सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Updated : मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (13:25 IST)

अशोकवन : रावणाने सीतेचं हरण करून लंकेमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेलं, तिथे आता काय आहे?

ashok vatika
रावणाने सीतेचं हरण करून तिला लंकेला नेल्याचा आणि अशोक वाटिकेत नजरकैदेत ठेवल्याचा उल्लेख रामायणात करण्यात आला आहे. या अशोक वाटिकेला श्रीलंकेत 'सीता एलिया' या नावानेही ओळखलं जातं. रामायणात ज्या अशोक वाटिकेचा उल्लेख करण्यात आलाय ती वाटिका श्रीलंकेच्या मध्यभूमीत स्थित आहे.
 
हा अशोक वाटिकेचा परिसर उंचावर असून नुवारा एलियापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. असं म्हटलं जातं की, या ठिकाणी सीतेचे पहिलं मंदिर बांधण्यात आलं होतं. नुवारा एलियातून निघालं की बदुल्ला नामक रस्ता सुरू होतो. या रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते पर्वतरांगांमध्ये बांधलेलं आहे.
 
असं म्हणतात की, रावणाने सीतेचं हरण करून जवळपास 11 महिने तिला या वाटिकेत लपवून ठेवलं होतं. नंतर हनुमान सीतेच्या शोधात श्रीलंकेत आले. त्यांनी सीतेला अशोक वाटिकेत ज्या ठिकाणी पाहिलं अगदी त्याच ठिकाणी हे मंदिर बांधल्याचं म्हटलं जातं.
 
सीतेच्या मंदिराजवळील एका दगडावर 'हनुमान पदम' नावाचं प्रतीक कोरल्याचं दिसतं. त्या ठिकाणी हनुमानाची मूर्ती स्थापन केली असून दररोज इथली पूजा केली जाते. तसेच, मंदिराजवळ एक सुंदर कुंड आहे. असं म्हणतात की, या ठिकाणी सीता स्नान करायची. मंदिराला भेट देणारे भाविक या पवित्र पाण्यात स्नान करतात, काहीजण आपले हातपाय धुतात.
 
मंदिरासमोरील डोंगर रांगेत हनुमानाच्या चेहऱ्यासारखे आकार दिसतात. भाविकांच्या श्रद्धेनुसार लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन जात असताना डोंगराचा एक भाग याठिकाणी पडला होता. मंदिर व्यवस्थापनाने माहिती देताना सांगितलं की, या भागात आजही अशोकाची झाडं आढळतात, ज्याला 'अशोक वाटिका' म्हणतात मंदिराजवळील परिसरात मोठ्या प्रमाणात अशोकाची झाडे आहेत. हे अशोक वृक्ष विशेषत: मंदिराजवळील नदी आणि ज्या ठिकाणी हनुमान सीतेला भेटले त्याठिकाणी आढळतात. या झाडांवर माकडं राहत असल्याने यातील एखादं माकड हनुमानाचा अवतार असेल अशी भाविकांची श्रद्धा दिसते.
 
मंदिरातील मूर्ती
या मंदिराच्या गाभाऱ्यात राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. सोबतच गणपती, हनुमान आदी देवतांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात. मंदिराचे पुजारी सुदर्शन शर्मा सांगतात की, राम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्वयंभू आहेत. रामायणातील एका श्लोकाप्रमाणे, याच ठिकाणी हनुमानाने सीतेला पहिल्यांदा पाहिलं होतं. ते सीतेला शोधण्यासाठी लंकेत आले होते. मंदिराचे पुजारी सुदर्शन शर्मा सांगतात, की अशोक वनात ज्याठिकाणी हनुमानाचं पहिलं पाऊल पडलं त्याच ठिकाणी त्यांनी सीतेला आपलं विश्वरूप दाखवलं आणि तिच्यापुढे नतमस्तक झाले.
 
पवित्र गंगा  
पुजारी सुदर्शन शर्मा पुढे सांगतात की, "या ठिकाणी जी गंगा वाहते तिलाही पवित्र मानलं जातं. सीतेने या गंगेत स्नान केलं होतं असं म्हणतात. त्यामुळे या नदीला आजही सीतेच्या नावाने हाक मारली जाते. या गंगेला 'सीता बवित्रा गंगा' असं म्हटलं जातं. शर्मा म्हणतात की, "ही अशोकाची झाडं सीतेच्या उपस्थितीचा पुरावा म्हणून आजही उभी आहेत." 
 
मूळ मूर्ती
"अशोक वनातील या सर्व मूर्ती स्वयंभू मूर्ती असल्याचं आढळून आलं आहे. स्वयंभू म्हणजे स्वतः अवतरलेल्या. राम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्वयंभू आहेत." मंदिराचे पुजारी सुदर्शन शर्मा म्हणाले की, इतर मंदिरांमध्ये मूर्तींना अभिषेक केला जातो. पण या मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक म्हणजे प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आणि दुसरी स्वयंभू मूर्ती.
 
