सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (13:25 IST)

सार्थ श्रीदेवीस्तोत्रे : शक्ती उपासनेसाठीचे मौलिक पुस्तक!

शक्ती उपासनेची एक समृद्ध परंपरा भारतवर्षाला लाभलेली आहे. अगदी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही श्रीदेवीच्या नितांत सुंदर स्तोत्रांची रचना आपल्याला आढळते. मराठवाडा ही संतांची भूमी असे अभिमानाने सांगितले जाते. या संत परंपरेतील थोर संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील श्रीगुरु भगवानशास्त्री महाराज! या थोर संताचा वारसा अत्यंत समर्थपणे पुढे चालविणारे  सुप्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर! शास्त्री यांच्या घराण्याला श्रीदेवीभक्तीची थोर परंपरा लाभली आहे, जणू देवीमातेचा वरदहस्त लाभला आहे!
 
नुकतेच ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्रीजींनी संकलित आणि अनुवादित केलेले 'श्रीदेवीस्तोत्रे' हे भक्तीरसाने ओथंबलेले पुस्तक वाचण्यात आले. संस्कृत भाषेतील या स्तोत्रांचा मराठी अर्थासह अनुवाद केलेल्या या पुस्तकाचा नित्यपाठासाठी माउलीच्या भक्तांना उपयोग होईल असा हा ग्रंथ आहे.  श्रीदेवीस्तोत्रे हे पुस्तक नवरात्री उत्सवाच्या मंगल समयी शॉपिज़न प्रकाशन, अहमदाबाद, गुजरात यांचे द्वारे प्रकाशित झाले आहे. मुखपृष्ठ अत्यंत बोलके आणि भक्तीरसाने परिपूर्ण असे आहे. श्रीरेणुकामातेचे प्रसन्न मुख आणि त्याखाली अत्यंत भावपूर्ण आणि तितकीच प्रसन्न अशी लेखक डॉ. चंद्रहास यांची भक्तीमय मुद्रा! मलपृष्ठावर श्रीमत् आद्य शंकराचार्य, संत श्री रंगनाथमहाराज आणि संत श्री भगवानशास्त्री महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करणारी लेखक सोनपेठकर यांची भावमुद्रा लक्षणीय आहे.
 
आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून  स्तोत्र साहित्य गंगा प्रवाहित आहे. अनेक पुराणांमध्ये सुद्धा विविध देवतांची विविध स्तोत्रे आपल्याला दिसून येतात. तसेच भारतीय संस्कृतीत शक्ती आराधनेची सुद्धा एक जाज्वल्य अशी परंपरा दिसून येते. “कलौ चण्डीविनायकौ |” अशा शब्दांत कलियुगात भगवान गणेश आणि भगवतीच्या उपासनेचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. वेदांमध्ये,  मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी अनेक पुराणांत, अनेक तंत्र वाङ्मयात, आद्य शंकराचार्यादि महान विभूतींच्या रचनांमध्ये स्तोत्र वाङ्मयाची प्रगल्भ परंपरा आपल्याला दिसून येते. मराठी साहित्यात देखील अनेक सुंदर स्तोत्रे आहेत. 
 
ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर हे प्रवचनकार, संस्कृत कवी, कीर्तनकार, भागवतकार म्हणून प्रसिद्ध आहेतच, पण विशेष म्हणजे त्यांच्या घराण्याला जगदंबेच्या भक्तीची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. थोर शाक्त पंथी साधू श्री योगानंद स्वामी महाराज, संत श्री भगवानशास्त्री महाराज यांच्या रूपात श्रीदेवीभक्तीची महान परंपरा त्यांना लाभली आहे. डॉ. चंद्रहास शास्त्री यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि त्यांच्या पत्नी संस्कृत शिक्षिका तसेच अभिज्ञान, पुणे या संस्थेच्या संचालिका सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या सहलेखनाने प्रस्तुत पुस्तक सिद्ध झाले आहे. 
 
नित्य पाठासाठी सार्थ श्रीदेवीस्तोत्रे या पुस्तकाची काही महत्वाची अशी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील.
 
१. स्तोत्रांची निवड: या पुस्तकात श्रीमदाद्यशंकराचार्य विरचित श्रीदेवीच्या पाच स्तोत्रांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीदेव्यपराधक्षमापनस्तोत्रम्, श्रीकनकधारास्तोत्रम्, श्रीभवान्यष्टकम्, श्रीललितापञ्चकम् आणि श्रीमनीषापञ्चकम् या स्तोत्रांचा समावेश या पुस्तकात आहे. ही पाचही स्तोत्रे नितांत सुंदर आहेत. भक्तीरसाने ओतप्रोत अशी आहेत. ही स्तोत्रे म्हणण्यासाठी सोपी आहेत. आशयघन आहेत. 
 
२. सार्थ स्तोत्रे: या पुस्तकात स्तोत्रांची अचूक अशी संस्कृत संहिता तर आहेच, त्याच बरोबर स्तोत्रांचा मराठी अर्थ सुद्धा समर्पकपणे या पुस्तकात दिलेला आहे. त्यामुळे ह्या स्तोत्रांचा भावार्थ वाचकांना, भक्तांना समजून घ्यायला खूप सोपे झाले आहे. त्यासाठी डॉ. चंद्रहास शास्त्री यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
 
३. आकर्षक मांडणी: 
पुस्तकातील स्तोत्रांची मांडणी सुव्यवस्थित अशी आहे. स्तोत्र म्हणताना ते अखंड म्हणता यावे, म्हणून आधी संपूर्ण संस्कृत स्तोत्र दिले आहे. आणि नंतर स्तोत्राचा अर्थ देखील मराठीत अखंड दिला आहे. 
 
४. चंद्रहास शास्त्री विरचित स्तोत्र:
या पुस्तकात डॉ. चंद्रहास शास्त्री विरचित श्रीदुर्गादेवीचे १०८ श्लोकांचे संस्कृत स्तोत्र सुद्धा देण्यात आले आहे. प्रस्तुत स्तोत्र ही कवीने अंबाबाईच्या चरणाशी केलेली आर्त अशी प्रार्थना आहे. भक्तीरसप्रधान असे हे स्तोत्र वाचकांना एक गोष्ट नक्की सांगून जाते की, आजच्या काळात देखील सुंदर अशा संस्कृत रचना केल्या जातात. संस्कृत ही जिवंत भाषा आहे. अमर वाणी आहे, अशी साक्षच जणू या आशयघन स्तोत्राने मिळते.

५. विशेष लेख : विसाव्या शतकातील एक महान संत वारकरी परंपरा आणि शक्ती उपासनेची परंपरा यांचा समन्वय ज्यांच्या ठायी दिसून येतो, असे श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचे अल्पचरित्र सांगणारा, सौ. मानसी चंद्रहास शास्त्री यांचा एक विशेष लेख या पुस्तकात आहे. या लेखातून श्री भगवानशास्त्री यांच्या अलौकिक कार्याची ओळख वाचकांना होते. तसेच डॉ. चंद्रहास शास्त्री यांच्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा 'अमृताची फळे अमृताची वेली' प्रा. विराज आडे यांचा हा विशेष लेख  या पुस्तकात आहे. यामुळे या पुस्तकाचे महत्व देखील विशेष असे झाले आहे, असे म्हणावेसे वाटते. 
 
डॉ. चंद्रहास शास्त्री यांच्या सिद्धहस्त लेखणीतून यापूर्वी नारदभक्तीसूत्र, values in Raghuvansham, Essays on Education, भगवती रंगचंद्र गाथा, श्रीरेणुकाशरणम्ः अशी विविध प्रकारची पुस्तके प्रसवली आहेत. मुळात शास्त्रीजींचा स्वर हा मधाळ, प्रेमळ असा आहे. हाच भाव त्यांच्या लेखणीतूनही उतरला आहे त्यामुळे वाचकांचा भक्तीभाव अधिक दृढ होतो. असे हे भक्तीपूर्ण अंतःकरणाने लिहिलेले पुस्तक शॉपिज़न या संस्थेच्या वेबसाईटवर सशुल्क उपलब्ध आहे.
 
एकंदरच, श्रीदेवीच्या उपासनेत मान्यता असणारी अशी स्तोत्रे या पुस्तकात अर्थासह दिली आहेत. श्रीदेव्यपराधक्षमापनस्तोत्रम्, श्रीकनकधारास्तोत्रम्, श्रीभवान्यष्टकम्, श्रीललितापञ्चकम् आणि श्रीमनीषापञ्चकम् या स्तोत्रांचा समावेश या पुस्तकात आहे. भुक्तिमुक्ति प्रदायिनी अशा भगवतीच्या नितांत सुंदर स्तोत्रांचा समावेश असणारा हा स्तोत्र संग्रह नक्कीच संग्रहणीय आहे. 
 
नित्यपाठासाठी सार्थ श्रीदेवीस्तोत्रे, 
संकलन व अनुवाद: ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर,पुणे.
सहलेखन: सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर,
शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद (कर्णावती), गुजरात 
पृष्ठसंख्या: ६०
मूल्य: १५०/- रु.
आस्वादक भक्त: नागेश सू. शेवाळकर, पुणे.