शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By BBC|
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (14:27 IST)

‘लॉटरी विकणाऱ्यांनी पैशांसाठी दिले 2 महिलांचे नरबळी’

kerala women narbali
नरबळीसाठी दोन महिलांची हत्या केल्याच्या आरोपांप्रकरणी केरळमध्ये तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. या दोन महिलांचे मृतदेह मंगळवारी सापडलेत. पोलिसांनी एक जोडपं आणि एका माणसाला अटक केली आहे. या तिघांनी दोन महिलांची हत्या करण्यापूर्वी त्यांचा अनन्वित छळ केला होता.
 
या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेचा तपास सुरू आहे.
 
केरळमधल्या या भीषण प्रकाराने देशभरात खळबळ उडाली. पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये अशी घटना समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
 
आरोपींपैकी एकाचं नाव भागवल सिंग असं असून, ते आयुर्वेदिक उपचार करतात. त्यांच्या पत्नीचं नाव लैला आहे. तिसऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शाफी असून तो मांत्रिक आहे.
 
बुधवारी न्यायालयाने या तिघांची तीन आठवड्यासाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय.
 
कोची पोलीस कमिशनर सी. एच. नागाराजू यांनी सांगितलं की, "दोन हत्या चार महिन्यांच्या कालावधीत झाल्या आहेत. आर्थिक फायद्यासाठी अघोरी प्रथेचा भाग म्हणून या महिलांची हत्या करण्यात आली."
 
महिलांच्या हत्येमागचं कारण मानवी बळी देणं असल्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर तपास सुरू आहे.
 
भारतातल्या काही ठिकाणी अजूनही काळ्या जादूचा अंमल आहे. काही प्रथांचं पालन केलं तर आर्थिक प्रगती होऊ शकते असं लोकांना वाटतं. अशा प्रथा पाळल्या तर महिलांना पुत्रप्राप्ती होऊ शकते असाही गैरसमज आहे. आजारपणं बरी होऊ शकतात तसंच पाऊस पडू शकतो असे अनेक दावे केले जातात.
 
पोलिसांच्या मते आरोपींनी दोन महिलांना आमिष दाखवलं. आरोपी लॉटरीची तिकिटं विकत होते. पैशाचं आश्वासन देऊन या तिघांनी दोन महिलांचं शीर उडवलं आणि त्यानंतर शरीराचे तुकडे केले.
 
मंगळवारी पथनामथिट्टा जिल्ह्यातील भागवल सिंग यांच्या घराजवळ दोन्ही महिलांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आले.
 
महिलांचे मृतदेह छिन्नविच्छिन स्थितीत आढळल्याने त्यांच्या घरच्यांनाही ओळख पटू शकली नाही. यामुळे दोन्ही मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
 
मानवतेला काळिमा फासणारा अशी ही घटना आहे असं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलं आहे. केरळसारख्या राज्यात अंधश्रद्धेच्या नावावर अशा प्रकारे हत्या होणं हे कल्पनेपलीकडचं आणि दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
आरोपी कोण आहेत?
पद्मा आणि रोसली अशी दोन महिलांची नावं आहेत. 52वर्षीय पद्मा तामिळनाडू राज्यातल्या धर्मपुरमच्या आहेत. त्या कोचीमध्ये राहत होत्या. 49 वर्षीय रोसली त्रिशूर जिल्ह्यातल्या असून कॅलडी नावाच्या गावात राहत होत्या.
 
पद्मा यांच्या मुलाने सप्टेंबरमध्ये आई बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली होती.
 
फेब्रुवारीपासून पद्मा कोचीत एका खोलीत राहत होत्या. "ती एकटीच राहत होती पण ती रोज मला कॉल करत," असं त्यांची बहीण पलानिअम्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
पालानिअम्मा यांना त्यांच्या बहिणीचा बरेच दिवसांपासून फोन आला नाही तेव्हा मात्र त्यांनी बहिणीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. "मी तिथं गेले, तेव्हा तिच्या घराला कुलूप होतं," त्यांनी बीबीसीला सांगितलं. त्याचवेळी त्यांच्या बहिणाचा फोनसुद्धा बंद होता, अशी माहिती त्यांनी दिली.
 
पोलिसांनी जेव्हा पद्मा यांच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा ते कोचीपासून 113 किलोमीटर अंतरावर असलेल्या पथनामथिट्टाचं असल्याचं लक्षात आलं. त्याचवेळी आरोपी शाफीच्या फोनवरून त्यांना अनेक कॉल आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
 
तसंच शाफीच्या कॉल रेकॉर्डवरून हेसुद्धा लक्षात आलं की तो भागवल सिंगच्या संपर्कात होता, असं पोलिसांनी सांगितलं.
 
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मात्र भालवल सिंग यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे.
 
पोलिसांच्या तपासात आरोपी भागवल सिंग, त्याची पत्नी आणि शाफी यांनी मिळून जूनमध्ये रोसली नावाच्या आणखी एका महिलीचे हत्या केल्याचं समोर आलं आहे.
 
"हे खूपच विचित्र हत्येचं प्रकरण आहे," पोलीस निरीक्षक पी. प्रकाश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
 
"हे खून नेमके कधी झाले आहेत याचा आम्ही अधिक तपास करत आहोत. तसंच आणखीही असे काही खून झाले आहेत का याचीसुद्धा चौकशा सुरू आहेत," असं त्यांनी पुढे सांगितलं आहे.