शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (11:08 IST)

यशवंत मनोहर : पुरस्कार नाकारणं हे व्यक्तिस्वातंत्र्य की सांस्कृतिक राजकारण?

प्रसिद्ध कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणारा 'जीवनव्रती' पुरस्कार नाकारला. पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावरील सरस्वतीच्या पुतळ्याला त्यांनी विरोध केला आणि त्यातून पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
 
'जीवनव्रती' हा पुरस्कार यशवंत मनोहर यांना देण्याचा निर्णय विदर्भ साहित्य संघाच्या समितीने घेतला होता. यासंदर्भातील निमंत्रण साधारण महिन्याभरापूर्वीच त्यांना देण्यात आले होते.
 
माझी मूल्यं नाकारून मी हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही, असं म्हणत यशवंत मनोहर यांनी हा पुरस्कार स्वीकारायला विरोध केला आहे.
 
तर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या तत्वांविषयी आम्हाला आदर आहे, पण त्यांनीबी आमच्या परंपरांचा आदर करावा, असं म्हटलं आहे.
 
याबाबत बीबीसी मराठीनं मराठी साहित्यविश्वातील साहित्यिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तत्पूर्वी, यशवंत मनोहर आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या विस्तृत भूमिका आपण समजून घेऊ. म्हणजे, पुढील चर्चा करता येऊ शकते.
 
यशवंत मनोहर आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या भूमिका काय?
यशंवत मनोहर यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना सांगितलें, "माझी इहवादी भूमिका, माझी लेखक म्हणून भूमिका याची कल्पना साहित्य संघाला असेल असा माझा समज होता. व्यासपीठावर काय काय असेल अशी विचारणा मी केली होती. पण सरस्वतीची प्रतिमा असणार आहे असे त्यांनी मला सांगितले. तेव्हा माझी मूल्य नाकारून हा पुरस्कार स्वीकारणे मला शक्य नव्हते म्हणून मी तो नम्रपणे नाकारला."
 
"अशा समारंभांमध्ये सरस्वती ऐवजी सावित्रीबाई फुले, भारताची राज्यघटना यांच्या प्रतिमा का ठेवता येऊ शकत नाहीत? वाड:मयीन कार्यक्रमात साहित्यिक पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज अशा लेखकांचे फोटो का लावले जात नाहीत?" असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले
 
याबाबत यशवंत मनोहर यांनी बीबीसी मराठीशी अधिक विस्तृतपणे भूमिका मांडली.
 
ते म्हणाले, "कुणा एका व्यक्ती किंवा विदर्भ साहित्य संघावरील रागाचा मुद्दा नाहीय, हा मुद्दा मूल्यांचा आहे, व्यवस्थेचा मुद्दा आहे. मी भारत आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाचा एक प्रतिनिधी आहे. शिवरायांपासून शाहू-फुले-आंबेडकरांच्या परंपरेला मी माझी आदरणीय परंपरा मानतो. मग सरस्वतीची मूर्ती असलेल्या व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारणं म्हणजे मीच मला खोडून काढणं, मीच मला नकारणं ठरलं असतं. म्हणून मी स्पष्टपणे पत्रात म्हटलंय की, मी आयुष्यभर जी मूल्य जपली, त्या मूल्यांच्या विरोधात स्वत: कृती करणं हे मला मीच खोडून काढल्यासारखं आहे."
 
"संविधान, भारतीय प्रबोधनानुसार, परिवर्तनाच्या चळवळीचे हात धरून चाललो आहे. मी तुमच्यासाठी नाही बदलणार, तुम्ही माझ्यासाठी बदललं पाहिजे. माझ्यासाठी म्हणजे प्रबोधनासाठी, परिवर्तनासाठी तुम्ही बदललं पाहिजे. सगळ्यांच्या हिताचं जे आहे, त्यासाठी आपण सर्वजण बदललं पाहिजे. यादृष्टीने विदर्भ साहित्य संघाला विनंती केली. पण त्यांनी मनावर घेतलं नाही. म्हणून मग पुरस्कार स्वीकारायला जायचं नाही, असं ठरवलं," असं यशवंत मनोहर म्हणतात.
 
तर यशवंत मनोहर यांनी सरस्वतीच्या प्रतिमेला विरोध केला असला तरी आम्ही आमची परंपरा बदलणार नाही, असं मत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना मांडलं.
 
