रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (18:03 IST)

कोरोना लॉकडाऊन : मुंबई, पुणे, नागपूर आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांत कोणते निर्बंध आहेत?

पुण्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.तसंच अत्यावश्यक सेवा वगळता इतर ऑफिसेस 50 टक्के क्षमतेने आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.

नागपूरमध्ये 21 मार्चमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे, तर पुणे - साताऱ्यात नाईट कर्फ्यू आहे.
राज्यामध्ये लग्नकार्यांसाठी 50 जणांना हजर राहता येईल तर अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांची मर्यादा घालण्यात आली आहे.
 
मुंबईमध्ये काय निर्बंध आहेत?
मुंबईमध्ये लॉकडाऊनची शक्यता नाही, शहरामध्ये बेड्स रिकामे असून बहुसंख्य रुग्ण एसिम्प्टमॅटिक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय. मास्क न वापरणाऱ्या 20 लाख लोकांवर मुंबईत कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
भारतात कोरोना लसीकरण वाढलं तरीही रुग्णांची संख्या का वाढत आहे?
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
मुंबईसाठीच्या नवीन कोव्हिड गाईडलाईन्स सोमवारी (15 मार्च) रात्री जाहीर करण्यात आल्या.
मुंबईतली सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्स सिनेमागृह आणि हॉटेल्स 50% क्षमतेने काम करतील.
कोणत्याही प्रकारच्या सामाजिक, राजकीय वा धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
लग्न समारंभाला फक्त 50 जणांना हजर राहता येईल.
अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांनाच एकत्र येता येईल.
आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं 50% कर्मचारी संख्येने काम करतील.
ज्यांना शक्य असेल त्या सगळ्यांनी घरून काम करावं.
 
पुण्यामध्ये काय निर्बंध?
पुण्यामध्ये शाळा - महाविद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद राहतील. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना यातून वगळण्यात आलंय.
सोबतच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यतली हॉटेल्स दिवसभर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील व रात्री 10 वाजेपर्यंतच उघडी असतील.
रात्री 10 ते 11 फक्त पार्सल सेवा सुरू राहील.
बार, सिनेमागृह, फूडकोर्ट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू राहतील. शॉपिंग मॉल्सही 10 वाजेपर्यंतच सुरू असतील.
रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत शहरात नाईट कर्फ्यू असेल.
पुण्यातल्या बागा सकाळी व्यायामासाठी सुरू असतील, पण संध्याकाळी बंद राहतील.
अंत्यसंस्कारांना 20 जण उपस्थित राहू शकतील.
सोसायटीमधील क्लब हाऊस बंद राहतील.
MPSCचे क्लास, लायब्ररी 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
 
नागपूरमध्ये कोणते निर्बंध?
नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था ( कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) आणि इतर तत्सम संस्था बंद असतील पण ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवता येतील.
राष्ट्रीय/राज्य/विद्यापीठ/शासन स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा कोव्हिड विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येतील.
नागपूर शहर सीमेत कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करता येणार नाही.
नागपूर शहरातील संबंधित सभागृह/मंगल कार्यालयं/लॉन याठिकाणी होणारे लग्न समारंभाचं आयोजन करता येणार नाही.
धार्मिक/पूजाअर्चनेची स्थळं नागरिकांना दर्शनासाठी बंद राहतील. सदर स्थळाची नियमित पूजा, अर्चना/ साफसफाई विषयक दैनंदिन कामं जास्तीत जास्त 5 व्यक्तीच्या उपस्थितीच्या मर्यादेत करण्यास मुभा राहील.
नागपूर शहरातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
रेस्टॉरंट/ हॉटेल/खाद्यगृह मधील प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलीव्हरी ठेवण्याची मुभा राहील आणि त्यासाठी किचन रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील.
तरणतलाव (Swimming Pools) बंद राहतील.
सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन बंद राहतील.
सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय (अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालय वगळून) त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरू ठेवता येतील.
सर्व खाजगी आस्थापने/कार्यालय पूर्णपणे बंद राहतील. (आर्थिक लेखाविषयक सेवेशी संबंधित वगळून)
मॉल्स, चित्रपटगृहे/नाट्यगृहे बंद राहतील.
दुकाने, मार्केट बंद राहतील.
नागपूर शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद राहतील.
व्यायामशाळा / जिम बंद राहतील.
 
