शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (11:44 IST)

LGBTQ : 'मी मुलगी आहे आणि मुलीशी लग्न केलं तर काय अडचण आहे?'

- सुशीला सिंह
'आम्ही दोघींनी लग्न केलं आहे तर लोक आमच्यावर नाराज का आहेत? मुलीने मुलीशी तर लग्न केलंय. यामुळे गाववाल्यांना काय अडचण आहे?'
 
असं सांगून प्रिया मला विचारते, 'तुम्ही आमची काय मदत करणार?'
 
मी थोडं थांबून सांगितलं,"तुमचं लग्नच कायदेशीरदृष्ट्या वैध नाही".
 
फोनवर काही सेकंद शांतता पसरली. अनेक प्रश्न तिने मला विचारले आणि म्हणाली, 'आम्ही प्रेम केलं तर आयुष्य फुकट गेलं का?'
 
प्रियाचं लतावर प्रेम आहे (दोघींचीही नावं बदललली आहेत) दोघींची गावं एकमेकांपासून जवळच आहेत.
 
प्रिया बेलदारी किंवा मनरेगाच्या कामातून मिळणाऱ्या पैशावर गुजराण करते. प्रियाच्या आईवडिलांचं निधन झालं आहे. ती भाऊ, बहीण, वहिनी यांच्याबरोबर राहते.
 
प्रिया सांगते, "मी लताला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच प्रेम जडलं. आम्ही पहिलीपासून एकत्र शिकलो आहोत. शाळेत तिला एखादा मुलगा छेडू लागला, त्रास देऊ लागला तर मी तिच्या मदतीला जात असे".
 
प्रिया बोलताना स्वत:ला एखाद्या मुलासारखं भासवते. लता मात्र लाजाळू, शांत जाणवते. लता फोनवर बोलताना सांगते की, आजूबाजूला घरचे आहेत, मला मोकळेपणाने बोलता येणार नाही.
 
लहानपणापासूनचं प्रेम
ती सांगते, " आमचं प्रेम पहिलीपासून होतं. सातवीत थोडं कळू लागलं तेव्हा एकमेकांविषयी वेगळं प्रेम वाटू लागलं. शाळेत एकत्र असणं, बाजारात एकत्र जाणं-येणं. प्रिया आठवीपासून बेलदारीचं काम करते आहे. त्या पैशातून ती माझ्यासाठी कपडे, मिठाई, चॉकलेटं आणत असे".
 
"तिला कुठेही जायचं असेल तर ती मला घेऊन जायची. आम्हाला एकमेकींपासून दूर राहणं शक्य होत नसे. आम्ही जितका वेळ दूर असायचो, भेटण्याची आस जास्तच जाणवत असे. कोणालाही आमच्या प्रेमाबद्दल काहीही माहिती नव्हतं. शाळा झाल्यावरही आम्ही रोज भेटायचो".
 
आठवीपर्यंत सगळं ठीक सुरू होतं, असं प्रिया सांगते मात्र त्यानंतर दोघींना वेगवेगळ्या शाळेत प्रवेश मिळाला. यावेळी प्रिया लतावर नाराज झाली. लताने आईवडिलांना प्रिया जात असलेल्या शाळेत प्रवेश घ्यायला का सांगितलं नाही असा तिचा राग होता.
 
काही दिवसांसाठी दोघींनी एकमेकींशी बोलणं बंद केलं. त्याच काळात एक मुलगा लताला त्रास देऊ लागला असं प्रियाचं म्हणणं आहे. प्रियाला ही गोष्ट कळली आणि तिने तक्रार केली. मात्र यात लतावर उलटे आरोप करण्यात आले. तिच्या चारित्र्यावरही शंका घेण्यात आली.
 
इकडे लताच्या घरी तिच्या लग्नाची चर्चादेखील सुरू झाली होती.
 
दोघीजणी वेगवेगळ्या शाळेत होत्या. पण लता दहावीत नापास झाली. या काळात आमची खूप भांडणं व्हायची असं प्रियाने सांगितलं. पण लताच्या घरच्यांना कसंबसं तयार केलं आणि पुढे शिक्षण सुरू राहिलं.
 
प्रियानेच लताला दहावीत प्रवेश मिळवून दिला. त्याच शाळेत स्वत: बारावीत प्रवेश घेतला. पण दहावीनंतर प्रियाने लताला पुढे शिकू दिलं नाही. वातावरण चांगलं नव्हतं, असं प्रिया सांगते. मी तिच्यासाठी कोणाकोणाशी भांडू असा सवाल प्रियाने केला.
 
