शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (20:29 IST)

ईडीच्या रडारवर राज्यातले कोणते नेते येऊन गेले आहेत?

महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केली आहे.
 
सर्वप्रथम नवाब मलिक यांच्या ठिकाणांवर आज (23 फेब्रुवारी) सकाळी साडेपाच-सहा वाजल्यापासून छापेमारी करण्यात येत होती. त्यानंतर मुंबई येथील राहत्या घरातून सकाळी 8 च्या सुमारास ED ने मलिक यांना ताब्यात घेतलं.
 
महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राजकारण याचा मागच्या काही वर्षांत खूप जवळचा संबंध बघायला मिळाला.
 
14 मार्च 2016 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ईडीने पहिल्यांदा अटक केली.
 
पैशांची अफरातफर, बेहिशेबी मालमत्ता याप्रकरणी महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय नेत्याला ईडीकडून झालेली ती पहिलीच अटक होती. त्या काळात शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर होतं.
 
दोन वर्षं भुजबळ जेलमध्ये होते. त्यानंतर भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे ईडी चौकशीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात नव्याने सुरुवात झाली.
कोणते मोठे राजकीय नेते ईडीच्या रडारवर राहीले? चला जाणून घेऊ या. 
छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या पैशांचा अफरातफरीमध्ये सरकारला 870 कोटी रूपयांचा फटका बसल्याचाा आरोप भुजबळांवर होता. त्याप्रकरणी छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016 ला ईडीने यांना चौकशीसाठी बोलवलं.
11 तासांच्या चौकशीनंतर भुजबळ यांना अटक करण्यात आली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार आणि कलिना येथील जमीन हडप करण्याचे गुन्हे भुजबळ यांच्यावर नोंदवण्यात आले होते.
भुजबळांना अटक झाल्यानंतर तब्बल दोन वर्षे त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. दोन वर्षांनंतर त्यांना जामीन मिळाला.
 
प्रफुल्ल पटेल
युपीए सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री होते. 2008-09 च्या काळात परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी दीपक तलवार यांच्याशी संपर्कात होते. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दीपक तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले.
त्याबद्दल दीपक तलवार यांना 272 कोटी रूपये मिळाले. यामुळे एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
हे सर्व व्यवहार प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या काळात झाल्याचा आरोप ईडीने लावला होता.
 
याचबरोबर आर्थिक परिस्थिती नसताना 70 हजार कोटी रूपयांची 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे विलिनीकरण या प्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत होता. याप्रकरणी ईडीने जून 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांना नोटीस बजावली होती. त्यांना चौकशीसाठीही बोलवण्यात आले होते.
 
राज ठाकरे
ऑगस्ट 2019 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली होती. दादरमध्ये ज्या जमिनीवर कोहिनूर स्क्वेअर टॉवर त्याठिकाणी कोहिनूर मिल क्रमांक 3 ची इमारत उभी होती.
 
बंद पडलेल्या मिलच्या जागेची विक्री करण्याची जबाबदारी नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनकडे असते. या मिलचा ताबा नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनकडे आल्यानंतर त्यांनी कोहिनूर मिलच्या 4 एकर जागेचा लिलाव केला.
लिलावात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांची मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर आणि मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची कोहिनूर सीटीएनएल यांनी एकत्रितपणे 421 कोटांची बोली लावून ही जागा विकत घेतली.
 
राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांनी इन्फ्रास्ट्रक्चर लिजींग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हीसेस (IL & FS) या सरकारी कंपनीशी बोली लावली.
 
ही कंपनी पायाभूत सुविधा करण्यासाठी वित्तपुरवठा आणि गुंतवणूक करते. कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांच्यासोबत IL & FS ने 860 कोटींची गुंतवणूक केली होती.
 
IL & FS ने ही गुंतवणूक काढून घेतली आणि पुन्हा या प्रकल्पात काही गुंतवणूक केली. यामध्ये IL & FS या कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा संशय ईडीला होता. त्याचा तपास ईडीने सुरू केला. 22 ऑगस्ट 2019 ला या प्रकरणी राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. राज ठाकरे यांची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली.
 
शरद पवार
सप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीनकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
पोलिसांच्या एफआयआरनुसार 1 जानेवारी 2007 ते 31 मार्च 2017 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचं 25 हजार कोटींचं नुकसान झालंय.
या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माजी संचालकांची 70 नावं आहेत. त्यापैकी 50 जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलय. ही नोटीस शरद पवार यांना आल्यानंतर 27 सप्टेंबरला मी स्वतः ईडी कार्यालयात उपस्थित राहून ईडीच्या अधिकार्‍यांना माहिती देणार असल्याचं पवार यांनी जाहीर केलं.
 
ईडी अधिकार्‍यांनी असं न करता गरज असल्यास आम्ही स्वतः बोलवू अशी विनंती केली. त्यानंतर पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलं नाही.
 
प्रताप सरनाईक
24 नोव्हेंबर 2020 शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्याचे पुत्र विहंग सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले. त्यानंतर विहंग सरनाईक यांची ईडीने 5 तास चौकशी केली. टॉप ग्रुप सिक्युरिटीज एमएमआरडीएमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत ही चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात सरनाईक यांचा व्यवसायिक भागीदार अमित चांदोले याला 25 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. सरनाईक यांच्या वतीने चांदोले यांनी पैसे स्विकारल्याचा आरोप आहे. 10 डिसेंबरला प्रताप सरनाईक हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहीले. त्यांची 6 तास चौकशी करण्यात आली.
 
एकनाथ खडसे
भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर 2016 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावेळी खडसे यांना महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांची झोटींग कमिटी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याद्वारे चौकशी करण्यात आली होती.
आता याप्रकरणी खडसे यांना डिसेंबर 2020 मध्ये ईडीने नोटीस बजावली आहे. 30 डिसेंबरला खडसे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत असल्यामुळे खडसे उपस्थित राहीले नाहीत.
 
संजय राऊत
पीएमसी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेला कर्जाच्या रकमेचा व्यवहाराबाबत ईडीला संशय असल्याचं बोललं जातंय.