बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (18:50 IST)

अमेरिकेवरील सायबर हल्ल्यामागे रशिया? हॅकर्सनं काय स्पष्टीकरण दिलं?

अमेरिकेतील सर्वांत मोठ्या सरकारी इंधन पाईपलाईनवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी एक निवेदन प्रसिद्ध करून हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
डार्कसाइड नावाच्या एका सायबर गुन्हेगारी टोळीनं आपल्या वेबसाइटवर निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे, "आमचा हेतू हा केवळ पैसे कमावणे आहे, सर्वसामान्य लोकांसमोर अडचणी निर्माण करणं नाहीये."
 
अमेरिकेतील सर्वांत मोठ्या सरकारी इंधन पाईपलाईनवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली.
 
जाणकारांच्या मते, या इंधन कंपनीचे बरेचसे कर्मचारी कोरोनामुळे घरातून कॉम्प्युटर वापरत होते. त्याचा फायदा हॅकर्सनी घेतला असण्याची शक्यता आहे.
कोलोनियल पाईपलाईनमधून दररोज 25 लाख बॅरल तेल जातं. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीच्या राज्यांमध्ये डिझेल, गॅस आणि जेट इंधनांची 45 टक्के गरज या पाईपलाईनच्या माध्यमातून पूर्ण होते.
 
हल्ल्यानंतर कंपनीनं आपलं नेटवर्क ऑफलाईन म्हणजेच बंद केलं असून पाइपलाइनच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे.
 
सोमवारी (10 मे) अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं या हल्ल्यामागे डार्कसाइडचा हात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तपासासाठी पाइपलाइन कंपनी आणि अन्य सरकारी संस्थांच्या संपर्कात आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे की, त्यांना पाईपलाईनच्या परिस्थितीबद्दल वैयक्तिकरित्या माहिती दिली जात आहे.
बायडन यांनी म्हटलं, "तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी सरकारच्या सर्व संस्था प्रयत्न करत आहेत. आम्ही काही अतिरिक्त पावलं उचलायलाही तयार आहोत, मात्र कंपनी आपली पाइपलाइन किती लवकरात लवकर दुरुस्त करू शकते यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत."
 
हल्ल्यामागे रशियाचा हात?
अनेक सायबर तज्ज्ञांच्या मते हा सायबर हल्ला करणारे गुन्हेगार रशियाचे असू शकतात. कारण हे गुन्हेगार ज्या कॉम्प्युटर नेटवर्कची भाषा रशियन आहे, त्यावर हल्ला करत नाहीत.
 
सायबर हल्ल्याचा हा पैलू काळजीत टाकणारा आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.
 
त्यांनी म्हटलं, "मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेईन. मात्र आमच्या गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत तरी या हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाहीये. मात्र हल्ला करणारे रॅन्समवेअर रशियात आहेत, या गोष्टीचा पुरावा आहे. त्यामुळेच त्यावर तोडगा काढणं ही रशियाचीही जबाबदारी आहे.
डार्कसाइडनं हल्ल्यानंतर सोमवारी (10 मे) आपल्या वेबसाइटवर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हा हल्ला 'अराजकीय' असल्याचं म्हटलं होतं.
 
त्यांनी लिहिलं आहे, "आम्ही राजकारण करत नाही. आमचा संबंध कोणत्याही सरकारसोबत जोडण्याची आवश्यकता नाही किंवा आमचा उद्देश काय आहे हे शोधण्याचीही गरज नाही."
 
आपल्याशी संबंधित असलेले हॅकर्स कॉलोनियल पाईपलाईनला लक्ष्य करत आहेत, याचीही कल्पना नव्हती, असं डार्कसाइडने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
 
त्यांनी लिहिलं आहे, "आजपासून आम्ही अशा गोष्टींवर नजर ठेवू आणि आमचे सहयोगी ज्या कंपनीला हॅक करू इच्छितात, त्याची माहिती घेत राहू, जेणेकरून भविष्यात सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर या गोष्टीचा परिणाम होणार नाही."
 