लता सांगते की, घरी लग्नाची बोलणी सुरू होती. मी याबद्दल प्रियाला सांगितलं. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला कोणतीच भीती वाटत नव्हती. प्रिया जे म्हणेल ते करायला मी तयार होते.
 
जेव्हा घरच्यांना समजलं...
 
लता सांगते की, मी घरच्याच कपड्यांमध्ये म्हणजे सलवार कमीजमध्ये होते तर प्रिया शर्ट-पँटवर होती. आम्ही मंदिरात लग्न केलं पण घरी काही सांगितलं नाही. आम्ही आपापल्या घरी परतलो.
 
ही गोष्ट पेपरात छापून आली आणि अख्ख्या गावाला आमच्या लग्नाबद्दल समजलं, असं प्रियाने सांगितलं.
 
लताच्या मते, घरच्यांना या लग्नाविषयी कळलं तेव्हा ते नाराज झाले. आईशी भांडण झालं. त्यांचं म्हणणं होतं, मुलीमुलींचं लग्न थोडंच होतं? प्रियाने माझ्यावर काहीतरी जादू केली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हिचं डोकं फिरलं आहे.
 
प्रियाच्या घरीही हेच प्रश्न विचारण्यात आले. मुलीमुलींचं लग्न कसं होईल? तीन दिवसांनंतर घरी पोलीस आले, असं प्रियाने सांगितलं. आकाश कोसळलं अशा थाटात माझे भाऊबहीण वागत होते. पोलिसांनीही मला समजावलं.
 
लता सांगते की, तिला भीती वाटू लागली होती. प्रियाने बाहेर चौकशी केली आणि एका वकिलाच्या मदतीने न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचा खर्च प्रियानेच केला.
 
'मी जे सांगेन ते लता करेल'
या दोघींचे वकील भीम सेन यांच्या मते प्रिया-लता यांनी 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा मसुदा मांडला होता. जयपूर उच्च न्यायालयात याचिका करून सांगितलं की आम्ही 20 डिसेंबर 2018 रोजी लग्न केलं.
 
त्यांनी सांगितलं की, लग्नाबाबत घरच्यांना सांगितलं नाही. पण हे जेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा घरचे आणि नातेवाईकांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
 
न्यायालयाने सांगितलं की, दोन्ही याचिकाकर्त्या महिलाच आहेत. त्यांना एकत्र राहायचं आहे. न्यायालयाने या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. जेणेकरून या दोघींना कोणत्याही पद्धतीने शारीरिक त्रासाला सामोरं जायला लागू नये.
 
परंतु न्यायालयाने लग्नासंदर्भात कोणतंही भाष्य केलं नाही. समलैंगिकतेला बेकायदेशीर ठरवणारं कलम 377 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केलं आहे.
 
प्रिया हसून म्हणते, "मी लताला म्हटलं विहिरीत उडी मार तरी ती मारेल. तिला गुलाबजाम आणि बर्फी खूप आवडते. मी तिला हे खरेदी करण्यासाठी पैसेही देते. मी तिच्या वडिलांना सांगितलं की, मुलीच्या अंगाला हात लावून दाखवा फक्त..."
 
मी विचारलं आता पुढे काय करणार? तिचं उत्तर होतं- मी आता थकले आहे. लतासाठी मुलगा शोधणार आणि तिचं लग्न लावून देणार. हे बोलून प्रिया एकदम शांत झाली.
 
'लग्नात हुंडा होऊन निघून जाईन'
 
मी लताला बोलावसं. त्यावर ती म्हणाली, "लताला मी माझ्या घरी घेऊन आले तर घरच्यांनी सांगितलं आहे की फाशी लावून घेऊ. मी काय करू शकते?"
 
लताचं लग्न लावून दिलं तर तू पुढे काय करणार असा प्रश्न मी विचारला. तुझ्या प्रेमाचं काय होणार? ती म्हणाली की, मी हुंड्यात तिच्याबरोबर तिच्या सासरी जाईन. कमावते आहे, दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा असं सांगेन.
 
मी हाच प्रश्न लताला विचारला तर ती म्हणाली, 'प्रिया जे म्हणेल ते मी करेन.'
 
जून महिना 'प्राईड महिना' म्हणून साजरा केला जातो. प्राईड महिना म्हणजे समलैंगिक लोकांचे अधिकार आणि त्यांच्या अस्तित्वाला ओळख मिळवून देणारा महिना.
 
