Last Modified: मुंबई , बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (11:16 IST)
चहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर मी मुख्यमंत्री होणारच- उद्धव ठाकरे
चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर मी मुख्यमंत्री का होणार नाही, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राज्यात शिवसेनेचा सत्ता येण्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
संपादक संजय राऊत यांनी 'सामना' या वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विशेष मुलाखतीवेळी उद्धव ठाकरे यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आजच्या सामनात उद्धव ठाकरेंची ही रोखठोक मुलाखत वाचता येणार आहे.
शिवसेना आणि भाजपचा घटस्फोट आणि त्यानंतर दोन्ही पक्षात सत्तेची लढाई सुरु झाली. काल प्रचाराची रणधुमाळी संपली आणि मतदान अवघ्या काही तासांवर आले असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकाच्या मनातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांना उत्तरे दिली.
उद्धव म्हणाले, ज्या पक्षासोबत गेली 25 वर्ष एकत्र राहिलो, जय-पराजय पाहिले, त्यांच्यासोबतची जुनी युती तुटल्याचे आपल्याला दुख: आहे, परंतु मी शरण जाणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालानंतरच्या युतीची शक्यताही फेटाळल्याचे संकेत मिळत आहेत.
जर एक चहावाला माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मीही मुख्यमंत्री का होऊ शकत नाही असे सांगत, आपण मुख्यमंत्री बनणारच असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत व्यक्त केला आहे.