शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (11:29 IST)

चंद्रकांत पाटील: भाजपने एकनाथ खडसे यांचं तिकीट का कापलं, हे मला माहीत नाही : विधानसभा निवडणूक 2019

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट का कापलं गेलं याबद्दल आपल्याला काही माहीत नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी विविध विषयावर चर्चा केली.
 
एकनाथ खडसेंना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा होता. तसंच मी कोथरुडमधून निवडणूक लढवावी हा निर्णयही पक्षश्रेष्ठींचा होता असं चंद्रकांतदादा पाटील यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच्या दिवसात तुम्हाला पुणं मानवतंय का?
 
मी काय उमेदवारीच्या निमित्त पुण्यात आलेलो नाहीये. मी 82 सालापासून पुण्यात येतोय. मी दोन-तीन महिन्यातून एकदा पुण्यात येतोच आहे.
 
विद्यार्थी परिषद, भाजपाचा राज्याचा सेक्रेटरी, राज्याच्या जनसभा असं बारा वर्षं मी कार्यरत आहे. पुणे परिवाराचा आमदार आहे मी. पुणे ग्रॅज्युएटचं हेडक्वॉर्टरच पुणे आहे. लोकांचे काहीतरी गैरसमज आहेत. पुणे विषयात मला काहीच नवीन नाही.
 
पुण्यात राहून पुण्यातलं राजकारण करणं आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून नेतृत्व करणं वेगळं आहे ना?
 
एकूण जी सहा लाख मतदारसंख्या असते, त्यातली तीन लाख पुण्याचीच आहे.
 
तुम्ही आलात आणि मेधा कुलकर्णींवर अन्याय झाला अशी चर्चा झाली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला इथनं निवडणूक लढवायची इच्छा होती की पक्षानं सांगितलं म्हणून तयार झालात?
 
आमच्या पक्षात आम्ही फार शिस्तीत वागतो. आमची इच्छा व्यक्त केली तरी पक्ष जे सांगेल ते आम्ही करतो. विधानसभा निवडणुकांचा विषय झाला, तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 8 जागा शिवसेनेला गेल्या. 2 जागा भाजपाला आल्या. तेव्हा पक्षानंच हा निर्णय केला की पुण्यातून लढावं म्हणून. मला पुण्यात पाठवलं हा वेगळा विषय आहे. पण कुठलाही निर्णय होतो तेव्हा काहीजणांवर अन्याय झालेलाच असतो. न्याय सगळ्यांना देता येत नसतो. हीच वस्तुस्थिती आहे.
 
एका विधानसभेत तुम्हाला दहा तिकिटं देता येत नाहीत ना. मी इथं नसतो आलो तरी पक्षानं कुणालातरी तिकिट दिलंच असतं. म्हणजे ज्यांना हवंय त्यांची नाराजी राहणारच.
 
इथं माणूस नव्हता की पक्षाला तुम्ही इथून लढावं असं वाटत होतं. नेमकं काय झालं होतं?
 
पक्षाकडे माणूस नव्हता असं नाही. पण त्यांना वाटलं मी इथून लढावं.
 
वर्षानुवर्ष भाजपाचे मतदार आहेत तिथून निवडणूक लढवणं म्हणजे काही शौर्य नव्हे, असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले.
 
मी काय करायचं हे माझं नेतृत्व ठरवेल. शरद पवारांनी ठरवण्याची वेळ अजून आलेली नाहीये. तुम्ही तुमचं बघा ना. तुमच्याकडे उमेदवार नाहीये. एवढी हिम्मत होती तर राष्ट्रवादीचा उमेदवार द्यायचा. मग कशी फाईट झाली असती ते पाहिलं असतं. पाटलांना विरोध केला दाखवायचं होतं नुसतं. झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली त्यांनी.
ब्राह्मण महासंघाचा विरोध झाल्यानंतर इतर ब्राह्मण संघांकडून पाठिंबा तुम्हाला मिळाला. जातीचं ध्रुवीकरण होतंय असं तुम्हाला वाटतं का?
 
नाही मला असं वाटत नाही. हा सुशिक्षितांचा आणि समजूतदारांचा मतदारसंघ आहे. इथं लोकं विकासाला मतदान करतात. इथं नेहमीच व्यापक विचार केला जातो. त्यामुळं जातीवर निवडणूक जाणार नाही.
 
एकनाथ खडसेंचं तिकीट नेमकं का कापलं गेलं?
 
आमची एक कार्यपद्धती आहे. आमचा पक्ष म्हणजे समजा 22 मजली बिल्डिंग असेल, तर मला अमुक खोलीनंबर दिलेला आहे. तर त्या खोलीपुरती स्वच्छता पाहण्याचं काम आम्हाला करायचं असतं. बाकी कुणी अस्वच्छ ठेवत असेल तर ते बिल्डिंगचा मालक पाहून घेईल. म्हणूनच मला खडसेंच्या तिकिटाबद्दल काही माहीत नाही.
 
