बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (15:29 IST)

संसदेमध्ये खासदाराच्या बाळाला खेळवणारे अध्यक्ष सोशल मीडियावर व्हायरल

न्यूझीलंडच्या संसदेतील एका फोटोची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. संसदेमध्ये जेव्हा एक खासदार जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा सभागृहाच्या अध्यक्षांनी चक्क त्यांच्या बाळाला खेळवण्याची जबाबदारी घेतली.
 
सभागृह अध्यक्ष ट्रेव्हर मलार्ड यांचे बाळाला खेळवतानाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी स्वतःच खासदार टॅमोती कॉफे यांच्या बाळाला खेळवतानाचे हे फोटो ट्वीट केले आहेत.
 
मजूर पक्षाचे खासदार टॅमोती कॉफे आणि त्यांचा जोडीदार टिम स्मिथ यांना जुलैमध्ये मुलगा झाला. सरोगेट मदरच्या मदतीने या बाळाचा जन्म झाला. टिम स्मिथ यांचा हा बायोलॉजिकल मुलगा.
 
या बाळाच्या जन्माची घोषणा करताना खासदार टॅमोती कॉफे यांनी ट्विट करून म्हटलं, की मी आणि माझा जोडीदार जीवनाच्या या चमत्कारामुळे भारावून गेलो आहोत. या बाळाची सरोगेट आई असलेल्या टिमच्या मैत्रिणीची प्रकृतीही उत्तम आहे.
 
खासदार टॅमोती कॉफे पॅटर्निटी रजेवरून बुधवारी परतले आणि संसदेच्या कामकाजात सहभागी झाले. यावेळी ते आपल्या मुलालाही सोबत घेऊन आले होते. संसदेचं कामकाज सुरू असताना तीन मुलांचे वडील असलेले अध्यक्ष मलार्ड यांनी स्वतः या नव्या पाहुण्याच्या देखभालीची जबाबदारी उचलली.
 
ग्रीन पक्षाचे खासदार गॅरेथ हग्ज यांनी मलार्ड यांचे बाळासोबतचे फोटो ट्वीट केले.
या ट्वीटमध्ये ते लिहितात, "सभागृहात लहानग्या बाळाला बघून आनंद झाला आणि हे बाळ खूप सुंदर आहे @tamaticoffey."
 
सभागृहात सर्वांनीच खासदार कॉफे यांच्या मुलाचं आनंदात स्वागत केलं. याविषयी न्यूजहब या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "सभागृहातल्या सर्वच सहकाऱ्यांनी खूप आधार दिला."
 
बाळासह संसदेत येणाऱ्या खासदारांची अनेक उदाहरण सध्या जगभरात बघायला मिळतात. त्यातलंच हे आणखी एक उदाहरण. मात्र एका गे जोडप्याचं हे बाळ असल्याने जगभरात चर्चेचा विषय आहे.
 
2018 साली लिबरल डेमोक्रेट्स या पक्षाच्या अध्यक्षा जो स्विंसन यासुद्धा आपल्या बाळासह सभागृहात आल्या होत्या. तर 2017 साली ऑस्ट्रेलियाच्या खासदार लॅरिसा वॉटर्स यांनी सभागृहात आपल्या बाळाला स्तनपान केलं होतं. या बातम्याही जगभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या होत्या.
 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन न्यू यॉर्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सभेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यादेखील आपल्या बाळाला घेऊन सभेत गेल्या होत्या.
 
मात्र, काही दिवसांपूर्वी केनियामध्ये आपल्या पाच महिन्यांच्या मुलासह संसदेत आलेल्या एका महिला खासदाराला सभागृह अध्यक्षांनी बाहेर काढलं होतं. झुलेईका हसन असं या महिला खासदाराचं नाव आहे.
 
केनियाच्या संसदेत खासदारांशिवाय इतर कुणालाही प्रवेश नाही, असं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला आपल्या बाळाला घरी ठेवता आलं नाही, असं खासदार झुलेईका यांनी म्हटलं होतं.