मनोहर म्हैसाळकर म्हणाले, "संस्थेचे काही रीतीरिवाज असतात. आमच्या दृष्टीने मकरसंक्रातीच्या दिवशीचा हा एक सण असतो. जो वर्धापन दिन म्हणून साजरा करतो. प्रत्येक मोठ्या कुटुंबात एक कुलाचार असतो. सरस्वतीची प्रतिमा पाहिजे, हा आमचा कुलाचार आहे. आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांच्या अख्त्यारित असंच झालं. त्यात कवी अनिल, शेवाळकर, डॉ. कोलते होते. यातल्या कुणीही सरस्वतीची मूर्ती व्यासपीठावर ठेवू नका, अशी अट घातली नाही."
 
"पुरस्काराचं आम्ही त्यांना कळवलं होतं, तेव्हाच त्यांनी हे स्पष्ट करायला हवं होतं. ते सहा वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत होते. त्यांना हे माहित होतं. विदर्भ साहित्य संघाच्या जडणघडणीत योगदान आहे. ते आमचे आजीव सदस्य आहेत," असंही म्हैसाळकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
 
आपण डॉ. यशवंत मनोहर आणि विदर्भ साहित्य संघाची भूमिका जाणून घेतली. आता मराठी साहित्यविश्वात याबाबत काय प्रतिक्रिया उमटल्या हे पाहूया.
 
आपला शत्रू कोण, याचं भान सतत हवं - डॉ. प्रज्ञा दया पवार
सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार या बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "यशवंत मनोहर यांच्या भूमिकेचा मी सन्मान करते. एक व्यक्ती म्हणून त्यांनी काय करावं, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आपण लोकशाही मानणारी माणसं आहोत. त्यांच्या लेखन आणि कार्यकर्तृत्त्वाविषयी माझ्या मनात आदराची भावना आहे. यशवंत मनोहर यांच्या भूमिकेबाबत जे राजकारण घडतंय, ते मान्य नाही."
 
"पण मला नेहमी वाटतं की, जर आपण परिवर्तनवादी अवकाश घडवण्याचं आणि विस्तारित करण्याचं धोरण घेऊन पुढे जात असू, तर राजकारणात आपला शत्रू नेमका कोण आहे, याचं भान आपण सतत ठेवायला हवं," असं प्रज्ञा दया पवार म्हणतात.
 
"आता आपल्याला सरस्वतीच्या अमूर्त प्रतिकाबरोबर नव्हे, तर फॅसिझमच्या वर्तमानात मूर्त झालेल्या उग्र-भीषण आवृत्तीसोबत लढायचंय आणि तोच सर्वात मोठा अग्रक्रम आपला असायला हवा," असंही त्या बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.
 
उस्मानाबाद येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना बीबीसी मराठीनं प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र, ते म्हणाले, "प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. घटनेच्या चौकटीत जाऊन ज्याने-त्याने व्यक्त करावं."
 
मात्र, ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक अन्वर राजन यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.
 
पुरस्काराला होकार देऊन नाकारणं बरोबर नाही - अन्वर राजन
अन्वर राजन म्हणतात, "पुरस्कार स्वीकारण्याच्या आधी विदर्भ साहित्य संघ आहे, तिथे काय काय प्रतिमा आहेत, तिथे कोण व्यक्ती आहेत, हे आधी पाहायला हवं. एकदा पुरस्कार स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर नाकारणं, हा पुरस्कार देणाऱ्याचा अपमान असतो."
 
ते पुढे सांगतात, "साहित्यिकाला विचारल्याशिवाय कुठलेही पुरस्कार जाहीर केले जात नाहीत. मी स्वत: अनेक पुरस्कार समित्यांवर काम केलंय. एखाद्याने नकार दिला, तर त्याच्या नावाचा पुरस्कार जाहीर केला जात नाही."
 
"त्यामुळे पुरस्काराबाबत देण्याचं सांगितल्यानंतर विचार करून कळवायला हवं होतं. काही सूचना असतील तर त्याही सांगायला हव्या. पण होकार देऊन नंतर मग नकार देणं हे बरोबर नाही," असं अन्वर राजन म्हणतात.
 
सांस्कृतिक राजकारणाच्या फेरमांडणीची गरज - श्रीरंजन आवटे
बीबीसी मराठीनं मराठी साहित्यातील नव्या लिहित्या हातांनाही याबाबत मत विचारलं. 'सिंगल मिंगल' कादंबरीचे लेखक आणि 'आपलं आयकार्ड'चे सहलेखक श्रीरंजन आवटे यांनी यावेळी सांस्कृतिक राजकारणाच्या फेरमांडणीची गरज व्यक्त केली.
 
