रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By वेबदुनिया|

डोळ्यांना नवसंजीवनी देणारे डॉ. हार्डिया

विविधतेने नटलेल्या वसुंधरेला न्याहाळण्यासाठी आवश्यक असते दृष्टी! सगळं ऐश्वर्य आहे पण ते पाहण्यासाठी डोळे नसतील तर ते ऐश्वर्य कवडीमोल नाही का? नाजूक सुंदर डोळ्यांना नवसंजीवनी देणारे मध्य प्रदेशातील इंदूर येथील डॉ. हार्डिया यांनी आजपर्यंत साडेसहा लाख नागरिकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी दिली आहे. वैद्यकिय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांच्या नावाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकार्डं'मध्ये नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवेच्या प्रवासाबाबत डॉ. हार्डिया यांच्याशी केलेली बातचीत...

विद्यार्थीदशेत असताना पुढे जाऊन काय व्हावे असे वाटत होते?
खरं सांगायचे तर मी डॉक्टर होण्याचे स्वप्न तर कधीच पाहिले नव्हते. लहानपणी मी खूप खोड्या करायचो. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला इंदूरच्या प्रसिद्ध मल्हाराश्रम या शाळेत भरती केले होते. तेथे राहून स्वावलंबन काय असते हे मला कळाले. तेव्हापासून माझी कामे ‍मी स्वत: करत होतो. वडिलांची इच्छा व त्यांच्या आशीर्वादाने वैद्यकीय महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला. त्यावेळी डॉक्टर म्हणजे परमेश्वरच, असे मी समजत होतो. तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितले, की डॉक्टर म्हणजे दुसरी आईच असते. त्यामुळे गरीबांची सेवा कर. पैशांच्या मागे धावू नकोस. बस्स त्यांच्या या मार्गदर्शनाच्या जोरावर मी आतापर्यंतचा प्रवास केला आहे.

आपण किती नागरिकांना दृष्टी देण्यात यशस्वी झाला आहात?
मी साधारण साडेसहा लाख नागरिकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली आहे. यापुढे तर मी ते लक्षात देखील ठेवणार नाही. मला कुठल्याच प्रकारच्या पुरस्काराची अपेक्षा नाही.

WD
आपल्या नावाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'मध्ये नोंद झाली आहे, याबाबत काही सांगू शकाल?
'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'मध्ये नाव आल्याने कोणी मोठं होत नाही. कुठलाही व्यक्ती त्याच्या कार्याने मोठा होत असतो. कार्य जर निष्ठा आणि निस्वार्थीपणाने केले असेल तर ती मोठी गोष्ट आहे. व्यक्तीच्या आयुष्यात डोळ्यांचे किती महत्त्व असते, हे मला वडिलांनी लहानपणीच सांगून ठेवले होते. त्यामुळे भारतभरातून येणार्‍या नेत्ररोग पिडीतांना मी कधीच निराश करत नाही.

आपल्या रूग्णालयात गरीब, गरजुंसाठी विशेष सवलत दिली जाते?
खरं आहे. रूग्णालयात येणार्‍या प्रत्येक गरीब व गरजू नागरिकांची मी मदत करतो. 24 तास कमी मोबदल्यात काम करणार्‍या नागरिकांकडून मी फी घेतली तर ते कुणाला तरी लुटतील. मला अशा पैशाची काहीच गरज नाही.

आपल्या रूग्णालयातील सुविधांबाबत काही सांगा ?
माझ्या रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आली आहे. आशियात लेजर मशीन आणारा मी पहिलाच आहे. आर्कची सर्जरी ही केवळ ‍रशिया अथवा अमेरीकेमध्येच होत होती. मुलांचा लहानपणात चष्म्याचा नंबर वाढण्याच्या समस्येला कुठल्या मार्गाने थांबवता येईल, या संदर्भात रिसर्च करून त्या दिशेने माझे निरंतर कार्य सुरू आहे.

WD
निशुल्क शिबिराच्या आयोजनामागे काय उद्देश आहे?
आम्ही वर्षातून दोन वेळा शिबिराचे आयोजन करतो. पहिले म्हणजे 19 मार्चला, त्या दिवशी माझ्या वडिलांची जन्मतिथी असते व दुसरे म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीला दि. 10 ऑगस्ट रोजी. या माध्यमातून गरीबांची सेवा करणे हाच प्रमाणिक उद्देश आहे. 1981 सालापासून कधी न खंड पडता शिबिराची परंपरा सुरू आहे.

आज प्रत्येक कार्यालयात कॉम्प्यूटर आले आहेत. त्यावर काम करणार्‍यांच्या डोळ्यांचे रक्षण कसे केले जाऊ शकते?
आपल्या डोळ्यांमध्ये एक 1 मि.मी.चा पडदा असतो. त्याला मॅक्यूला म्हणतात. मॅक्यूलाला जास्त वेळ व्यस्त ठेवणे डोळ्यांसाठी घातक असते. त्यामुळे कॉम्प्युटरवर काम करणार्‍यांनी थोड्या थोड्या अंतराने डोळ्यांना आराम दिला पाहिजे. तसेच सतत चालू लाईट व टीव्ही पाहिल्याने ही मॅक्यूला लवकर निकामी होतो.

सर्जरी न करता चष्मा सोडला जाऊ शकतो?
सर्जरी तर करावीच लागते. तंत्र-मंत्र किंवा गळ्यात ताईत बांधून जरी चष्मा सोडला जाऊ शकत असेल, मात्र यावर माझा विश्वास नाही. डोळ्यात असलेल्या बाहुलीचा आकार जेव्हा लहान-मोठा होतो तेव्हा चष्मा लागतो. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावीच लागते.

वेबदुनियाच्या वाचकांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता?
आपल्या कार्यावर निष्ठा ठेवा. उगीच पैशाच्या मागे धावू नका. आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद...