बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

पंढरीची वारी - कोणी न येथे असे मोठा, कोणी न येथे लहान

वारी हा नुसताच एक शारीरिक प्रवास नसून तो अंतर्मनातल्या भगवंत भेटीस केलेला अध्यात्मिक प्रवास आहे असे मला वाटते.
 
कित्येक अंतर चालत, उन पावसाचा चालणारा खेळ अनुभवत, पायाला चालून होणारा त्रास विसरत, फक्त भगवंत भेटीची आस मनात बाळगत पुढे घेऊन जाणारा असा हा प्रवास आहे. 
wari
ह्या प्रवासा करता काही स्वरचित ओळी 
 
कोणी न येथे असे मोठा
कोणी न येथे लहान
मनातल्या भक्तीचा साठा
विसरवतो भूक तहान.....(१)
 
वारकरी विसरे सण वार
विसरे तो सर्व व्यापार
न आठवे त्यास परिवार 
डोळ्यास दिसे फक्त पंढरीचे द्वार.....(२)
 
माहेर वारकऱ्यांचे असे पंढरीत
अनेक मैल ते येती चालत,
बांधून चालती ते आस मनात
की भगवंत भेटतील त्यांसी पंढरीत....(३)
 
पिता दिसे त्यांसी विठ्ठलात 
माता दिसे त्यांसी रुख्मिणीत 
असाच भाव हा प्रत्येक वारकऱ्यात
माहेरच जणू असे त्यांचे पंढरीत....(४)
 
भोळे भाबडे ते असती मनाचे
मुख दिसता त्यांसी मायबापाचे
भाव जाती अपूर्णत्वाचे 
वाटे, पारणे फिटले लोचनाचे.....(५)
 
दर्शन करुनी गृह वाट धरीसी
विरह दुःख मनात लपविसी
करी विनंती पांडुरंगासी
की पुन्हा बोलवावे तुम्ही पंढरपुरासी ....(६)
वर्षभर पुरेल असे पंढरीच्या वारीचे समाधान आणि गोड आठवणींची शिदोरी घेऊन, परत माघारी जाताना खूप भावूक व्हायला होते. 
wari
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा ह्या पंक्तीची आठवण होऊ लागते, आणि पुढील वारी ची ईच्छा मनात ठेवून मायबापास भक्तिभावे निरोप देऊन व त्यांचा आशीर्वाद घेऊन माघारी परतावे लागते.