मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (18:09 IST)

शैली सिंग- भारतीय अॅथलेटिक्सची नवी स्टार

लांब उडी प्रकारात, शैली सिंहची U18 गटात जगातल्या सर्वोत्तम वीस अथलिट मध्ये गणना होते.
 
उत्तर प्रदेशच्या 17 वर्षीय शैली, अंजू बॉबी जॉर्ज आणि त्यांचे पती रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आहे. शैली सहा मीटरहून अधिक लांब उडी मारू शकते.
 
कनिष्ठ गटात राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे. शैलीची अनेकदा अंजू यांच्याशी तुलना केली जाऊ लागली आहे. अॅथलेटिक्समध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या अंजू या पहिल्या भारतीय अॅथलिट आहेत.
 
2018 मध्ये, शैलीने रांची इथे झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 14व्या वर्षी कनिष्ठ प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला. शैलीने 5.94 मीटर एवढी उडी मारली होती.
 
वर्षभरानंतर, तिने तिच्या कामगिरीत सुधारणा केली आणि U18 प्रकारात 6.15 अंतरावर उडी मारली. आंध्र प्रदेशातील गुंटूर इथे झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत शैलीने हा विक्रम रचला. U16, U18 प्रकारात सुवर्णपदक पटकावल्यानंतर शैलीचं केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रीजिजू यांनी कौतुक केलं होतं.
 
जागतिक अॅथलेटिक्स संघटनेतर्फे U20 गटासाठी जो पात्रता निकष आहे त्यापेक्षा शैलीची उडीचं अंतर जास्त होतं.
 
सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास

उत्तर प्रदेशातल्या झांशीमध्ये 7 जानेवारी 2004 रोजी शैलीचा जन्म झाला. विनिता सिंह, म्हणजे शैलीची आई तिचा सांभाळ करतात. त्या एकल माता आहेत.
 
विनिता टेलरिंगचं काम करतात. अॅथलेटिक्समध्ये करिअर करायचं आहे हे सांगितल्यावर विनिता यांना धक्काच बसला.
 
शैली आणि तिची आई ज्या भागात राहतात तिथे पायाभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत अॅथलेटिक्ससारख्या खेळात वाटचाल करण्याची मुलीची इच्छा प्रत्यक्षात साकारणं सोपं नव्हतं. मात्र शैलीची जिद्द आणि खेळातलं प्राविण्य पाहून विनिता यांनी तिला प्रोत्साहन दिलं.
 
रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांनी शैलीतले गुण हेरले. जॉर्ज दाम्पत्याने शैलीला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. शैली आता बेंगळुरूस्थित अंजू बॉबी जॉर्ज फाऊंडेश नमध्ये सराव करते. झांशीहून बेंगळुरूला येण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती.
 
भारतीय अॅथलेटिक्सचं भविष्य
 
U18 गटात जगातल्या सर्वोत्तम 20 अॅथलिट्समध्ये नोंद होणाऱ्या शैलीकडे भारतीय अॅथलेटिक्समधील नवा तारा म्हणूनच बघितलं जात आहे. ट्रॅकवरच्या तिच्या कामगिरीमुळे शैलीची तुलना अंजू यांच्याशी होऊ लागली आहे.
 
ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात शैली देशात वर्चस्व गाजवेल असं बॉबी जॉर्ज यांनी म्हटलं आहे. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत शैली पदकाची प्रमुख दावेदार असेल असं त्यांना वाटतं.
 
जॉर्ज दाम्पत्या व्यतिरिक्त शैलीला अभिनव बिंद्रा फाऊंडेशनचाही पाठिंबा आहे. शैलीसारख्या अपवादात्मक कौशल्यगुण असणाऱ्या अॅथलिटसाठी आणखी प्रयत्न व्हायला हवेत असं बॉबी जॉर्ज यांना वाटतं.
 
मैदानावर कोणतीही स्पर्धा जिंकल्यानंतर शैली आईला फोन करते. झांशी किंवा लखनौत स्पर्धा होईल आणि आईसमोर दिमाखदार प्रदर्शन करता यावं अशी शैलीची इच्छा आहे.
 
चांगल्या प्रदर्शनासाठी अविरत मेहनत करत राहीन, जेणे करून आईला अभिमान वाटेल असं शैली सांगते.