शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (11:02 IST)

मतदारांचीही परीक्षा

सोमवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीच प्रचाराच तोफा थंडावल. आज 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी मतदान पार पडत आहे. 288 विधानसभा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. यंदा प्रथमच उणेपुरे तेरा दिवसच राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोगाने दिले होते. त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांची पंचाईत झाली असली तरी जनता मात्र प्रचारकाळ आटोपशीर ठेवल्यामुळे नक्कीच सुखावली होती. यंदाच्या निवडणुकीत युती-आघाडय़ा उभ्या राहू शकल्या नाहीत. याचाच परिणाम म्हणून प्रत्येक पक्षाने आपापली ताकद अजमावून  पाहाण्याचा निश्चय केल्याचे दिसते. यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचारासाठी मुबलकपणे पैसा वापरण्याचे धोरण अवलंबले होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून काँग्रेस-राष्ट्रवादीला नेस्तनाबूतच करून टाकले होते. विधानसभेतही थेट लढत होण्याचीच चिन्हे स्पष्टपणे दिसत असतानाच शिवसेना व भाजप यांचे वैयक्तिक मतभेद उफाळून आले. परिणामी महायुती तुटली. तसेच आघाडीतही बिघाडी झाली. या सर्व घडामोडींमुळे प्रत्येक पक्षातील बंडखोरीवर थोडेफार नियंत्रण मिळवत जागावाटप पार पाडले आणि प्रचाराच मैदानात रणधुमाळी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचार सभांमुळे भाजपमध्ये खर्‍या अर्थाने जान आणली. परंतु पंचवीस वर्षाची राजकीय युती तुटल्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी सोशल मीडियाचा प्रचारासाठी आधार घेतल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मुद्रित आणि दृक्श्राव्य माध्यमांमधूनही पक्षीय प्रचाराचे रण रंगलेले दिसले. निवडणुकीत पैशाचा मात्र प्रचंड वापर झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. चौरंगी आणि मनसेमुळे अनेक ठिकाणी पंचरंगीही लढती होत आहेत. तसेच एमआयएमच्या उमेदवारांनीही काही ठिकाणची जातीय  समीकरणे बदलवली. परस्परांना लक्ष्य करण्यातच प्रचारातील वेळ, श्रम खर्ची पडल्याने साहजिकच जनतेच्या जिव्हाळ्याचे आणि राज्याचा विकासाचे मुद्दे पध्दतशीरपणे बाजूला पडले. जाहिरात तंत्राचा प्रभावी वापर करण्याचा राजकीय पक्षांचा ट्रेंडही जनतेला प्रभावित करणारा ठरू शकतो. प्रचाराच जाहिरातींमधूनही पक्षांनी आपापल्या धोरणात्मक कल्पकतेची चुणूक दाखवून दिली. ‘महाराष्ट्र माझा’ या जाहिरातींनी भाजपने आक्रमक प्रचार आरंभला खरा, परंतु पुढे ते बुमरँग आपल्यावरच उलटत असल्याचे पाहून ते थांबवणे त्यांना भाग पडले. या निवडणुकीत प्रादेशिक पक्षच बाजी मारतील अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजप मात्र केंद्रात सत्तेवर असल्याचा जास्तीत जास्त लाभ उठवू इच्छित होता. म्हणूनच ‘शहातंत्रा’ने विधानसभा निवडणुकीतील डावपेच आखले गेले.

आज सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. त्या पाश्वभूमीवर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदारांना उद्देशून ‘तुमच्या मताची किंमत मीठ-मिरचीइतकी किरकोळ समजू नका, त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेऊ पाहाणार्‍यांइतके कंगाल कोणीच नसेल.’ अशा शब्दात मतदान अधिकाराची महत्ता सांगितली आहे. तसेच ‘..निवडणूक जणू स्वयंवर, ज्वर हाती देणे जीवनाचे बागडोर, त्यासी लावावी कसोटी सुंदर, सावधपणे’ असा उपदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ‘ग्रामगीते’तून देशातील मतदारांना केला होता. त्याचाही आज महाराष्ट्रातील तमाम मतदारांनी जाणीवपूर्वक विचार करायला हवा, त्याअर्थाने मतदारांचीही ही परीक्षाच ठरते.