बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (15:17 IST)

उज्जायी प्राणायाम करा, तरुण दिसा

उज्जायी प्राणायामाचा अर्थः
उज्जयी शब्दाचा अर्थ आहे विजयी. या प्राणायामामध्ये वायूवर नियंत्रण मिळवले जाते. त्यात उज्जयी क्रिया आणि प्राणायाम यांच्या मदतीने अनेक गंभीर रोगांपासून बचाव होऊ शकतो. हा प्राणायाम उभे राहून, झोपून आणि बसून केला जातो. 
 
उज्जायी प्राणायाम कसा करावा?
पहिला प्रकारः सुखासनात बसावे तोंड बंद करून नाकाने श्वास घ्यावा. फुफ्फुसे पूर्ण भरेपर्यंत श्वास घ्यावा. काही वेळ श्वास रोखून धरावा. सुरूवातीला जितके शक्य होईल तितके करावे. हळूहळू 1-2 मिनिटांपर्यंत श्वास रोखू शकतो. मग नाकाची डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडावा. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना घशातून घोरल्यासारखा आवाज आला पाहिजे. ही क्रिया पहिल्यांदा 5 वेळा करावी आणि हळूहळू सराव करत ही क्रिया 20 वेळा करावी.
 
दुसरा प्रकारः
घसा आवळून श्वास असा घ्यावा आणि सोडावा जेणेकरून आवाज येईल. पाच ते दहा वेळा श्वास अशाच प्रकारे घ्यावा आणि सोडावा. अशा प्रकारे श्वास घेत जालंधर बंध किंवा कंठ संकुचित करावा. हळूहळू रेचन म्हणजेच श्वास सोडून द्यावा. शेवटी मूलबंध शिथिल करावा. हे सर्व करताना लक्ष विशुद्धी चक्राकडे म्हणजेच कंठाच्या मागच्या बाजूला मणक्यावर केंद्रित करावे.
 
फायदे
नियमितपणे उज्जयी प्राणायामाचा सराव करणार्‍या व्यक्तीवर वयाचा परिणाम दीर्घकाळपर्यंत होत नाही. 
थायरॉईडच्या रूग्णांसाठी हा प्राणायाम उपयुक्त आहे. 
या प्राणायामाच्या सरावाने मानेमध्ये असणार्‍या पॅरा-थायरॉईडस निरोगी राहतात. 
मेंदूला आराम पोहोचवतो.
उज्जयी प्राणायामाचा नियमित सराव केल्यास पचनशक्ती वाढते.
घशातील कफ दूर होऊन फुफ्फुसांचे आजार रोखण्यास मदत होते.
हृदय रूग्णांसाठी हा उपयुक्तप्राणायाम आहे. यामुळे घोरण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

- कीर्ती कदम