रुक्मिणीचे माहेर - कौंडिण्यपूर
रुक्मिणीला लग्न करायचे होते फक्त कृष्णाशीच. आई-वडिलांनी तर स्वयंवराचा घाट घातलेला. काय होणार या चिंतेने ग्रासलेली रुक्मिणी रिवाजाप्रमाणे जगदंबेची ओटी भरायला निघालेली आणि कृष्णाने रुक्मिणीला चक्क त्या जगदंबेच्या साक्षीनेच पळवून नेले. रुक्मीणीचे हे जे माहेर आहे ते म्हणजे कौंडिण्यपूर.
अमरावतीपासून ४१ किमी अंतरावर हे एक छोटेसे गाव आहे. या माहेरी भेट देतांना गंमत वाटते. जहांगिरपुरच्या मारुतीपासून एक रस्ता आत वळलेला आहे. दोन्ही बाजूला हिरवी डोलणारी शेतं आणि नजर जाईल तिथपर्यंत असणारी झाडं यांच्या मधून जाणारा हा रस्ता प्रवासाचा शिण येऊ देत नाही. या सार्यामध्ये रस्ता कधी संपतो हे ही कळत नाही. आणि आपण पोहचतो एका छोट्याशा गावात. कौलारू घरांची दाटी असलेलं नदीच्या काठावरचं टूमदार गाव. या गावाच्या बाजूने वर्धा नदी वाहते. खूप मोठे विस्तीर्ण आणि काहीसे उथळ पात्र नदीचे आहे. या नदीच्या काठावर एका उंच टेकडावर आहे रुक्मिणीचे मंदिर. या टेकडावर जायला दगडी पायर्या आहेत. या पायर्या चढून वर पोहचले की काहीशा ठेंगण्या दरवाज्यातून आपण आत मंदिरात प्रवेश करतो. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर अगदी पारंपरिक मंदिराप्रमाणेच आहे. मंदिरात गाभार्याच्या आधी मोठे ऐसपैस चौकोनी सभागृह आहे. या सभागृहात कार्तिक महिन्यात भरणार्या यात्रेच्या काळात आणि देवीच्या नवरात्रामध्ये किर्तन होतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अच्युत महाराज यांच्यासारख्यांची समाजजागृती करणारी प्रवचने या सभागृहात झाली आहेत.
सभागृहापुढे एक अरुंद असा गाभारा आहे. या गाभार्यात जगदंबेची काळ्या पाषाणातील सुरेख मूर्ती आहे. असं म्हणतात, हे मंदिर आणि अमरावतीचे देवीचे मंदिर हे भुयारी मार्गांनी जोडलेले आहे. या मंदिरानंतर आणखी एक छोटे मंदिर लागते. ते आहे विठ्ठल रुखमाईचे. अंबिका ही इथली कुलदेवता असल्यामुळे आधी तिचे दर्शन घ्यायचे आणि मग विठ्ठल रुखमाईचे दर्शन घ्यायचे अशी प्रथा येथे आहे. या मंदिराभोवती फरश्यांनी बनवलेला ऐसपैस प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपसूकच गावाचं चारही बाजूने दर्शन होतं.
इथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले तेव्हा पूर्वीच्या संपन्न गावाच्या खाणाखुणा दाखविणारे काही अवशेष सापडले. त्यावरून येथे पूर्वी शहर वसले असावे, असा निष्कर्ष काढता येतो. इथे प्रचलित असलेली एक दंतकथा अशी -
रुक्मिणीचा भाऊ रुक्मीने त्याचा मित्र शिशुपालला रुक्मिणी देण्याचा शब्द दिला होता. पण अचानक कृष्णाने येऊन तो डाव उधळून लावला. त्यामुळे संतापलेल्या शिशुपालाने, 'तुझी राजधानी पालथी होईल' असा शाप दिला आणि कौंडिण्यपूर शहरचे शहर पालथे होऊन गाडले गेले. याचा पुरावा देतांना गावकरी असेही सांगतात, जेव्हा उत्खनन केलं तेव्हा ज्या वस्तू सापडल्या त्या सगळ्याच उपड्या घालून ठेवल्यासारख्या होत्या.
असं हे कौंडिण्यपूर! संपूर्ण भारतावर ज्यांच्या जीवनकथांचा प्रभाव आहे, त्या राम आणि कृष्ण ह्या दोन महापुरुषांशी संबंध सांगणारे. हे कृष्णाचे सासर तर आहेच पण रामाचे वडिल दशरथ यांच्या आईचे माहेरही हेच. म्हणजे दशरथाचे आजोळ. असे हे दंतकथांनी गाजलेले टूमदार गाव, आणि रुक्मिणीचे माहेर एकदा तरी जावे असेच आहे.
साभार : 'महान्यूज'