजी आणि फिल्डींगमधली आव्हानं
हा T-20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या मैदानावर खेळला जातोय. या वर्ल्ड कपमधील सगळे सामना पाहिले तर स्कोरिंग कमी होताना दिसतंय.
 
सर्व सामन्यांचा विचार केला तर फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची कामगिरी चांगली होती. पण, भारताच्या बाबतीत हे लागू होताना दिसत नाही.
 
बुमराह वगळता जवळपास सर्वच भारतीय गोलंदाजांनी फक्त एक किंवा दोन सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केलीय.
 
सुपर-8 फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने 11 पेक्षा जास्त इकॉनॉमीसह धावा दिल्या होत्या. रविंद्र जडेजाने देखील 17 पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या.
 
एक-दोन सामन्यांचा अपवाद वगळता अक्षर पटेल देखील प्रति ओव्हरमध्ये सरासरी आठपेक्षा जास्त धावा देत आहे.
 
वेगवान गोलंदाज असलेल्या सिराजला फक्त एका सामन्यात संधी मिळाली आहे. शिवम दुबे प्लेईंग इलेव्हनचा भाग असूनही त्याला आतापर्यंत फक्त एका सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारताची फिल्डींग सुमार होती.
 
क्षेत्ररक्षकांनी अनेकदा कॅच सोडल्या होत्या. यामुळेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शला दोनदा जीवदान मिळालं होतं. त्या सामन्यात मार्शला जास्त धाव काढता आल्या नसल्या तरी महत्वाच्या वेळी खराब फिल्डींग ही भारतासाठी घातक ठरू शकते.
 
नॉकआऊट सामन्यांचा दबाव
2013 नंतर भारत कुठलीही ICC ट्रॉफी जिंकू शकला नाही. विशेषतः वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी खराब दिसली. उदाहरण घ्यायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत अजिंक्य राहत अंतिम सामन्यात पोहोचला होता.
 
पण, घरच्या मैदानावर खेळतानाही भारत अंतिम सामन्याच्या दबावात खेळू शकला नाही आणि पराभव झाला.
 
याआधी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. पण या सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केला होता.
 
आताच्या 2024 च्या T-20 वर्ल्ड कपमध्येही सेमीफायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे.
 
2013 नंतर भारतीय संघानं आयसीसी सामन्यांमध्ये तब्बल 9 वेळा नॉकआऊट खेळी खेळली. यामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी होती त्यावर एक नजर टाकूयात.
 
2014 T-20 वर्ल्ड कप फायनल – श्रीलंकेविरोधात 6 विकेट्सनं पराभूत
2015 वन डे वर्ल्ड कप सेमीफायनल – ऑस्ट्रेलियाविरोधात 95 धावांनी पराभव
2016 – T20 वर्ल्ड कप सेमीफायनल – वेस्ट इंडिजविरोधात 7 विकेट्सनं पराभूत
2017 चॅम्पियन ट्रॉफी फायनल – पाकिस्तानविरुद्ध 180 धावांनी पराभव
2019 वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल – न्यूझीलंड विरोधात 18 धावांनी पराभव
2021 – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल – न्यूझीलंडविरोधात 8 धावांनी पराभव
2022 – T20 वर्ल्ड कप सेमीफायनल – इंग्लंडविरोधात 10 विकेट्सने पराभव
2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल – ऑस्ट्रेलियाविरोधात 209 धावांनी पराभव
2023 वन वर्ल्ड कप फायनल – ऑस्ट्रेलियाविरोधात 6 विकेटने पराभव
या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची कामगिरी
वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंडचा संघ ताकदीनं मैदानात उतरलाय. पण, संपूर्ण सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी संमिश्र राहिलीय.
 
ग्रुपसोबतच्या सामन्यात इंग्लंडचा स्टॉटलंडसोबतचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
 
दुसरा सामना ऑस्ट्रेलियासोबत झाला. पण, इथं इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. पण, सुपर 8 मध्ये इंग्लंडला स्थान मिळविण्यात यश मिळालं. सुपर 8 मध्येही इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला.
 
पण, अमेरिका आणि वेस्टइंडिज यांचा पराभव करत इंग्लंडनं सेमीफायनलमध्ये धडक दिली.
 
पाऊस आला तर काय होणार?
इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामना 27 जून रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होत आहे. वर्ल्ड वेदर ऑनलाईन वेबसाईटवरील माहितीनुसार, आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. संघाचं नियोजन आणि खेळाडूंची कामगिरी याशिवाय आजच्या सामन्यात पाऊसही एक महत्वाचा घटक ठरू शकतो.
 
पावसामुळे सामना खंडीत झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली न झाल्याचं अनेक सामन्यांमध्ये दिसलं आहे.
 
कारण, गेल्या 2019 मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात पाऊस आला होता. भारताचा सामना न्यझीलंडसोबत होता. भारतीय संघानं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी न्यझीलंड संघाला 239 धावांत गुंडाळलं होता.
 
पण, पाऊस आला आणि त्यादिवशीचा सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. राखीव दिवशीही भारतीय संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारताला 221 धावांवरच समाधान मानावं लागलं आणि भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
 
भारतासाठी हा वर्ल्ड कप अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. कारण, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासाठी ही शेवटची टूर्नामेंट असू शकते. भारताला या सेमीफायनल आधी काही गोष्टींवर लक्ष द्यावं लागणार आहे.
 
अशातच गेल्या T-20 विश्वचषकात इंग्लंड संघाने सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा 10 विकेट्सने पराभव केला होता.
 
अशापरिस्थितीत, विश्वचषकावर नाव कोरण्याचं आपलं स्वप्न आणखी काही वर्षांनी पुढे ढकलले जाऊ नये, अशीच अपेक्षा आहे.