गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 (11:09 IST)

श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सवाचा प्रथम दिवसीय सोहळा

Ropya Mahotsav
८ व ९ नोव्हेंबर रोजी इंदूर येथील वासुदेवराव लोखंडे मंगल भवन लोकमान्य नगर किशोर बाग रोड इंदूर येथे मध्य भारतातील एकमेव मराठी मासिक श्रीसर्वोत्तमचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ८ नोव्हेंबर, प्रथम दिवसीय कार्यक्रम अतिशय थाटात पार पडला. दुपारच्या प्रथम सत्रात अभय माणके यांचे अभंग छान रंगले. प्रेक्षक भक्ती रंगात रंगून गेले.त्या नंतर पुणे येथून आलेल्या वंदना धर्माधिकारी यांची पत्त्यांची शाळा भरली. 

Sachhidanand Joshi
संध्याकाळी ५.३० वाजता द्वितीय सत्र सुरू झाले. या सत्रात माजी लोकसभा अध्यक्ष माननीय सुमित्रा ताई महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या शिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केन्द्र, नवी दिल्ली चे सदस्य सचिव डॉ. श्री सच्चिदानंद जोशी, ज्येष्ठ कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यकार व आनंदघनचे संपादक श्री श्री देवीदास पोटे, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली चे अध्यक्ष श्री मिलिंद महाजन, व श्री सर्वोत्तम चे मार्गदर्शक बाबासाहेब तराणेकर उपस्थित होते. मार्गदर्शक बाबासाहेब तराणेकर यांनी श्रीसर्वोत्तम च्या विविधांगी विशेषांकांचे वर्णन करत श्रीर्वोत्तम विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात सुमित्रा ताई महाजन यांनी श्रीसर्वोत्तम चे कौतुक करताना म्हटले की श्रीसर्वोत्तम पत्रिकेचे सातत्याने २५ वर्ष प्रकाशित होणे, हे आपली संस्कृती, आपली भाषा कशी टिकणार यावर उत्तर आहे. त्यांनी आपल्या उद्बोधनात इंदूर चे नाव प्रसिद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका कल्पना झोकरकर व नाट्यकर्मी श्रीराम जोग यांचे विशेष कौतुक केले. 

पद्मश्री मालती जोशी, यांचे सुपुत्र आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केन्द्र, नवी दिल्ली चे सदस्य सचिव डॉ. श्री सच्चिदानंद जोशी यांनी आपल्या आई म्हणजेच स्व. मालती जोशी विषयी सुंदर आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, आईला इंदूर मधून बाहेर काढले पण इंदूर काही आईतून बाहेर पडू शकले नाही. मालती जोशी यांनी सातत्याने श्रीसर्वोत्तम दिवाळी अंकात आपल्या कथा दिल्या. 

त्या नंतर सत्कार समारंभ पार पडला. यात मध्यप्रदेश शिखर सन्मान प्राप्त गायिका कल्पनाताई झोकरकर व नाट्यकर्मी श्रीराम जोग यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ऑस्कर साठी नामांकित हिंदी चित्रपट लापता लेडीज चे कलाकार विवेक सावरीकर यांचाही सत्कार करण्यात आला. नंतर पद्मश्री मालती जोशी स्मृती कथा स्पर्धेचे विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. सत्कार समारंभ नंतर 'कवी ते गीतकार एक सुरेल प्रवास' हा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे सफल सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाला एक वेगळाच दर्जा दिला. मराठीच्या प्रसिद्ध कवींच्या कविता व त्यांचे गीत असा हा आगळावेगळा कार्यक्रम होता. संगीतिका समूह इंदूरच्या कलाकारांनी सुरेल गाण्यांची प्रस्तुती दिली आणि प्रेक्षकांना बांधून ठेवले. तर असे श्री सर्वोत्तम च्या रौप्य महोत्सवी उत्सवाचा प्रथम  दिवसीय सत्र अतिशय दिमाखात पार पडला. 
 
रिपोर्टिंग: ऋचा दीपक कर्पे