शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (19:37 IST)

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे 91 वर्षी वृद्धपकाळाने पुण्यात निधन झाले. पुण्यातील बाणेर भागातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील पहिल्या एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते.
 
पी.बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्तवपूर्ण निकाल दिले. 2002 मधील गुजरात दंगलीच्या चौकशी समितीचे ते सदस्य होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. प्रकृतीच्या कारणांमुळे नंतर त्यांनी अध्यक्षपद सोडले होते.
 
1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 1989 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जून 1982 मध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशी सावंत यांच्या मार्फत झाली होती
 
''पी. बी. सावंत हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या खासगी जीवनात, सार्वजनिक जीवनात, वकील म्हणून, न्यायमूर्ती म्हणून ते नेहमीच आदर्श होते. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. माझी त्यांची 50 वर्षांची मैत्री होती. असा माणूस पुन्हा होणे नाही. आम्ही कायमच एकत्र होतो. विविध प्रश्नांवर त्यांनी दिलेले निर्णय प्रसिद्ध आहेत,''अशी प्रतिक्रिया माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्वीट करून पी. बी. सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.
 
''ज्यांनी दिलेला प्रत्येक निवाडा हा केवळ निर्णय नव्हता तर न्यायसंस्थेबद्दली विश्वासार्हता आणि आदर वाढवणारा न्याय होता'' अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.