भुजबळ, ठाकूर पिता-पुत्र विधानसभेत
विधानसभा निवडणुकीत चौघे पिता-पुत्र उभे होते. त्यातील भुजबळ व ठाकूर पिता-पुत्र निवडून आले आहेत. नारायण राणे व गणेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला. परंतु, त्यांचे पुत्र मात्र विजयी झाले.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज हे अनुक्रमे येवला व नांदगाव मतदारसंघातून विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही भुजबळ पिता-पुत्रांनी आपली विजयी मालिका कायम राखली. राष्ट्रवादीचे गणेश नाईक व त्यांचे पुत्र संदीप हे मागील निवडणुकीत अनुक्रमे बेलापूर व ऐरोली मतदारसंघातून विजयी झाले होते. यंदा गणेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला. तर त्यांचे पुत्र संदीप हे विजयी झाले. काँग्रेस नेते नारायण राणे यांना कुडाळ मतदारसंघातून धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. तर त्यांचे पुत्र नितेश हे कणकवली मतदारसंघातून विजयी झाले. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे वसई मतदारसंघातून विजयी झाले. तर त्यांचे पुत्र क्षितिज हे नालासोपारा मतदारसंघातून जिंकले. मागील निवडणुकीत हितेंद्र उभे राहिले नव्हते. तर क्षितिज हे नालासोपारातून विजयी झाले होते. त्यांनी आपली विजयी मालिका यावेळीही कायम राखली.