1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified बुधवार, 9 जून 2021 (14:27 IST)

उद्धव ठाकरे -नरेंद्र मोदींच्या 'त्या' वैयक्तिक भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतील?

मयुरेश कोण्णूर
दिल्लीमध्ये मंगळवारी (8 जून) उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाणांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
 
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर आपण पंतप्रधानांची लवकरच भेट घेणार आहोत, असं ठाकरे यांनी अगोदरच सांगितलं होतं, त्यामुळे या भेटीत अनपेक्षित आणि धक्कादायक असं काहीही नव्हतं. पण तरीही 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर जे महाराष्ट्रात झालं आणि राज्यात भाजपानं ठाकरे सरकारविरोधात टीकेची जी राळ उठवली आहे, त्या पार्श्वभूमीवर मोदींनी ठाकरेंना कोरोनाकाळात प्रत्यक्ष भेट देणं, जे राजकीयदृष्ट्य़ा महत्वाचं आहेच.
 
मुंबई आणि दिल्लीत मोठी राजकीय चर्चा यासाठी सुरु झाली की, या अधिकृत भेटदरम्यान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिकही काही काळ भेट झाली. अधिकृत चर्चेशिवाय जवळपास अर्धा तास या दोघांची बंद दाराआड चर्चा झाल्याचं म्हटलं जातं आहे.
 
ठाकरे यांनीही वैयक्तिक भेट झाल्याचं मान्य केलं. "आम्ही राजकीय युती म्हणून एकत्र नसलो तरीही त्याचा अर्थ संबंध संपले असा होत नाही. मी काही नवाज शरिफांना भेटायला गेलो नव्हतो. त्यामुळे पंतप्रधानांना वैयक्तिक भेटणं यात काही चूक आहे असं मला वाटत नाही," असं ठाकरे दिल्लीत पत्रकारांनी वारंवार विचारल्यावर म्हणाले.
या भेटीतून मोठी राजकीय बांधणी होईल असं नाही, पण उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातल्या 'न संपलेल्या' संबंधांकडे मात्र गांभीर्यानं पाहिलं जाईल.
 
दोघांनीही एकमेकांवर थेट टीका कधी केली नाही
'आमचा अजित पवारांवर राग नाही, पण विश्वासघात केल्यानं शिवसेनेवर राग आहे' अशा आशयाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केलं. त्यावरुन शिवसेना आणि भाजपात अजूनही किती फाटलं आहे याची कल्पना यावी. 'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला खिंडीत गाठण्याची एकही तक्रार भाजपानं सोडली नाही.
 
देवेंद्र फडणवीस यांनी तर सभागृह आणि बाहेरही सेनेला सातत्यानं धारेवर धरलं आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अनिल परब, संजय राऊत, प्रताप सरनाईक हे नेते कायम भाजपाच्या रडारवर राहिले आहेत. केवळ फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, किरीट सोमय्या असे राज्यातले नेतेच नाही तर केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी कधीही ठाकरे सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
 
पण नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनी कधीही एकमेकांवर टीका केली नाही. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या राजकीय टीकेला उत्तर दिलं, पलटवार केले. केंद्रातल्या भाजपाच्या सरकारवर टीका केली, पण मोदींवर मात्र नाव घेऊन टीका केली नाही.
 
'सामना'तून आणि बाहेरही संजय राऊत मोदी-शाह यांच्या राजकारणावर आक्रमक बोलतात. पण उद्धव ठाकरेंनी ते टाळलं. मोदींचा उल्लेख ते आदरार्थीच करत राहिले.
 
नाही म्हणायला 'मी हवाई पाहणी करत नाही, तर जमिनीवरुन करतो' असा टोला त्यांनी तौक्ते चक्रिवादळावेळेस नरेंद्र मोदींना लगावला, पण भाजपा आणि सेनेत जसं सतत चाललेलं असतं तशी विखारी टीका केली नाही. कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत तर त्यांनी नेहमी पंतप्रधानांचा उल्लेख सातत्यानं आदरानं केला.
 
केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतांना, त्यांनी मोदींविरुद्धचा सूर मवाळ ठेवला. भाजपेतर राज्यांचे मुख्यमंत्री मोदींवर थेट टीका करत असतांना, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही वेळप्रसंगी केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक होत असतांना, उद्धव यांनी मात्र सूर नरम ठेवला. जेव्हा जेव्हा त्यांनी दिलेल्या सल्ल्यांवर वा मागणीवर केंद्र सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला, तेव्हा उद्धव यांनी मोदी यांचे जाहीर आभार मानले.
दुसरीकडे 2019 मध्ये शिवसेनेने निवडणुकीनंतर भाजपाची साथ सोडल्यावर जशी भाजपातल्या सगळ्या नेत्यांनी शिवसेनेवर आगपाखड केली, तशी मोदींनी अद्याप केली नाही. त्या प्रकरणावर मोदी अद्याप बोलले नाही आहेत.
 
उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अमित शाह या सगळ्यांनी आपापली बाजू मुलाखतींतून, भाषणांमधून मांडली आहे. पण मोदींनी मात्र प्रतिक्रिया दिली नाही आहे. केंद्र विरुद्ध राज्य असे संबंध सतत ताणले गेले आहेत, पण ते मोदी विरुद्ध ठाकरे असं होऊ दिले नाहीत.
 
