शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (08:47 IST)

मंगेश देसाईंनी केली “या” चित्रपटाची घोषणा

मुंबई : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आता या चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
 
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगला २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे सुरुवात झाली होती. या चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा केली आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
त्यावेळी मंगेश देसाई म्हणाले की, धर्मवीरांच्या खूप गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत, अनेक भाग करूनही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ मध्ये घेऊन येत आहोत. ‘धर्मवीर’ एका भागात संपणारा विषय नसून, तो एक खंड आहे.
 
मंगेश देसाई पुढे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांचे अनेक पैलू अद्याप गुलदस्त्यातच आहेत. त्यांच्या अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा आनंद दिघे नामक ज्वलंत व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारणारा अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
 
धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये आनंद दिघे यांची अखंड राजकीय कारकीर्द पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या शेवटी आनंद दिघे यांचे निधन झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागामध्ये नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
 
‘धर्मवीर’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून पहिल्या भागातील कलाकारांची फौज दुसऱ्या भागातदेखील आपापल्या व्यक्तिरेखेला न्याय देताना दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील प्रवीण तरडे करणार आहेत. आता धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor