गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

महिलांच्या लैंगिक सुखातल्या असमानतेवर चर्चा करायला आपण तयार आहोत का?

- प्रियांका दुबे
गेल्या आठवड्यात ट्विटरवर ट्रेंड होत असलेल्या #orgasminequality या हॅशटॅगने अनेकांचं लक्ष वेधलं.
 
कॉन्डोम बनवणाऱ्या एका कंपनीच्या 'orgasm inequality' म्हणजेच संभोगादरम्यानच्या परमसुखासंबंधी चालवलेल्या एका मोहिमेविषयी अभिनेत्री स्वरा भास्करने केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय.
 
मात्र, या प्रकरणाने भारतात महिलांचं 'लैंगिक आरोग्य' आणि 'कामभावनेतल्या समानतेशी' संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
'संभोग असमानते'विषयी बोलताना स्वरा भास्कर यांनी एका सर्वेक्षणाच्या आधारे भारतात 70% स्त्रिया संभोग करताना ऑरगॅझमपर्यंत पोचत नसल्याचं म्हटलं. या वक्तव्यानंतर ताबडतोब दोन गोष्टी झाल्या.
 
पहिलं म्हणजे ट्विटर-फेसबुकसारख्या सोशल मीडियावर त्यांच्यावर अश्लाघ्य शब्दात टीका करण्यात आली. त्यांना सेक्सिस्ट ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दुसरं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात पहिल्यांदाच 'संभोग असमानते'सारख्या गंभीर आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली.
 
हा मुद्दा सोशल मीडियावर मांडण्याला काही महिलांनी 'धाडस' म्हटलं तर काहींनी याला 'भीती, दुःख आणि विषण्णता'. काहींनी याविषयावर सभ्य भाषेत बोलण्यासाठी गरजेची शब्दसंपदाच नसल्याचा विषयही मांडला.
 
आठवडाभरापासून सोशल मीडियावर हा विषय चर्चिला जातोय. यावरून एक मुद्दा तर स्पष्ट होतो. भारत 'संभोग असमानते'वर बोलायला तयार आहे का?
 
या क्लिष्ट प्रश्नाच्या उत्तराचा शोध मला गेल्या दशकभरात लंडनपासून ते लखनऊ आणि लखीसरायपर्यंत माझ्या मैत्रिणींशी झालेल्या संवादापर्यंत घेऊन गेला.
 
मला आठवतंय 2016 च्या ऑक्टोबर महिन्यातली एक दमट संध्याकाळ होती. माझी एक मैत्रीण ऑफिसच्या खाली वर्तमानपत्र चाळताना अचानक आश्चर्यचकित झाली.
 
मग तिने मला एक बातमी दाखवली. ती बातमी होती सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात म्हटलंय की नवऱ्याला दिर्घकाळ संभोगासाठी नकार देणं 'क्रूरता' आहे आणि घटस्फोट मागण्याचा आधारही.
 
ती उपहासाने म्हणाली, "स्त्रिने पुरुषाला नकार देणं क्रूरता आहे आणि पुरूष जो अनेक वर्षं आपल्या स्त्रिच्या ऑरगॅझमचा विचार करत नाही, त्याचं काय? ती क्रूरता नाही?"
 
एकोणीसाव्या शतकादरम्यान सर्वात प्रथम स्त्रिच्या लैंगिकतेला 'निष्क्रियते'शी जोडणारे डॉक्टर सिग्मंड फ्रॉयड यांनी कदाचित स्वतःही कधी विचार केला नसेल की येणाऱ्या संपूर्ण एका शतकापर्यंत स्त्रिच्या लैंगिकतेला केवळ बाळ जन्माला घालण्याशी जोडून बघितलं जाईल.
 
मात्र, 2019 च्या भारतात माझ्यासोबत लहानाच्या मोठ्या झालेल्या नोकरी करणाऱ्या किंवा न करणाऱ्या अनेक स्त्रिया 'स्त्री निष्क्रियते'शी संबंधित सर्व विचारांना 'सरंजामी विचारसरणीच्या पुरूषाची परिकल्पना' असल्याचं सांगत म्हणतात की अनेकदा त्यांच्या पुरूष जोडीदाराची ऊर्जा त्यांच्या ऊर्जेची बरोबरी करू शकत नाहीत.
 
