शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 14 ऑक्टोबर 2014 (11:13 IST)

प्रचार तोफा थंडावल्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

विधानसभा निवडणूक प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारराजा बुधवारी (15 ऑक्टोबर) दिग्गजांचे भविष्य मतदान यंत्रात बंद करणार असून 19 ऑक्टोबरला फैसला होणार आहे. 
 
288 जागांसाठी 15 ऑक्टोबरला सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरवात होईल. यंदाची निवडणूक ही पंचरंगी लढत ठरणार आहे. पाचही प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. जवळपास सगळ्या पक्षांन प्रचार सभा, कॉर्नर बैठका, रोड शो आणि मतदारांच्या गाठीभेटीला महत्त्व दिले. 
 
शिवसेना आणि भाजपमधील युती तसेच कॉंग्रस आणि राष्ट्रवादीमधील आघाडी तुटल्यामुळे  ऐनवेळी अनेक पक्षांची उमेदवारांची शोधाशोध करताना धांदल उडाली. युती तुटल्यामुळे भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्यभर फिरत होते. आज त्यांनी कोकण दौरा केला. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी पंतप्रधानांनी सभा घेण्याचे यंदा राज्यातील जनतेने प्रथमच पाहिले. 
 
दुसरीकडे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यभर झंजावाती प्रचार दौरा केला.   युती तोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार आणि एकनाथ खडसे यांनी महत्त्वाची भूमिका असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शेवटची प्रचारसभा मुक्ताईनगरमध्ये घेतल्याचे सांगितले जाते.
 
काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रचार सभा घेतल्या. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेतेही आपापल्या मतदारसंघातील प्रचारात व्यस्त होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात प्रचारसभा घेतल्या.   
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा वादग्रस्त वक्तव्यामुळे गाजल्या. राज यांनी बहुतांश सभा रात्री घेतल्या.