तेलाच्या किंमतीत वाढ
 
या सायबर हल्ल्यानंतर अमेरिकेतील पेट्रोल पंपांवर तेलाच्या किंमती प्रति गॅलन सहा सेंटनी वाढल्या आहेत.
 
वॉल स्ट्रीटवरही अमेरिकन तेल कंपन्यांच्या शेअर्सचे दर 1.5% ने वाढले.
 
अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशनच्या मते 2014 नंतर तेलाचे दर पहिल्यांदाच उच्चांकी पातळीवर जात आहेत.
अमेरिकन सरकारनं हल्ल्यानंतर नियमांना बगल देत रस्त्यानं इंधन पुरवठा सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. अर्थात, पाईपलाईन लवकरात लवकर दुरूस्त झाली नाही, तर परिस्थिती चिघळू शकते.
 
तेल बाजाराचे विश्लेषक गौरव शर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की, आताच्या घडीला बरंचसं इंधन टेक्सास राज्यातील रिफायनरीत अडकून पडलंय.
 
ते पुढे म्हणतात, "आणीबाणी लागू करून तेल, गॅस यांसारख्या इंधनांच्या टॅंकर्सना न्यूयॉर्कपर्यंत पाठवलं जाऊ शकतं. मात्र, पाईपलाईनच्या तुलनेत हा पुरवठा अत्यंत कमीच असेल. 11 मे पर्यंत जर हे दुरुस्त केलं गेलं नाही, तर मोठी अडचण उद्भवू शकते."
 
"सर्वांत आधी अटलांटा आणि टेनेसीवर परिणाम होईल. त्यानंतर हा परिणाम वाढत जात न्यूयॉर्कपर्यंत पोहोचेल," असं गौरव शर्मा म्हणतात.
 
"अमेरिकेत इंधनाची मागणी वाढतेय. कारण अमेरिकेत कोरोनाच्या साथीतून पुन्हा उभं राहण्यासाठी लोक बाहेर पडू लागलेत आणि तेल कंपन्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना दिसतेय," असं शर्मा सांगतात.
 
हल्ला कसा झाला?
लंडनस्थित सायबर सिक्युरिटी कंपनी डिजिटल शॅडोजच्या मते, कोलोनियन पाईपलाईनवर हल्ल्याचं सर्वांत मोठं कारण कोरोनाची साथ असू शकते. कारण कंपनीचे बरेचसे इंजिनियर घरातून कॉम्प्युटरवर काम करत होते.
 
डिजिटल शॅडोजचे सहसंस्थापक आणि चीफ इनोव्हेशन ऑफिसर जेम्स चॅपल यांच्या मते, डार्कसाईडने टीम व्ह्यूवर आणि मायक्रोसॉफ्ट रिमोट डेस्कटॉप यांसारख्या रिमोट सॉफ्टवेअरशी संबंधित अकाऊंटचे लॉगइन डिटेल खरेदी केले. कुणीही व्यक्ती शोडानसारख्या सर्च इंजिनवर इंटरनेटशी संबंधित कॉम्प्युटरच्या लॉगइन पोर्टल्सची माहिती मिळवू शकते. त्यानंतर हॅकर्स युजरनेम आणि पासवर्डच्या माध्यमातून अकाऊंटमध्ये लॉगइन करण्याचा प्रयत्न करतात.
चॅपल म्हणतात की, अनेक लोकांना आता याचा फटका बसत आहे. ही एक मोठी समस्या झालीय. दररोज नवीन कंपनीला टार्गेट केलं जात आहे. लहान व्यवसाय यांच्या जाळ्यात येत असल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत चाललीय.
 
"सायबर गुन्हेगारांचा हा गट कुठल्यातरी रशियन भाषिक देशात आहे. कारण हा गट रशिया आणि आजूबाजूच्या देशांमधील कंपन्यांवर हल्ले करत नाही," असं चॅपल यांच्या कंपनीचं संशोधन सांगतं.