गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (16:08 IST)

कोरोना व्हायरसचं मूळ शोधण्याचा प्रयत्न पुण्यातील दांपत्य का करतंय?

मयांक भागवत
कोरोना व्हायरस कुठून आला? याचा उगम कसा झाला? हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न पुण्यातील, दोन मराठमोळे संशोधक, डॉ. मोनाली रहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर करत आहेत.
 
या दांपत्याला संशोधनादरम्यान वटवाघुळांपासून पसरणारा RATG13 व्हायरस आणि कोरोनामध्ये 96 टक्के साम्य असल्याचं आढळून आलं. त्यांनंतर डॉ. रहाळकर आणि डॉ. बहुलीकर यांनी कोव्हिड-19 च्या मुळाशी जाण्याचं ठरवलं.
 
एकीकडे, कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून लिक झाल्याची थेअरी चर्चेत आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी व्हायरस लिक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, यावर अधिक तपास गरजेचा आहे असा रिपोर्ट दिलाय.
 
या पार्श्वभूमीवर पुण्याच्या आगरकर रिसर्च इंन्स्टिट्युटच्या संशोधक डॉ. मोनाली रहाळकर यांच्याशी बीबीसीने केलेली बातचीत.
 
कोरोनाव्हायरसचं मूळ शोधण्याचा प्रयत्न तुम्ही का करताय?
 
डॉ. मोनाली रहाळकर- पहिल्यांदा सांगण्यात आलं की वुहानच्या सी-फूड मार्केटमधून संसर्ग पसरला. पण, लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये आढळलं की संसर्गाची काही प्रकरणं सी-फूड मार्केटशी संबंधित नव्हती. मग त्यांना संसर्ग कसा झाला? हा प्रश्न होता.
 
कोरोनाचं मूळ वटवाघुळ आहेत अशी माहिती पुढे आली. वुहान इंन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजिच्या संशोधनात, वटवाघुळापासून पसरणारा RATG13 व्हायरस आणि कोरोनामध्ये 96 टक्के साम्य असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे हा वटवाघुळांपासून आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
आमच्या संशोधनात आढळलं की, हॉर्स-शू जातीचे वटवाघुळ वुहानमध्ये आढळत नाहीत. वुहानच्या मार्केटमध्ये ही वटवाघुळं विकण्यासाठी नसतात. त्यामुळे कोरोना नैसर्गिक पद्धतीने आला असावा यावर विश्वास बसला नाही.
 
वुहानच्या लॅबमधून संशोधन करताना व्हायरस बाहेर पडला असावा अशा शंका उपस्थित होत होत्या. त्यामुळे आम्ही संशोधन सुरू केलं.
 
चीनमध्ये एका खाणीत वटवाघुळांमुळे पसरणाऱ्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची प्रकरणं समोर आली होती. तुम्ही त्यावर संशोधन केलंत. काय आढळून आलं?
 
डॉ. मोनाली रहाळकर- कोरोनाचा सर्वांत जवळचा भाऊ RATG13 या व्हायरसबद्दल संशोधन सुरू केलं. यूनान प्रांतातील एका खाणीत याचा उगम आढळून आला.
 
तपासादरम्यान, काही खाण कामगारांना कोव्हिडसारखाच 14 दिवसानंतर येणारा ताप, सर्दी, खोकला झाला होता. याचं रूपांतर न्यूमोनियामध्ये झालं. कामगारांना झालेला न्यूमोनिया आणि कोव्हिडची तुलना करणारं संशोधन आम्ही 2020 मध्ये केलं. या दोन्हीमध्ये खूप साम्य आढळून आलं.
न्यूमोनिया झालेले रुग्ण खूप दिवस रुग्णालयात दाखल होते. गुंतागुंत हळूहळू वाढू लागली. शरीरात रक्ताची गुठळी झाली होती, ज्या प्रमाणे कोरोनासंसर्गात होतं. या रुग्णांचे सीटी स्कॅनसुद्धा कोरोनासंसर्ग झालेल्या रुग्णासारखेच होते.
 
तुम्ही म्हणताय, या दोन व्हायरसमध्ये साम्य आहे. मग प्रश्न असा की हा व्हायरस वुहानमध्ये कसा आला? याचा पुरावा काय?
डॉ. मोनाली रहाळकर- कामगारांना RATG13 या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं ठोसपणे सांगता येणार नाही. पण, शक्यता नाकारता येत नाही किंवा याच्या जवळपासचा व्हायरस असण्याची शक्यता आहे.
 
वुहान इंन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीने 2012 ते 2015 या काळात या खाणीतून वटवाघुळांच्या विष्ठेचे नमुने गोळा केले. हे नमुने 1800 किलोमीटर लांब वुहानला आणण्यात आले. खाणकामगारांच्या रक्ताचे नमुने आणि घशाचे स्वॅब लॅबमध्ये आणण्यात आले होते.
 
वुहान इंन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये नक्की काय सुरू होतं?
 
डॉ. मोनाली रहाळकर- ही लॅब वटवाघुळांपासून माणसांना संसर्ग कसा होतो यावर संशोधन करते. 2018 मध्ये संशोधकांना RATG13 व्हायरसची माहिती मिळाली होती. त्याचसोबत, सार्स कोव्हिडसारखे 8 इतर व्हायरस मिळाले होते. पण, त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये याची माहिती दिली.
 