भारतीय यात्रेकरूंच्या संख्येत वाढ
सीता अम्मान मंदिरात केवळ श्रीलंकेतील भाविकच नाही तर परदेशी भाविकही मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याचं दिसून येतं. भारतातून भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. भारताच्या उत्तरेकडील राज्यातील अनेक लोक या ठिकाणी भेट देत असल्याचं दिसून येतं. भेट देणाऱ्या भाविकांनी मंदिराविषयी नेमकं काय वाटतं याबद्दल बीबीसी तमिळला आपला अनुभव सांगितला आहे.
 
भारतातून इथे आलेल्या रोणू महत्ता सांगतात की, "आम्ही राम, सीता आणि हनुमान यांच्याबद्दल खूप काही ऐकलंय. त्यातील रामायण आणि सुंदर कांड आम्ही पुस्तकात वाचलं आहे. मला लहानपणापासूनच श्रीलंकेत येऊन अशोक वाटिकेला भेट द्यायची होती. आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आहे."
 
"आताच अशोकवन पाहिलं. इथे खूप सकारात्मक ऊर्जा आहे. इथे येऊन अर्ध्या तासाहून अधिक काळ लोटला, पण इथून निघून जावंसं वाटत नाही. आम्ही हनुमानाचे पाय पाहिले आणि त्यांना नमस्कार केला. माझे डोळे भरून आले. आम्ही राम, सीता आणि हनुमान यांची प्रार्थना केली."
 
या मंदिराला भेट देणाऱ्या विजयवाडा येथील आणखी एक भाविक मदन कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही अशोकवाटिकेला भेट देण्यासाठी आलो आहोत. याच ठिकाणी सीतेने रामाची वाट पहिली. या ठिकाणाला भेट दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. सीतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. तिने या वनात राहून स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे."
 
ते म्हणतात, "आपल्या समोर कितीही संकटं आली तरी आपण सीतेसारखं धाडसी बनून जीवनात यश मिळवलं पाहिजे. हनुमान एवढ्या दुरून इथे आले आणि रामाला सीतेच्या अवस्थेची माहिती दिली, या ठिकाणी भेट देणं हे माझं सौभाग्य आहे." तसेच, आंध्रातील गंगाधर यांनी सीता मंदिराबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
 
"अशोकवनात सीता ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलंय. इथेच हनुमानाने सीतेची भेट घेतली आणि रामाचा निरोप घेतला. इथली नदी पवित्र असून याच ठिकाणी सीतेने स्नान केलं होतं. त्यात खूप थंड पाणी आहे."
 
सीता मंदिरातून अयोध्येसाठी पाठवलेले दगड
अयोध्येत बांधण्यात आलेल्या मंदिरासाठी सीतेच्या मंदिरातून एक दगड पाठवण्यात आला होता. सीता मंदिराचे प्रमुख असलेले खासदार व्ही. राधाकृष्णन यांनी कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तालयामार्फत हा दगड पाठवला होता. 18 मार्च 2021 रोजी हा दगड संसद सदस्य व्ही. राधाकृष्णन यांनी भारतीय उच्चायुक्तांना सुपूर्द केला.
व्ही. राधाकृष्णन सांगतात की,अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीलंकेतून एक दगड पाठवण्यात आला होता.भारत सरकारच्या मदतीने सीतेच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असल्याचंही ते सांगतात. हे ठिकाण रामायणातील सुंदरकांडातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. या मंदिराचा कुंभभिषेक 17 एप्रिल रोजी रामनवमीला होणार आहे. व्ही. राधाकृष्णन सांगतात की, "हे मंदिर प्रसिद्ध असल्याने आजच्या घडीला अनेक भारतीय भाविक दर्शनासाठी इथे येत असतात. त्याचप्रमाणे भारताच्या पंतप्रधानांनी मंदिराच्या कुंभभिषेकला भेट द्यावी यासाठी निमंत्रण पाठविण्यात आलं आहे."
 
इतिहासाचे प्राध्यापक काय म्हणतात?
सीतेचं हरण करून अशोक वाटिकेत कैद करण्यात आलं होतं. मात्र ती जागा हीच आहे का याचे ठोस पुरावे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं इतिहासाचे प्राध्यापक सांगतात. पौराणिक कथेच्या आधारे सीतेला याच ठिकाणी कैद करण्यात आलं होतं. मात्र रामायणात सांगितल्याप्रमाणे श्रीलंकेत अशा घटना घडल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं इतिहासाचे प्राध्यापक सांगतात. 

Published By-Dhanashri Naik