बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (20:56 IST)

सायरस पुनावाला : स्पोर्ट्स कारचं मॉडेल तयार करणारे सायरस पूनावाला लस निर्मितीकडे कसे वळाले?

सायरस पुनावाला यांना आपण सिरम इन्सिट्युटचे संस्थापक म्हणून ओळखतो परंतु सिरमच्या आधी त्यांना स्पोर्ट्स कार तयार करायच्या होत्या हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही.
 
'कुमी कपूर' यांनी लिहिलेल्या 'द टाटाज, फ्रेडी मरक्युरी अॅण्ड ऑदर बावाज' या पुस्तकात सायरस पूनावाला यांच्या या प्रवासाबाबत सांगण्यात आलंय.
 
सायरस पुनावाला यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पोर्ट्स कार तयार करायचे ठरवले होते. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या शालेय मित्रांसोबत एका स्पोर्ट कारचं मॉडेल तयार केलं. परंतु त्याला व्यावसायिक स्वरूप देणं त्यांना त्यावेळी शक्य नव्हतं. त्यामुळे ती कल्पना त्यांनी रद्द केली.
 
त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की भारतातील श्रीमंत लोकांसाठी एखादी गोष्ट तयार करण्यापेक्षा भारतातील सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाची वस्तू आपण तयार करायला हवी आणि त्यातूनच पुढे सिरम इंन्स्टिट्यूटची स्थापना सायरस पूनावाला यांनी केली.
 
सायरस पुनावाला यांना उद्योग क्षेत्रामधील त्यांच्या कामगिरीबाबात पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी 2005 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
 
सिरम इंन्स्टिट्युटची सुरुवात सायरस पुनावाला यांनी केली होती. सिरम सध्या जगातील सर्वाधिक लशींचे डोस निर्माण करणारी कंपनी आहे.
 
कोरोनावरील कोव्हिशिल्ड ही लस सिरममध्येच तयार करण्यात आली आहे.
 
सिरम इंस्टिट्यूट कसे स्थापन झाले
 
सिरमच्या स्थापनेचा इतिहासही तितकाच रंजक आहे.
 
पुनावाला कुटुंबियांचा घोड्यांची पैदास आणि त्यांच्या शर्यतीचा व्यवसाय होता. 'पुनावाला स्टड फार्म' हे त्यांच्या कुटुंबियांच रेसिंग सर्किट देखील होतं. परंतु या व्यवसायाला भारतात भविष्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं.
 
पुनावाला यांच्या स्टड फार्ममधून निवृत्त झालेल्या घोड्यांना सरकारच्या हाफकीन इन्सिट्युटला लस तयार करण्यासाठी देण्यात येत होतं.
 
हाफकिन घोड्याच्या सिरममधून अर्थात घोड्यांच्या रक्ताच्या द्रवातून लस तयार करत होतं. आपण दिलेल्या घोड्यांमधून जर हाफकिन लस तयार करत असेल तर आपणच का नाही लस तयार करायची हा विचार करून 1966 साली पुण्यात पुनावाला यांनी सिरम इंन्सिट्युट ऑफ इंडियाची स्थापना केली.
 
"आम्ही आमचे हे शर्यतीतून बाद झालेले घोडे ब्रिडिंग स्टॉक म्हणून मुंबईच्या हाफकीन इन्स्टिट्यूटला देत होतो. एका डॉक्टरनं मला म्हटलं की तुमच्याकडे घोडे आहेत, जमीन आहे. तुम्हाला जर लस निर्मितीमध्ये उतरायचं असेल तर फक्त एक प्रोसेसिंग प्लांट उभारावा लागेल," असं सायरस पूनावाला त्यांच्या इंडिया टुडे टिव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगतात.
 
सिरमची स्थापना झाल्यानंतर दोनच वर्षात सिरमने टिटॅनसवरील लस तयार केली. टिटॅनसचीच लस का सुरुवातीला तयार केली याचं कारण देखील पूनावाला यांनी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
 
त्या मुलाखतीत पूनावाला म्हणाले की ''ज्या काळात आम्ही सिरम सुरू केली त्यावेळी टिटॅनसच्या लसींचा मुबलक पुरवठा होत नव्हता. त्यामुळे अनेक बाळांचे जीव जात होते. त्यामुळे टिटनची पहिली लस तयार करायची हे तेव्हाच ठरवलं होतं.''
 
पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये हाफकीनमधलेही अनेक संशोधक सिरमकडे आले. गोवर, गालगुंड यांच्यावर प्रभावी असणाऱ्या लशी 1971 मध्ये तयार करण्यात आल्या.
 
देवी आणि पोलिओचं निर्मूलन करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या लसी या सरकारी संस्थांमध्ये तयार करण्यात येत होत्या. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये सिरमला संधी दिसत होती. युरोप, अमेरिकेतून नवं तंत्रतज्ञान आणून सिरमने उत्पादन वाढवलं. त्यामुळे या लशींच्या किंमती देखील कमी झाल्या.
 
1994 साली जागतिक आरोग्य संघटनेकडून लस निर्मितीसाठी सिरमला मान्यता मिळाली. 2000 सालापासून जगातील प्रत्येक दुसऱ्या मुलाला सिरमची लस दिली जाते असा दावा देखील सिरमकडून करण्यात येतो.
 
सायरस पूनावाला लस निर्मितीकडे कसे वळाले याचा एक किस्सा सिरम इंन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव इंडिया टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगतात.
 
