शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (11:46 IST)

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही

नीलेश धोत्रे
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले आहेत. त्यांनी 5 जानेवारीला JNUमध्ये झालेला हिंसाचार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली नाहीत,' असा आरोप करत विद्यार्थी आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
 
त्यावर पहिल्यांदाच पुढे येत त्यांनी या सर्व प्रश्नांची कुलगुरू जगदीश कुमार यांनी उत्तरं बीबीसीला एका विशेष मुलाखतीत दिली. रविवारच्या हल्ल्यात जखमी झालेली JNU विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिला भेटणं, ही माझ्या एकट्याचीच जबाबदारी नाही, असं ते यावेळी म्हणाले.
 
या मुलाखतीचा हा संपादित अंश -
प्रश्न - रविवारची घटना घडली तेव्हा आपण कुठे होता?
रविवारची घटना घडली तेव्हा मी ऑफिसमध्येच होतो, फॅकल्टी सिलेक्शनची मीटिंग घेत होतो. 4.30 वाजता कळलं की 100 विद्यार्थी आक्रमकपणे विद्यापीठाकडे येत आहेत. त्यानंतर आम्ही सुरक्षा रक्षकांना तिथं पाठवलं.
 
त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत आणि आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणू शकत नाहीत, असं सुरक्षारक्षकांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही पोलिसांना बोलवलं आणि परिस्थिती अटोक्यात आली.
 
प्रश्न - पण पोलीस सांगत होते की त्यांना कुलगुरूंकडून आत येण्याची परवानगी मिळाली नाही. पोलीस नेहमी आत येण्यासाठी लेखी परवानगी मागतात. त्या दिवशी त्यांना लेखी परवानगी देण्यात आली. पोलिसांना परवानगी देण्याठी किती वेळ लागतो?
कॅंपसमध्ये आधीपासूनच साध्या गणवेशात पोलीस होते. कुलगुरूनं सुरक्षा द्या, असे हायकोर्टाचे आदेश आहेत. तेव्हा गरज आहे तेव्हा आम्ही नेहमीच पोलिसांची मदत घेतो.
 
प्रश्न - तुम्ही पोलिसांना फोन केला असं म्हणालात, नेमकं कुणाला फोन केला होता?
गरज पडते तेव्हा वसंत कुंज नॉर्थ पोलीस ठाण्याची मदत मागतो. डीसीपींशी बोलणं झालं. पोलीस आयुक्तांशी सुद्धा बोलणं झालं. त्यांनी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. गेल्या 2 महिन्यांपासून हा संघर्ष सुरू आहे. शिक्षकांना घेराव घालण्यात आले. असोसिएट डीनला 40 तासांपेक्षा कोंडून ठेवण्यात आलं होतं. माझ्यावर हल्ला झाला. माझी गाडी फोडण्यात आली.
 
प्रश्न - एवढी सुरक्षा असताना नेमकी कुणाची चूक झाली?
त्याचा तपास सुरू आहे. पोलिसांचा अहवाल येऊ द्या.
 
प्रश्न - ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मुख्य गेटवरील लाईट बंद होते, असं सांगितलं जातं. त्या दरम्यान किती गाड्यांना आत येण्याची परवानगी देण्यात आली होती. किती लोक आत आले होते?
कॅंपसमधले दिवे गेले नव्हते. बाहेरचे दिवे गेले असतील तर ते का गेले असतील, हे पोलीसच सांगू शकतील.
प्रश्न - तुम्ही आएशी घोषला भेटलात का?
ही फक्त माझ्या एकट्याचीच जबाबदारी नाही. विद्यापीठाची एक प्रशासकीय रचना आहे. त्यानुसार प्रत्येक अधिकारीच जबाबदार आहे.
 
प्रश्न - तुम्ही तिला शेवटचं कधी भेटला होता?
नुकतंच. आमच्यात चर्चा झाली आहे. फीवाढीच्या मुद्द्याच्या वेळी आमची चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या विद्यार्थी नेत्यांना बोलावलं होतं.
 
प्रश्न - विद्यापीठाचे माजी विद्यार्थीच म्हणतात आधी हे विद्यापीठ असं नव्हतं. मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. आता हे विद्यापीठ "तुकडेतुकडे गँग" झालं आहे, असं काही माजी विद्यार्थी बोलत आहेत.
एस. जयशंकर काय बोलले आहेत हे मला माहिती आहे. मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. हिंसाचार ही JNUची संस्कृती नाही. कुलगुरूंवर हल्ला करणं, कामात अडथळ निर्माण करणं ही आमची संस्कृती नाही. आम्ही चर्चेतून मार्ग काढणं पसंत करणारे लोक आहोत. कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं आम्ही स्वागत करत नाही.
 