खाणीत मिळालेला व्हायरस आणि वुहान इंन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीचा काय संबंध? यातील लिंक काय?
 
डॉ. मोनाली रहाळकर-सर्व नमुने लॅबमध्ये आणले जायचे. वटवाघुळांमधील कोरोनाव्हायरसचे 16000 नमुने लॅबमध्ये होते. किती नमुन्यांवर संशोधन केलं, याची माहिती नाही. कारण, सप्टेंबर 2019 पासून त्यांचा डेटाबेस ऑफलाईन आहे. कोरोना साथ डिसेंबर 2020 पासून सुरू झाली. मग, डेटाबेस आधीच का ऑफलाईन झाला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
वुहान इंन्स्टिट्युट आणि इतर लॅबमध्ये व्हायरस किती धोकादायक आहे. हे शोधण्यासाठी जिवंत व्हायरसमध्ये इतर व्हायरसचे स्पाईक प्रोटीन क्लोन करून टाकले जायचे. माणसांमध्ये व्हायरसचा संसर्ग होतो का यावर संशोधन केलं जायचं.
 
ही लॅब संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं कारण म्हणजे, RATG13 आणि इतर नमुने त्यांनीच आणले होते. त्यामुळे, आपण अंदाज बांधू शकतो की, अनावधानाने किंवा अपघाताने आणि सुरक्षा कमी असल्याने व्हायरसचा संसर्ग लॅबमध्ये काम करणाऱ्याला झाला असेल. त्यानंतर हा संसर्ग वुहानमध्ये पसरला.
 
याचे शास्त्रीय पुरावे आहेत का?
 
डॉ. मोनाली रहाळकर- वुहान इंन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीचे शोध निबंध नेचरसारख्या जर्नलमध्ये छापण्यात आलेत. खाण कामगारांना झालेल्या न्यूमोनियाबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केले. त्यावर नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी माहिती प्रसिद्ध केली.
त्यांनी सांगितलं की, तीन वर्ष यावर काम सुरू होतं. 2013 पासून नमुने गोळा केल्याची आणि इतर संशोधनांबद्दल महिती देण्यात आली. पण, खाणीत आढळून आलेल्या व्हायरसबद्दल कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर माहिती देण्यात आली. तर, इतर आठ व्हायरसबाबत सव्वा वर्षानंतर माहिती दिलीये.
 
काहीतरी लपवाछपवी किंवा अर्धवट माहिती देण्यात आली.
 
वुहान इंन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधक झेंग-ली यांच्याची काही चर्चा झाली का?
 
डॉ. मोनाली रहाळकर- झेंग-ली यांच्याशी थेट कधीच चर्चा होऊ शकली नाही. जुलै 2020 मध्ये एका संभाषणात त्यांनी काही माहिती दिली. आम्ही त्यांना प्रश्न पाठवले पण, ते विचारण्यात आले नाहीत.
 
झेंग-ली यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं, 2015 मध्ये संशोधक त्या खाणीत जात होते.
 
वुहान इंन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये नक्की काय झालं असावं?
 
डॉ. मोनाली रहाळकर- नैसर्गिकरीत्या संसर्ग होण्याची शक्यता मला थोडी कमी वाटते. 2012 ते 2019 मध्ये नमुने घेऊन येणाऱ्यांना संसर्ग झाल्याचा कुठलाच पुरावा नाही. खाणीच्या जवळही कोणी आजारी पडलं नाही.
 
लॅबमध्ये काम करताना संसर्ग होण्याची शक्यता आहे. तयार होणारा जैविक कचरा योग्य पद्धतीने नष्ट झाला नसल्यास संसर्ग पसरण्याची भीती आहे. व्हायरसचा अभ्यास कोणावर सुरू होता याची माहिती नाही. त्यामुळे याचा तपास करायला हवा.
 
व्हायरस लॅबमधून आलाय का याचा शोध घेणं गरजेचं आहे. कोणतं संशोधन सुरू होते? जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्य झाली होती का? संशोधनाचे रेकॉर्ड तपासले पाहिजेत.
 
व्हायरस लिक झाल्याचा पुरावा नाही. पण, संशयाला जागा आहे का की व्हायरस लिक झालाय?
 
डॉ. मोनाली रहाळकर- आपण हे गृहितक परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मांडतोय. कोरोनाव्हायरस नैसर्गिक आहे, याचे ठोस पुरावे आढळून आले नाहीत. व्हायरस असलेले प्राणी किंवा वटवाघुळ सापडलं नाही.
 
खाणीत सापडलेला व्हायरस माणसांमधून माणसांमध्ये जात नव्हता. माणसांपासून माणसांना संसर्ग होण्यासाठी व्हायरसमध्ये बदल व्हावे लागतात ते लॅबमध्ये झाले का? हा संशय आहे. या व्हायरसचे काही फिचर्स नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा संशय आहे. पण, हा व्हायरस लॅबमधून लिक झाला असं ठोस सांगता येणार नाही.
 
कोरोनाव्हायरसबद्दल अनुत्तरित प्रश्न कोणते आहेत?
 
डॉ. मोनाली रहाळकर- चीनमध्ये साथ कधी सरू झाली? याची माहिती नाही. कुठल्या प्रकारचे संशोधन सुरू होते? किती जिवंत व्हायरस आहेत? कुठले तयार केले होते? याची माहिती उपलब्ध नाहीये.