कोरोना काळात, दोघांमध्येही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आणि फोनवर स्वतंत्रही बोलणी सतत होत राहिली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षंवर्धन यांनी महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारचं नाव घेत टीका केली, पण मोदींनी मात्र असं केलं नाही.
 
मुंबईतली आकडेवारी कमी झाल्यावर त्यांनी कौतुक केल्याचंही सांगितलं गेलं. ओक्सिजनच्या मागणीबद्दल, रेमडेसिव्हरच्या पुरवठ्याबद्दल मुख्यंमंत्र्यांकडून मागणी झाल्यावर त्याला केंद्र सरकारनं प्रतिसाद दिल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यासारखे मोदी आणि ठाकरे संबंध ताणले गेले असं चित्र पहायला मिळालं नाही. दोघांनी एकमेकांवर जाहीर राजकीय टीकाही टाळली.
 
उद्धव ठाकरे सगळे पर्याय खुले ठेवू पाहत आहेत का?
केंद्र आणि राज्य यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत असतांना, भाजपा सरकारला वारंवार धक्के देत असतांना मोदींचे असे संबंध जपून उद्धव ठाकरे आपले सगळे पर्याय खुले ठेवू पाहताहेत का?
 
भाजपात सर्वोच्च नेतृत्व हे मोदींचंच आहे. महत्वाचे अंतिम निर्णय तेच घेतात, हे जाहीर आहेत. राजकारणात कोणतीही शक्यता कधी नाकारता येत नाही. त्यामुळे उद्या गरज पडली आणि भाजपासोबतची मैत्री पुन्हा जोडायची गरज पडेल या शक्यतेनं ठाकरे मोदींसोबतचे वैयक्तिक संबंध जपू पाहताहेत का?
शिवसेना अनेक पातळ्यांवर आव्हानांचा सामना करते आहे. त्यातलं मुख्य आव्हान केंद्रीय तपास यंत्रणांचं आहे. या सरकारला अडचणीच्या ठरु शकतील अशा सुशांत सिंग राजपूत, सचिन वाझे अशा केसेस केंद्रीय तपास यंत्रणांकडे आहेत. राज्य सरकारचा विरोध डावलत प्रसंगी त्या केंद्रीय यंत्रणांनी ताब्यात घेतल्या आहेत.
 
अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला आहे आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. प्रताप सरकारनाईकांची ईडी चौकशी सुरु आहे. अनिल परबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा करतं आहे. अशा वेळेस पंतप्रधानांसोबत आपले चांगले संबंध आहेत आणि आपण ते जपतो आहोत हे जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे दाखवताहेत का?
 
सोबतच, महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नाही. संबंध ताणले गेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या चढाओढीत आता कॉंग्रेसही आक्रमक होऊन अस्तित्व दाखवते आहे.
 
'राष्ट्रवादी' ही कधीही भाजपासोबत जाऊ शकते अशी भीती शिवसेनेला तर कायमच आहे. शरद पवार यांची अमित शाहांसोबत अहमदाबादमध्ये झालेली कथित गुप्त भेट, पवारांची फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेणं अशा घटनांमुळे शिवसेनेच्या शंका अधिक वाढतात.
 
भाजपाच्या सोबत आपण जावं असं मानणारा मोठा गट 'राष्ट्रवादी'मध्ये आहे याचीही जाणीव सेनेला आहे. त्यामुळेच अशा स्थितीत भाजपासोबतचे आपले संबंध कधीही पूर्ववत करता आले पाहिजेत अशी तयारी सेनेचीही आहे आणि म्हणून उद्धव हे मोदींसोबतचे वैयक्तिक संबंध जपत आहे का असाही प्रश्न आहे.
 
मोदी हे संबंध का जपत असावेत?
दुस-या बाजूला, मोदींनीही उद्धव यांना भेट दिली आणि वैयक्तिकही चर्चा केली. मोदींनी हे संबंध जे काही भाजपा-सेनेदरम्यान घडलं त्यानंतर का जपले असावेत?
 
एक गोष्ट निश्चित आहे की सगळे मोठे नेते राजकीय निर्णयापलिकेडे त्यांच्या संबंध जपतात आणि त्याचा उपयोग कधीकधी राजकारणातही करुन घेतात. शरद पवारांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर सोनिया गांधींशी चांगले संबंध ठेवले आणि नंतर ते सरकारमध्ये सहभागीही झाले होते. भाजपा-सेना युती 2014 मध्ये तुटली, पण काही ते कारणांनी सत्तेसाठी एकत्रही आले. त्याच प्रकारे मोदी-ठाकरे संबंध जपले जात असावेत का?
राज्यातला सर्वाधिक आमदारांचा पक्ष असूनही भाजपा सतेबाहेर राहण्याला आता दीड वर्षं होऊन गेलं आहे. पण तरीही भाजपाला सत्तेचं गणित जमवता आलं नाही आहे. बहुमतापर्यंत पोहोचता येत नाही आहे. त्यामुळेच आता भाजपाअंतर्गत आता नवे राजकीय पर्याय निवडण्याची गरज निर्माण झाली आहे, म्हणून स्वत: मोदीच वैयक्तिकरित्या ठाकरे यांना जवळ करत आहेत असंही विचारलं जातं आहे.
 