प्रश्न - हिंदू रक्षा दलाच्या पिंकी चौधरीने या हल्ल्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यावर तुमचं म्हणणं काय आहे?
उत्तर -कुणीही आमच्या विद्यापीठाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला हात जोडून विनंती करू की आम्हाला आमचं काम करू द्या.
 
प्रश्न - पिंकी चौधरींवर FIR व्हावा असं तुम्हाला नाही का वाटतं?
उत्तर - जो कुणी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर कायद्यानं त्याची दखल घ्यावी.
 
प्रश्न - पण तुमच्या विद्यापीठावर हल्ला झाला आहे. तुम्हाला नाही का वाटत की त्याच्यावर FIR व्हायला पाहिजे?
खरं आहे. कुणीही इथली शांतता भंग करत असेल, आमच्या विद्यार्थ्यांना त्रास देत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रखर भूमिका आहे.
 
प्रश्न - चर्चेतून मार्ग काढता येतो असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर - त्यासाठीच आम्ही वेगवेगळी पावलं उचलली आहेत. वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ते त्यांच्यात जातात तेव्हा त्यांना घेराव घातला जातो. ही चर्चा करण्याची पद्धत आहे का? हे कळण्यापलीकडे आहे.
 
एकीकडे तुम्ही म्हणता की चर्चा व्हायला हवी आणि मग अशी स्थिती निर्माण करता की चर्चेला आलेल्या लोकांना धुडकावून लावलं जातं. डीन चर्चेचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना 40 तास डांबून ठेवलं जातं. माझी गाडीही फोडली गेली. कँपसमधील शांतता भंग करण्यास कोण जबाबदार आहे मग?
 
प्रश्न - या सर्वांमध्ये मोठं कोण आहे, तुम्ही की विद्यार्थी?
उत्तर -कोण मोठं, कोण छोटं, हा प्रश्नच नाही. प्रश्न समस्येवर लक्ष केंद्रित करण्याचा, अर्थपूर्ण चर्चा करून समाधान शोधण्याचा.
 
प्रश्न - तुम्ही उजव्या विचारसरणीचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. यावर काय म्हणाल?
उत्तर - तुम्ही माझी पार्श्वभूमी पाहा. मी IIT-मद्रासचा विद्यार्थी आहे. मी IIT-दिल्लीमध्ये शिकवायचो. नॅनोटेक्नोलॉजी हे माझं स्पेशलायजेशन आहे.
 
मी इथं JNUमध्ये आलो तेव्हा मी एकच ध्येय निश्चित केलं होतं - विद्यापीठाची बलस्थानं ओळखून त्यांना जोपासणं आणि काही दोष असतील तर ते दूर करणं. त्यामुळेच आम्ही विद्यापाठाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यापीठ तेव्हाच पुढे जाईल जेव्हा शैक्षणिक बाबींवर लक्ष्य केंद्रित होईल.
 
प्रश्न - गेल्या 4 वर्षांत हे विद्यापीठ देशविरोधी आहे, अँटिनॅशनल आहे, अशा चर्चा भारतीय मीडियामध्ये होते आहे. तुमच्या विद्यापीठावर कुणी अशी सतत टीका करत असेल तर याची तुमची जबाबदारी नाही का?
उत्तर - तुम्ही घडामोडींच्या राजकीय अंगांकडे पाहत आहात. मी विद्यापीठाच्या शैक्षणिक बाबींकडे लक्ष्य केंद्रित करत आहे. मीडियात काही येत असलं तरी आम्ही विद्यापीठाला पुढे नेण्याकडेच लक्ष्य केंद्रित करत आहोत. त्याची फळं आता आली आहेत. मला हे विदयापीठ चालवता येत नाही असे सवाल करण्यापेक्षा तुम्ही या चांगल्या कामांचं स्वागत करायला पाहिजे.
 
प्रश्न - पण विद्यार्थी असं का वागत आहेत? तुमचं आकलन काय आहे?
उत्तर - हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात दाखल व्हायचं आहे आणि तुम्ही त्यांना थांबवत आहात. मग प्रश्न कुणाला विचारायला हवा, जे पुढच्या सत्रात प्रवेश घेत आहेत त्यांना की जे त्यांना प्रवेश घेण्यापासून रोखत आहेत त्यांना? अनेक बाहेरची मंडळी JNU मध्ये येते आहे आणि 'आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत', असं सांगत आहे. तो त्यांचा अधिकारच आहे, पण त्या विद्यार्थ्यांच्या अधिकारांचं काय, ज्यांना पुढच्या सत्रात प्रवेश घ्यायचा आहे?
 
प्रश्न - न्यूज चॅनेल्सवर रात्री JNU वर होणाऱ्या चर्चा पाहून काय वाटतं?
उत्तर - या चर्चांमधून विद्यापीठाच्या चांगल्या बाजूही पुढे आणायला हव्यात, असं मला वाटतं.