आपण प्रदेशाध्यक्ष आहात, आपलं रेकमंडेशन जरूर जात असेल.
 
माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून करण्याची अनेक कामं आहेत. ती मी चोखपणे पार पाडली आहेत. महाराष्ट्रात एबी व्यवस्थित पोहोचवला, मार्गदर्शन केलं, अगदी शेवटच्या क्षणी फॉर्ममधले बदल करवून घेतले. उमेदवार फायनल करणं आणि जाहीर करणं हा केंद्राचा विषय आहे.
 
विनोद तावडेंचं तिकीट का गेलं असावं, ते तुमचे सहकारी होते. वरिष्ठ मंत्री होते.
 
आमच्याकडे केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आम्ही फॉलो करत असतो. प्रत्येक निर्णयामागे यांच्या डोक्यात काही ना काही गणित असणार याबद्दल आम्हाला विश्वास असतो. भविष्यातल्या या गणिताबद्दल मला काही माहिती नाही.
 
भविष्यात त्यांच्यावर काही जबाबदारी देणार असा त्याचा अर्थ घ्यायचा का?
येईल जबाबदारी कदाचित. आत्ता नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा या सगळ्या मतदारसंघाच्या को-ऑर्डिनेशनची जबाबदारी त्यांना दिली आहे. आणि निर्णय केंद्रातूनच होतो.
 
तुम्ही मघाशी बिल्डिंगचं उदाहरण दिलंत, त्यावरून विचारतो. की बाजूच्या खोल्यांमध्ये कचरा साचलेला होता का?
 
मी असं म्हटलेलं नाही. त्यांना नाकारलं का हे मला माहिती असण्याचं काही कारण नाही. ते माझं काम नाही.
 
शिवसेनेबरोबरच्या युतीमध्ये तुम्ही होतात. पण 50-50 वरून सेनेला 124 वर आणलंत. नेमकं काय झालं याबाबतीत??
 
जे रिजिड नसतात, फ्लेक्झिबल असतात त्यांच्याबरोबर असं होतं. परिस्थितीवर चर्चा होते. उद्धवजी आणि देवेंद्रजी यांच्या चर्चा होत होती आणि ते दोघेही फ्लेक्झिबल होते. संख्येच्या बाबतीत, जागांच्या बाबतीत ते फ्लेक्झिबल होते. म्हणून युती झाली.
 
आमच्या 122 सिटिंग आहेत, 6 अपक्ष आमच्याबरोबर गेली सहा वर्षं आहेत, आमच्या पक्षात प्रवेश केला असे दहाजण, इथेच आमची संख्या 138 होते. 135 जागांमध्ये आमची ओढाताण होते आहे. ते उद्धवजींनी समजून घेतलं. त्यातून हे सोल्यूशन निघालं.
भाजपा निवडणूक 370 लढतंय की स्थानिक मुद्द्यांवर लढतंय?
 
स्थानिक मुद्द्यांवरच आम्ही लढतो आहोत. पण 40 मिनिटांच्या भाषणात आमचा श्रद्धेचा विषय आहे तो आम्ही तीन मिनिटंही व्यक्त करायचा नाही का?
 
कोथरूडमधली वाहतूक कोंडी, जुन्या इमारतींचा विकास, नदीपात्रातला रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे, आठवडाभर पाणी मिळालं पाहिजे यावर आम्ही बोलतो.
 
पण 370 वर बोलण्यासाठी लडाखचे खासदार नामग्याल यांना पुण्यात का बोलवावं?
 
भाजपानं त्यांना बोलावलेलं नाही. शशी रविशंकरांचा एक ग्रूप आहे इथं, त्यांचा एक ट्रस्टपण आहे.
 
त्यांनी बोलावलेलं आहे. सामान्य माणसाला हे खूप आवडतं आहे. आम्हालाही आमच्या भावना आहेत. पण त्या व्यक्त करताना आम्ही विकासापासून लांब गेलेलो नाही.
 
म्हणजेच हा महाराष्ट्रातला भाजपाच्या प्रचाराचा मुद्दा आहे का?
 
भाजपाचा हा प्रचाराचा मुद्दा नाही. तो आमचा आनंद व्यक्त करण्याचा मुद्दा आहे.
 
मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. त्यावेळी 72,000 लोकांना तरुणांना नोकरी देणार असं म्हटलं होतं. पण आजही लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत असं समजतं आहे. ते तरूण नाराज आहेत. हा मुद्दा सरकारला दिसत नाहीये?
 