ठाणे शहरात काय निर्बंध?
ठाणे शहरातल्या 16 हॉटस्पॉट्समध्ये लॉकडाऊन आहे. 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत हा लॉकडाऊन असेल.
हे हॉटस्पॉट्स असे :
आईनगर कळवा
सूर्यनगर विटावा
खारेगाव हेल्थ सेंटर
चेंदणी कोळीवाडा
हिरानंदानी इस्टेट
लोढा
रुनवाल गार्डनसिटी बाळकुम
लोढा अमारा
शिवाईनगर
दोस्ती विहार
हिरानंदानी मेडोज
पाटीलवाडी
रुनवाल प्लाझा
रूनवालनगर, कोलवाड
रुस्तमजी, वृन्दावन स्टॅाप
 
औरंगाबादमधले निर्बंध
औरंगाबादमध्ये 11 मार्च ते 4 एप्रिल काळात अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात येतोय.
याकाळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा बंद असतील.
आठवडी बाजारही बंद असतील.
वीकेंडला - शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल. पण याकाळात वैद्यकीय सेवा, माध्यमांची कार्यालये, दुध विक्री, भाजीपाला आणि फळविक्री सुरू असेल.
 
नाशिकमध्ये कोणते निर्बंध?
नाशिकमध्ये 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
नाशिक, निफाड, नांदगाव आणि मालेगावमधली शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. 10वी आणि 12वीचे वर्गही बंद करण्यात आलेत.
शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
बार, खाद्यपदार्थांची दुकानं 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
नाशिक शहरामध्ये मंगलकार्यालयं वा लॉनवर लग्न समारंभ आयोजित करण्यास बंदी आहे. घरगुती लग्नसोहळ्याला 50 जणांना उपस्थित राहता येईल.
 
अमरावतीमध्ये कोणते निर्बंध?
अमरावती जिल्ह्यात 6 मार्च पासून लॉक डाऊन हटवण्यात आला आहे.  मात्र कोरोना संसर्गाला ब्रेक लागण्यासाठी जिल्ह्यात काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. लॉकडाऊन नसला तरी बाजारपेठा उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सगळी दुकानं आणि आस्थापनं सकाळी 9 ते 4 खुली असतील.
अत्यावश्यक सेवा पूर्णपणे आणि इतर कार्यालयांच्या सेवा 15 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहतील.
सुरक्षित अंतर, मास्क आणि स्वच्छता न पाळणाऱ्या दुकानं 5 दिवस सील केली जातील आणि त्यांना 8,000 रुपये दंड भरावा लागेल.
आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक आहे. नो मास्क, नो एन्ट्री पद्धत राबवणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉजिंग सेवा २५ टक्के क्षमतेत सुरू राहतील. ग्राहकाला रुममध्ये सीलबंद जेवण सेवा द्यावी लागेल. त्यात नियमभंग झाल्यास १५ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाणार आहे.
उपाहारगृहं, हॉटेल्सना केवळ पार्सल देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वीकेंड लॉकडाऊनला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे तर गरज पडल्यास विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू लागू करण्यात येईल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
 
सोलापूर आणि साताऱ्यात कोणते निर्बंध?
साताऱ्यामध्ये 7 मार्चपासून रात्रीची संचारबंदी लावण्यात आलीय. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू आहे. शहरातलं कोव्हिड टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं असून, मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येतेय.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये नाईट कर्फ्यू वा इतर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. पण लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारांसाठीची मर्यादा तिथेही लागू असेल.