एक विवाहित आणि जुनी मैत्रीण याला पितृसत्ताक दृष्टीकोनाशी जोडते. ती म्हणते, "माझा अनुभव आहे की मुलीने सेक्समध्ये जराही रस दाखवला तर तिच्यावर जन्मोजन्मी प्रेम करण्याचा दावा करणारा तिचा पुरूष जोडीदारच सर्वात आधी तिच्याकडे संशयाने बघतो. एकीकडे पुरूष प्रेमाच्या 26 कला सांगत बेडरुममध्ये 'माचो' बनतो. मात्र, तेच जर स्त्रिने एखादवेळी ऑरगॅझमची मागणी केली तर ती 'स्लट' होते."
 
ती म्हणाली, "भारतीय समाजाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण मुकाट्याने आपलं शरीर सेक्ससाठी पुरूषांना अर्पित करावं आणि कुटुंबाच्या मर्जीने त्यांना हवी तितकी मुलं जन्माला घालावी. मात्र 'स्वतःला मुलं जन्माला घालण्याच्या मशीनव्यतिरिक्त एक व्यक्ती' म्हणून आपण जर शरीर सुखाची मागणी केली तर आपल्यावरच दुःखाचा डोंगर कोसळतो."
 
दिर्घकाळ एका असमाधानी विवाहबंधनात राहिल्यानंतर अवघड घटस्फोटातून गेलेल्या माझ्या एका परिचित मुलीचं म्हणणं आहे, "स्त्रियांनीही त्यांच्या दिर्घकाळ लैंगिक उपेक्षेला कायदेशीरपणे विभक्त होण्याचा आधार बनवायला हवं."
 
स्त्री-पुरूष यांच्यातल्या संबंधाला काळं-पांढरं या दृष्टीकोनातून बघितलं जाऊ शकत नाही. ही एक अत्यंत संवेदनशील, क्लिष्ट आणि ग्रे-स्पेस आहे. वरवर बघता भारतात स्त्रियांची मानसिक जडणघडण त्यांना पारंपरिकरित्या हेच शिकवते की तिने वर्षानुवर्ष शारीरिकदृष्ट्या अतृप्त राहूनही एक दुःखी सांसारिक आयुष्य जगावं, मुलांना जन्म देत रहावं. मात्र, आपल्या सुखासाठी चकार शब्दही काढू नये.
 
एकीकडे पुरूष संभोगाला अधिकार असल्याचं सांगत नकार दिल्यास घटस्फोटाची मागणीही करतात तर दुसरीकडे आपल्याकडच्या स्त्रियांना संभोगातलं परमसुख (ऑरगॅझम) काय आहे, हेदेखील माहिती नाही. शिवाय हा इतका संवेदनशील मुद्दा आहे की शरीरिक अतृप्तीमुळे विभक्त व्हायचंय, हे तुम्ही कुणालाच थेट सांगू शकत नाही. कारण कुणी हे कारणच मान्य करणार नाही.
 
आपण घरगुती हिंसाचारासारख्या डोळ्यांना दिसणाऱ्या हिंसेलाच हिंसा मानतो, हे क्लेशदायी आहे. खरंतर कुठल्याही एका जोडीदाराला दिर्घकाळ परमसुखापासून वंचित ठेवणंदेखील एकप्रकारची हिंसाच आहे.
 
आता खरा प्रश्न हा आहे की एकीकडे महिलांविरोधात दरवर्षी वाढत असलेल्या लैंगिक/घरगुती हिंसाचाराची आकडेवारी आणि 'संभोग असमानता' यावर आवाज उठवतच त्यांच्या युक्तीवादावर चारित्र्याचं सर्टिफिकेट चिकटवून त्यांना स्लट-शेम करत त्यांचा युक्तीवाद फेटाळणाऱ्या भारतीय समाजाच्या या विरोधाभासाच्या मुळाशी आहे तरी काय?
 
उत्तर आहे - पितृसत्ताक आणि सरंजामी विचारसरणी
 
पुरूष हा स्त्रीला तर नियंत्रित करू पाहतो. मात्र, त्यासोबतच तिच्या कामभावनेलाही नियंत्रित करू पाहतो. एकूणच भारतीय समाजाला त्याच्या आत दडलेल्या हिंसेवर परस्पर प्रेमाने विजय मिळवण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.