जाधव या मुलाखतीत म्हणतात, "सायरस पुनावाला यांनी 1964 मध्ये बी कॉम केलं. घोड्यांची पैदास करुन त्यांना रेससाठी तयार करणं हा त्यांचा वडीलोपार्जित व्यवसाय होता. तो त्यांनी सांभाळण्याचा निर्णय घेतला. पण हा व्यवसाय भारतात फार टिकेल असं त्यांना वाटलं नाही. त्यामुळे दुसरा कुठला तरी व्यवसाय करण्याचा ते विचार करत होते."
 
"त्यांची रेसची एक घोडी होती. तिला एकदा साप चावला. त्यासाठी त्यांना अॅण्टी सिरम हवं होतं. त्यांनी त्यावेळी हाफकिन इंन्स्टिट्युटला संपर्क केला. ते सिरम मिळण्यासाठी त्यांना अडचणी आल्या. त्यातच त्या घोडीचा मृत्यू झाला. पुनावाला यांनी हाफकीनला 200 ते 300 घोडे लस निर्मितीसाठी दिले होते. परंतु जेव्हा गरज होती तेव्हा त्यांना लस वेळेवर मिळाली नाही. तेव्हा त्यांना वाटलं की आपणच लस तयार करायला हवी."
 
लस निर्यातीवर बंदी आणि सायरस पूनावालांची सरकारवर नाराजी
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टकडून देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 या वर्षी सायरस पूनावाला यांना देण्यात आला होता.
 
त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्र सरकारने लशीच्या निर्यातीला घातलेल्या बंदीवर नाराजी व्यक्त केली होती. पूनावाला म्हणाले होती "निर्यात बंदी करुन मोदी सरकारने फार वाईट केले आहे. 150 हून अधिक देश आत्तापर्यंत आमची लस घेत आलेत. त्यांनी कोव्हिडच्या लशीची मागणी केली आहे. त्यांनी अॅडव्हॉन्स देखील दिला आहे."
 
शरद पवार आणि पुनावालांची मैत्री
शरद पवार आणि सायरस पुनावाला हे वर्गमित्र होते. पुण्यातील बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) त्यांनी बी कॉमचं शिक्षण एकत्र घेतलं.
 
पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्वीट करत शरद पवार यांनी आपल्या वर्गमित्राला हा पुरस्कार मिळत असल्याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.
 
16 डिसेंबर 2019 ला पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळांना सायरस पूनावाला आणि विलू पूनावाला अशी नावं देण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला शरद पवार आणि सायरस पूनावाला दोघे उपस्थित होते.
 
या कार्यक्रमात शरद पवारांनी सायरस पुनावाला यांच्याबाबतच्या अनेक गमती जमती सांगितल्या. पवार म्हणाले होते की "सायरस आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. अभ्यास सोडून इतर विषयातच आम्हाला रस होता. त्यामुळे आम्हाला 4 ऐवजी 5 वर्षं लागली. पण दोघेही आपआपल्या क्षेत्रात देशात आणि देशाबाहेर पोहचलो. लस निर्मितीत पुण्याचं नाव जगभर झालं ते सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्युटमुळे."
 
पुण्यातल्या पुण्यभूषण फाउंडेशनकडून पुण्यभूषण पुरस्कार दिला जातो. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. 2014 साली सायरस पूनावाला यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. पुण्यभूषण फाऊंडेशनचे डॉ. सतीश देसाई यांनी पुनावाला यांचं काम जवळून पाहिलं आहे. पुनावालांचे अनेक किस्सेही ते सांगतात.
 
देसाई म्हणाले, "बीएमसीसीमध्ये असताना अत्यंत मिश्किल विद्यार्थी म्हणून सायरस पुनावाला ओळखले जायचे. एकदा ते वर्गात मागच्या बाकावर झोपले होते. तेव्हा त्यांचे शिक्षक चिडून म्हणाले उद्या कॉट घेऊन ये कॉलेजमध्ये झोपायला. दुसऱ्या दिवशी सायरस खरंच कॉट घेऊन आले. शिक्षकाने विचारलं तर ते म्हणाले तुमचीच आज्ञा होती."
 
सायरस पुनावाला आणि कार
सायरस पुनावाला यांना महागड्या गाड्यांची आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. अशीच एक कार ते पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याला घेऊन आले होते. त्यावेळचा किस्सा सांगताना देसाई म्हणाले, "एका पुण्यभूषण पुरस्काराच्या सोहळ्यात सायरस पूनावाला सहा दारं असलेली गाडी घेऊन आले होते. त्यांची ती गाडी पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.''
 
"जेव्हा सायरस पूनावाला यांना पूण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा शरद पवार देखील त्या सोहळ्याला उपस्थित होते. पूनावाला यांना मिळालेल्या पुरस्काराच्या एक लाखाच्या रकमेत त्यांनी स्टेजवरच आणखी दहा लाख रुपये घालत असल्याचे सांगत ही रक्कम एखाद्या संस्थेला देण्यात यावी असं म्हणून त्यांनी तो चेक शरद पवारांकडे सूपूर्त केला होता.
 
"त्यावेळी बाबा आढाव सभागृहात येत होते, लागलीच शरद पवारांनी तो चेक बाबा आढावांच्या संस्थेला दिला होता," असंही देसाई सांगतात.