अत्यंत चुकीची माहिती आहे ही. एसीबीसीला आरक्षण देऊन 13 टक्के रिक्रूटमेंट झाली आहे, दुसरी रिक्रूटमेंट 1800 तलाठी अपॉइंट झाले आहेत. तिसरी रिक्रूटमेंट इरीगेशनची झाली. मराठा समाजाला मिळालेलं नोकरीचं आरक्षण इंप्लिमेंट झालं आहे.
 
72 आहेत की 70 नक्की नाही सांगता येणार. विभागनिहाय माहिती काढावी लागेल. पण माझ्याच विभागात 1800 तलाठी रुजू झाले आहेत.
 
शरद पवार विरूद्ध भाजपा असं निवडणुकीचं वातावरण महाराष्ट्रात का आहे?
 
शरद पवार आमचे शत्रू नाहीत. माझे व्यक्तिशः तर बिलकुल नाहीत. शेताला शेत लागून होणारी ही भांडणं नाहीत. त्यांच्याबद्दल आदरच आहे. इतकी वर्षं हा माणूस काम करतोय. त्यांचं आमचं काही भांडण नाही.
 
निवडणुकीत तुम्हाला समोरचा पक्ष वीक करायचा असतो. त्यासाठी ज्या माणसावर तो पक्ष चालला आहे त्यावरच हल्ला करायला लागतो.
 
सहानुभूतीची लाट येतेय असं राष्ट्रवादी म्हणतेय आणि ईडीनंतर वातावरण तयार झालं होतं. तुमच्या स्ट्रॅटेजिक हल्ल्यांचा त्यांना फायदा होतोय का?
 
असा काही फायदा होत नाहीये. मतदानात ते दिसेलच. लोकांना तथ्य माहिती आहेच. आता ईडीबद्दल बोलायचं, तर लोकांना माहिती आहे की यात शासनाचा काय संबंध ते.
 
पण खडसे म्हणाले की मी बघितलंय तोपर्यंत पवारांचं नाव नव्हतं...
 
कम्प्लेंट करणाऱ्यानं सहा महिन्यांपूर्वी कोर्टात जनहित याचिका दाखल केली तर आधी कसं नाव असेल? मुळात 2010 साली पृथ्वीराज चव्हाणांनी ही चौकशी लावली. आमचा काय संबंध? चव्हाणांनी चौकशी केली, रिपोर्ट केला, बोर्ड बरखास्त झालं. हे सगळंच त्यांच्या काळात झालेलं आहे. मग त्रास दिला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी दिला. आमचा काय संबंध?
 
विरोधी पक्षातले नेते तुमच्याकडे येतायंत त्यांना वेगवेगळ्या चौकशांची भीती दाखवली जातेय आणि भाजपाकडे ओढलं जातंय, या आरोपाबद्दल तुम्ही काय सांगाल?
 
लोक काही आरोप करतायंत. ही माणसं काही घाबरणारी नाहीत. त्यांच्यातल्या तरुण पिढीला वाटतंय, त्यांच्या भविष्याची काळजी वाटतेय. मोदींच्या आणि देवेंद्रजींच्या विकासामुळे आकर्षित होऊन ही लोकं आलीत, त्यांच्यावर असे आरोप म्हणजे अन्याय आहे.
 
विधानसभेची निवडणूक लढवणं हे तुमचं मुख्यमंत्रीपदाकडे पाऊल आहे का?
 
मला काहीही होण्याची कधीही महत्त्वाकांक्षा नव्हती. आमदार होण्याची नव्हती, मंत्री होण्याची नाही आणि मुख्यमंत्री होण्याची तर अजिबात नाही. महाराष्ट्राला देवेंद्रजींसारखा दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री लाभलेला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात जो विकास झालाय तो गेल्या पन्नास वर्षांमध्ये झालेला नाही.
 
मी साईंचा भक्त आहे. ते म्हणतात भाग्य से ज्यादा कुछ मिलता नहीं.
 
तुमच्या भाग्यात मुख्यमंत्रीपद असेल तर?
 
ते मला माहीत नाही. आमदार होताना माहीत नव्हतं. मंत्री होताना अकराला शपथविधी असेल मला नऊला फोन आला. त्यामुळे भाग्यात असेल ते मिळेल. पण मला महत्त्वाकांक्षा बिलकुल नाही, इच्छा नाही, प्रयत्न तर बिलकुल करणार नाही. कारण ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता का विचारायचा?
 
पण तुमच्या पाकिटावर मुख्यमंत्रीपद लिहिलं असेल तर तुम्ही ते पाकीट घ्याल का?
 
प्रत्येक सेकंदाचे हिशोब ठरलेले आहेत असं मला वाटतं. आत्तासुद्धा ठरलेलं होतं म्हणून आपण भेटलो. काल का नाही भेटलो, कारण काल ठरलं नव्हतं. तसंच आहे हे.