श्रीरंजन आवटे म्हणतात, "प्रतीकांचं अवडंबर निर्माण झालं की आशयापासून भरकटण्याची शक्यता अधिक असते. आता कोणत्या बिंदूपासून अवडंबर निर्माण होतं, हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. ही सीमारेषा धूसर आहे. सापेक्ष आहे. प्रतीकांना केवळ अस्मितेपुरतं सीमित करता येत नाही आणि प्रतीकांपायी मूळ आशयाचा गाभा हरवणार नाही, याचंही सांस्कृतिक भान राखावं लागतं. ही तारेवरची कसरत आहे."
 
"आत्यंतिक नैतिक शुद्धीवादी हेकेखोर होऊन समाजापासून फटकून राहताही कामा नये आणि 'समरसता'वादीही होता कामा नये. ही दोन्ही टोकं नाकारत ठाम भूमिका घेणं ही बाब कसोटीची आहे. ज्यांना बेरजेचं सांस्कृतिक राजकारण करायचं आहे त्यांना याचं सम्यक भान असणं आवश्यक आहे. ज्यांचा तो उद्देशच नाही, त्यांची गोष्टच वेगळी," असं आवटे म्हणतात.
 
"बाबासाहेबांनी एका टप्प्यावर हिंदू धर्म नाकारत बौद्ध धर्म स्वीकारला. शोषणाची प्रतीकं नाकारत नवी पर्यायी सांस्कृतिक मांडणी करण्याचा हा अतिशय मूलगामी प्रयत्न होता. आजची सांस्कृतिक राजकारणाची मध्यभूमी उजव्या टोकाच्या दिशेने सरकलेली असताना या प्रयत्नांबाबत पुनर्विचार करुन सांस्कृतिक फेरमांडणी करावी लागणार आहे," असंही श्रीरंजन आवटे म्हणतात.
 
सोशल मीडियावरही चर्चा
सोशल मीडियावरही या विषयावरून बरीच चर्चा पाहावयास मिळत आहे. त्यापैकी दोन फेसबुक पोस्टचा सध्या सर्वत्र उल्लेख दिसून येतो.
 
त्यापैकी एक पोस्ट म्हणजे ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांची. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "विदर्भ साहित्य संघाचे बोधचिन्ह आणि सरस्वती हे विदर्भ साहित्य संघाचे बोधचिन्ह आहे. यात 'विदर्भ विषय: सारस्वती जन्मभू:' स्पष्टपणे लिहिलेले आहे.
 
ते 1923 सालापासून लिहिलेले आहे. मनोहर सरांचे संपूर्ण जीवन नागपुरातच गेले आणि जात आहे तेव्हा त्यांनी हे बोधचिन्ह आणि ते दोन श्लोक जे प्राचीन काव्यशास्त्राचे आचार्य राजशेखर यांनी लिहिलेले आहेत कधी पाहिलेच किंवा वाचलेच नसतील, असे वाटत नाही."
 
"सरांना विसासंघाने सन्मानाने 'जीवनव्रती' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानच करायचे ठरविले होते. त्यांनी तो पुरस्कार स्वीकार करताना सरस्वतीच्या प्रतिमेस हारफुलं न वाहता आपल्या भाषणात आपल्या इहवादी भूमिकेचा स्पष्ट उच्चार केला असता तर ते अधिक चांगले ठरले असते," असंही गणेश कनाटे यांनी म्हटलं आहे.
 
दुसरी फेसबुक पोस्ट म्हणजे, 'दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी' या वाचकप्रिय कादंबरीचे लेखक बालाजी सुतार यांची.
 
त्यांनी म्हटलं आहे, "प्रतिकांना स्वीकार / नकार देणं ही महत्वाची गोष्ट असते. प्रतीकं अधिष्ठापित करण्यामागे उघड/ छुपे हेतू असतात, तसे ती नाकारण्यामागेही असतात. प्रतिकांच्या मागे धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिकही धारणांचा रेटा असतो. तो 'नाही' असं म्हणणं हे वाळूत मुंडी खुपसून बसणं ठरतं.
 
सोप्या भाषेत बोलायचं तर प्रतीकं मांडणं / मोडणं हा 'अजेंडा' रेटून धरण्याचा प्रकार असतो."
 
"कुठलीही 'भूमिका' आपण मुळात कुठल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय स्थानावर उभे आहोत, यावर आधारलेली असते. तुमची, माझी, यशवंत मनोहरांची ही स्थाने वेगवेगळी असतील तर आपल्या भूमिका वेगवेगळ्या असणं अगदीच नैसर्गिक असतं," असंही बालाजी सुतार यांनी म्हटलं आहे.
 
विरोध किंवा समर्थन यांच्या पलिकडे जात मराठी साहित्यविश्वात साहित्यिकांच्या भूमिका घेण्यावरून किमान चर्चा होतेय, याबाबतही अनेकजण समाधान व्यक्त करतात.