बहुतांश मित्रपक्ष 'एन डी ए'मधून बाहेर पडले आहेत. मोदींचं नेतृत्व मान्य होत नाही आहे असाही त्यातून संदेश जातो. कोरोनच्या दुस-या लाटेच्या काळात जो हाहा:कार उडाला त्यानं मोदी आणि भाजपा सरकारची प्रतिमा खालावली असं जाहीरपणे म्हटलं जातं आहे. संघाच्या गोटातही चिंतन सुरु झालं आहे.
 
अशा काळात मित्रपक्ष सोबत असण्याची निकड भाजपालाही वाटत असावी. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपाचा पराभव केला आहे आणि बंगाल विरुद्ध केंद्र सरकार हे युद्ध वेगळ्याच पातळीला पोहोचलं आहे. भाजपा संघराज्य पद्धतीच्या विरुद्ध आहे असं ममता रोज म्हणत असतांना मोदीं उद्धव ठाकरे यांना वैयक्तिक भेट देऊन काही संदेश देत असावेत का?
 
'हा एका प्रकारचा राजकीय सुज्ञपणा'
राजकीय विश्लेषकांना हा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनी आपापल्या बाजूंनी दाखवलेला राजकीय सुज्ञपणा आणि गरज दोन्हीही वाटतं. "एक नक्की आहे की मोदींच्या वर भाजपात कोणीही नाही. शाह-फडणवीस असले तरीही मोदीच अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्याशी संबंध व्यवस्थित ठेवतात.
 
जर कधी दिलेल्या शब्दाचा जुना प्रश्न समोर आला तर ते असं म्हणू शकतात की 'मातोश्री'वर येऊन अमित शाह बोलले होते आणि त्यांच्याच पातळीवर शब्द मोडला गेला, मोदींचा याच्याशी काहीच संबंध नव्हता. त्यामुळे ते मोदींवर टीका करत नाहीत," असं राजकीय पत्रकार संदीप प्रधान म्हणतात.
 
"सोबतच केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा सध्या विरोधी राज्यांच्या बाबतीत कशा वागताहेत हे उद्धव पाहताहेत. महाराष्ट्रातही सुशांत, वाझे प्रकरणात ते झालंच. सध्या भाजपाची बदललेली आक्रमक भाषा पाहता ते इथं उद्धव यांच्यापर्यंतही जातील. हे कोण थांबवू शकतं, तर मोदी. त्यामुळे त्यांच्याशी संबंध चांगले ठेवणं हा राजकीय सुज्ञपणाच म्हटला पाहिजे," असं प्रधान पुढे म्हणतात.
 
"माझ्या मते सध्या ज्या प्रकारची टीका होते आहे ते पाहता मोदींना नवे मित्र हवे आहेत. म्हणून त्यांच्या बाजूनं पाहिलं तर कोरोनाच्या हाताळणीवरुन झालेली परिस्थिती पाहता, उत्तर प्रदेश असो वा त्यानंतरच्या लोकसभा, या निवडणुकांमध्ये भाजपाला पूर्वीसारखं यश मिळेल असं दिसत नाही. अशा वेळेस नवे मित्र हवे आहेत.
 
महाराष्ट्रात 'राष्ट्रवादी'सोबत जाण्यासाठी संघाचा विरोध असेल. त्यामुळे शिवसेना हीच त्यांच्यासाठी योग्य आहे. अशा वेळेस उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांना मीच समजावू शकतो असंही मोदींना दाखवायचं असेल. त्यासाठीही ही आजची वैयक्तिक भेट महत्वाची वाटते," असं संदीप प्रधान पुढे म्हणतात.
 
'बाळासाहेब आणि मोदींच्या संबंधाशी तुलना करता येणार नाही'
राजकीय पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या मते उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध हे जेवढ्यास तेवढेच आहेत आणि त्यांची तुलना बाळासाहेबांबरोबरच्या संबंधांशी करता येणार नाही, "ते संबंध तयार करण्यासाठी दोघांनीही 'आऊट ऑफ बॉक्स' असं काही केलं नाही आहे. त्यामुळे ते आहे तसेच राहतील आणि आजच्या भेटीनंही त्यात वेगळं काही होणार नाही.
 
"या भेटीमुळेही राजकीय समीकरणं अजिबात बदलणार नाहीत. कारण भाजपासोबत आता जर गेले तर नुकसान उद्धव ठाकरेंचं होईल. दुसरीकडे देशातलं वातावरण बघता शरद पवारांनीही विरोधी पक्षांतल्या नेत्यांशी बोलणं सुरु केलं आहे. अशा स्थितीत उद्धव भाजपाच्या खूप जवळ जाणार नाहीत. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती आणि दोघांचाही राजकीय समंजसपणा होता एवढंच म्हणता येईल," असं कुलकर्णी म्हणतात.