राजस्थानमध्ये राहणाऱ्या या मुलींना प्राईड महिन्याविषयी काहीही माहिती नाही. त्यांच्या लेखी या गोष्टीला काही महत्त्वही नाही. एकत्र राहायचं एवढीच त्यांची इच्छा आहे आणि ही इच्छा फलद्रूप होणं दूरदूरपर्यंत शक्य नाही.
 
30 वर्षांची सोबत
गुजरातमधल्या अहमदाबाद इथे तीन दशकं एकत्र असणारे दिब्येंदू गांगुली आणि समीर सेठ आपल्या प्रवासाला 'अनोखं' म्हणतात.
 
'या इतक्या वर्षांमध्ये आम्ही अनेकांची लग्नं तुटताना पाहिली आहेत. नात्यांमध्ये कटूता येताना पाहिली आहे. पण आम्ही एकत्र आहोत. दिब्येंदू सांगतात की समीर आणि माझ्यात वयाचं अंतर आहे. पण हा कधीच मुद्दा झाला नाही.'
 
दिब्येंदू कोलकाताचे आहेत आणि समीर गुजरातचे. नोकरीच्या निमित्ताने दिब्येंदू अहमदाबादला आले आणि इथलेच झाले. पहिल्या भेटीतच प्रेमात पडलो असं दोघेही सांगतात. तो दिवस आठवताना दोघांच्या आवाजात गोडवा निर्माण झालेला जाणवतो.
 
तुम्ही समलैंगिक आहात याचा तुम्हाला कधी त्रास झाला का? यावर दिब्येंदू सांगतात, "मी बारावीनंतर शिक्षणासाठी कोलकाता सोडलं. 14-15 वर्षांचा असेन जेव्हा मला माझी ओळख समजली. पण मी त्यावेळी गोंधळलेला होतो. त्यावेळी इंटरनेट नव्हतं. लैंगिक शिक्षणही नव्हतं. अंधारात तीर मारल्यासारखं सगळं सुरू होतं.
 
माझे काही मुलींशीही संबंध होते मात्र काही दिवसातच माझ्या लक्षात आलं की, मला मुलांमध्येच रुची आहे. बारावीनंतर मी शिक्षणासाठी घर सोडल्याने आईवडिलांशी याबाबत कधी बोलणं झालं नाही. समीरची अहमदाबादमध्ये ओळख झाली. आम्ही एकत्र राहू लागलो. या काळात माझे वडील गेले. आई माझ्याकडे अहमदाबादला आली. तिला काय ते समजलं. समीर चांगला मुलगा आहे असं आईने सांगितलं. तुझी काळजी घेतो असंही आईने सांगितलं. कोणी माझी थट्टा उडवतंय, टोमणे मारतंय असा त्रास मला तरी कधी झाला नाही".
 
समीरचाही अनुभव काहीसा असाच आहे. मला आईवडिलांना याविषयी पटवून द्यायला थोडा वेळ गेला. वडील काहीच म्हणाले नाहीत. आई काही बोलत नसे पण तिच्या मौनातून मी समजून जात असे.
 
मी त्यांना एवढंच सांगत असे की, "आई तू विचार कर- तुम्हाला एक मुलगी असती आणि तिचं लग्न माझ्याशी झालं असतं तर ती आनंदी झाली असती का? तुमची तिच्याविषयीची काळजी मिटली असती का? मी मुलाबरोबरच खूश राहू शकतो. मुलीशी लग्न करू शकत नाही. तुम्ही माझं लग्न मुलीशी लावून दिलंत तर दोन लोकांचं आयुष्य विस्कटून जाईल. त्यांना हळूहळू माझं म्हणणं पटू लागलं. आम्ही इतकी वर्ष एकत्र राहत आहोत. माझे आईवडील इथे येऊन जाऊन असतात".
 
दिब्येंदू आणि समीर सांगतात की, लोक काय म्हणतात याने आम्हाला फरक पडत नाही. आम्ही एकत्र खूश आहोत, असू एवढं आम्हाला पक्कं माहिती आहे.
 
दिब्येंदू आणि समीर जोडीने आपल्या नात्याला पूर्णत्व मिळवून दिलं. पण लता-प्रिया सारख्या अनेक जणींच्या, जणांच्या कहाण्या अर्धवटच राहिल्या आहेत. त्यांना प्रतीक्षा आहे पूर्णत्वाची.