नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसीच्या अंमलबजावणीविरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं मुंबईतल्या दादर परिसरात धरणं आंदोलन आयोजित केलं.
				  													
						
																							
									  
	 
	CAA हा कायदा मुस्लीम विरोधी आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी लोकांना संबोधित करताना आंबेडकर म्हणाले जर तुम्हाला डिटेंशन कॅंपमध्ये जायचं नसेल तर हे (केंद्र) सरकार पाडा.
				  				  
	 
	सरकारला NRC राबवायचं आहे त्यामुळेच ते राज्या-राज्यात डिटेन्शन सेंटर्स बांधत आहेत. जर तुम्हाला NRC राबवायचं नाही तर राज्यात डिटेन्शन सेंटर्स आहेत की नाही हे आधी सरकारने सांगावं असं आंबेडकर म्हणाले.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	याआधी, आंबेडकर म्हणाले, "ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागलं आहे. हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचं आहे."
				  																								
											
									  
	 
	माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारनं CAA आणि एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे."
				  																	
									  
	 
	'सावरकरांना मध्ये ओढू नका'
	लोकांचा लक्ष विचलित करण्यासाठी काही लोक सावरकरांना मध्येच ओढत आहेत. माझं त्यांना हे म्हणणं आहे की सावरकरांनामध्ये ओढू नका. जे लोक सावरकरांना मध्ये आणत आहेत ते शकुनी मामा सारखे आहेत असं आंबेडकर म्हणाले.
				  																	
									  
	 
	CAA आणि NRC च्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
	 
				  																	
									  
	'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते फक्त हाच विचार करतात'
	काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तुम्ही का आंदोलन करत नाहीत असं विचारलं असता आंबेडकर म्हणाले, हे दोन्ही पक्ष फक्त मराठ्यांचाच विचार करतात इतर समुदायांचा करत नाहीत अशी टीका आंबेडकरांनी या दोन्ही पक्षांवर केली.
				  																	
									  
	 
	प्रकाश आंबेडकरांना मोर्चाची परवानागी नाकारल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी स्पष्ट केलं. आम्ही त्यांना सभेची परवानगी दिली आहे, पण मोर्चाची नाही, असं त्यांनी सांगितलं. तर यावर प्रतिक्रिया देताना, "पोलिसांनी त्यांचं काम करावं, असं आंबेडकर म्हणाले.'
				  																	
									  
	 
	प्रकाश आंबेडकर यांनी 24 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 26 डिसेंबरच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
				  																	
									  
	 
	त्यांनी म्हटलं होतं, "NRC-CAA नागरिकत्व कायद्यामुळे फक्त मुस्लीमच नाही, तर 40 टक्के हिंदूही भरडले जाणार.हा कायदा केवळ मुस्लिमांपुरताच असल्याचा भाजप आणि संघाचा प्रचार खोटा आहे. आम्ही या कायद्याविरोधात आंदोलन करणार आहोत."
				  																	
									  
	 
	हे मोर्चे महाराष्ट्रभर चालणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. "राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बहुजन जनतेच्या भल्याचं कधी काम केलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नाहीत. आता उद्धव ठाकरेंनी हे स्पष्ट केलं पाहिजे की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर अवलंबून आहेत की नाही," आंबेडकर म्हणाले.
				  																	
									  
	 
	दरम्यान, भाजप कार्यध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली लोकांमध्ये NRC-CAA संबंधी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात बैठक आयोजित केलेली आहे.