रविवार, 26 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: पुणे , गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (11:46 IST)

पुण्यात आज भाजपचा मेळावा

पश्चिम महाराष्ट्रातील 10 हजार कार्यकर्ते सहभागी 
 
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा कार्यकर्ता मेळावा गुरुवारी पुण्यात होतो आहे. या मेळाव्यात पाच जिल्ह्यातून किमान दहा हजार कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
 
पक्षाचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी ओम माथूर, विरोधी पक्षनेते विनोद तावडे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प मेळाव्यात केला जाणार आहे.
 
पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील पक्षाचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी होतील. या खेरीज पुण्यातील नागरिकही सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. गणेश कला क्रीडा मंच सभागृहाची आसन व्यवस्था लक्षात घेऊन तेथे येणार्‍या नागरिकांसाठी एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे. हा मेळावा गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.