मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (19:53 IST)

कोरोना :गरोदर महिलांनाही घेता येणार कोव्हिड-19साठीची लस

भारतातल्या गरोदर मातांनाही आता कोव्हिड-19साठीची लस घेता येणार आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठीची मंजुरी दिली आहे.
 
गरोदर महिलांनाही कोरोना लस देण्यात यावी अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने दिली असून लसीकरण गरोदर महिलांसाठी उपयोगाचं असून त्यांनाही लस देण्यात यावी, असं ICMR चे डेप्युटी जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटलंय.
 
21 जूनपासून देशातल्या 18 वर्षांपेक्षा मोठ्या सर्व नागरिकांना सरकारी केंद्रावर मोफत लस द्याला सुरुवात झालेली आहे.
 
देशातली कोरोना संसर्गाची दुसरी लाट एकीकडे आटोक्यात येतेय तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जातेय. म्हणूनच लसीकरण मोहीमेचा वेग वाढवत ही लाट थोपवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
 
कोव्हिड -19साठीची लस आणि ही लसीकरण मोहीम यांच्या बद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरं आपण पाहू.
 
लस कोण घेऊ शकतं?
18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती लस घेण्यासाठी पात्र आहे. देशातल्या गरोदर महिलांनाही लस घेण्यास आता परवानगी देण्यात आली आहे.
 
पण लशींच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातलं 18-44 वयोगटाचं लसीकरण काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं,आता हे लसीकरण पुन्हा सुरू होतंय.
 
16 जानेवारी 2021 पासून भारतामध्ये कोव्हिड - 19 साठीच्या लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली.
 
त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं.
 
लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची?
कोविन (Co-win) वा आरोग्य-सेतू अॅपवरून तुम्ही लसीकरणासाठीची नोंदणी करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन स्वतःचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल.
 
यानंतर या मोबाईलनंबरवर ओटीपी मिळवून तुम्ही ज्या व्यक्तींना लस घ्यायची आहे, त्यांचे तपशील रजिस्टर करू शकता.
 
एका मोबाईल नंबरवर तुम्हाला 4 लोकांची नावं नोंदवता येतील. यानंतर तुम्ही तुमचा पिनकोड वा जिल्हावार लसीकरण केंद्र शोधून उपलब्ध वेळेपैकी एक स्लॉट बुक करू शकता.
 
ही प्रक्रिया कोविन वेबसाईट, कोविन अॅप वा आरोग्य सेतू अॅपवरून करता येईल.
 
तपशीलवार प्रक्रियेसाठी वाचा - कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवरून लशीसाठी नोंदणी कशी करायची?
 
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यायचा?
लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी तुम्हाला कोविनवरून पुन्हा स्लॉट बुक करावा लागेल. काही केंद्रांमध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी 'वॉक-इन' सुविधा असते. थेट तिथे जाऊनही तुम्हाला दुसरा डोस घेता येईल.
 
तुम्ही ज्या लशीचा पहिला डोस घेतलाय, त्याच लशीचा दुसरा डोस तुम्हाला घ्यायचा आहे.
 
कोव्हिशील्ड घेणाऱ्यांसाठी लशीच्या दोन डोसांमधलं अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे केलेलं आहे. पण ज्यांना परदेश प्रवासापूर्वी लशीचे दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी ही अट शिथील करण्यात आली आहे.
 
दोन्ही डोस घेतल्यानंतरच परदेश प्रवास करता येणाऱ्यांसाठी पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी कोव्हिशील्डचा दुसरा डोस घेण्याची मुभा सरकारने दिली आहे.
 
कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेता येतो.
 
स्पुटनिक लशीच्या दोन डोसमध्ये 3 आठवड्यांचं अंतर ठेवण्यास सांगण्यात आलंय.
 
पण पहिला डोस ज्या लशीचा घेतलाय, त्याच लशीचा दुसरा डोस घेणं गरजेचं आहे. म्हणूनच दुसरा डोस घ्यायला जाताना, पहिला डोस घेतल्यानंतर देण्यात आलेलं सर्टिफिकेट दाखवावं.
 
लस घेतल्यानंतर हे सर्टिफिकेट दिलं नसेल, तर तुम्ही कोविन पोर्टलवरूनही तुमचा मोबाईल नंबर टाकून हे सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
 
भारतात कोणत्या लशी दिल्या जातायत?
भारतामध्ये देण्यात येणाऱ्या लशींना भारताच्या औषध महानियंत्रकांनी म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मान्यता दिलेली आहे.
 
कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी भारतात सुरू असणाऱ्या कोव्हिड-19साठीच्या लसीकरण मोहीमेत देण्यात येत आहेत. स्पुटनिक ही आता भारतामध्ये उपलब्ध असलेली तिसरी लस असेल. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे.
 
कोव्हिशील्ड ही लस भारतामध्ये पुण्यात असणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करतेय. ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनकाने विकसित केलेली ही लस आहे.
 
कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादमधली भारतीय कंपनी - भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने तयार केली आहे.
 
स्पुटनिक-5 ही लस भारतामध्ये डॉ. रेड्डीज लॅबने आणली आहे. स्पुटनिक-5 या लसीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचं रशियाने म्हटलंय.
 
लस मोफत आहे का?
देशामधल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 जून 2021 रोजी केली होती. त्यानुसार 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू झालेलं आहे.
 
आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील नागरिकांना यापूर्वीच सरकारी हॉस्पिटल्स आणि केंद्रांवर मोफत लस द्यायला सुरुवात झालेली होती.
 
त्यानंतर या केंद्रांवर 18-44 वयोगटातल्या व्यक्तींचंही मोफत लसीकरण करण्यात येत असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं होतं.
 
आता केंद्र सरकारनेही सर्वांसाठी मोफत लसीकरण जाहीर केलंय.
 
उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, बिहार, छत्तीसगड, केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांनीही 18-44 वयोगटालाही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला होता.
 
खासगी हॉस्पिटल्समध्ये पैसे भरून ही लस घेता येतेय. यासाठी 1 मे पासून खासगी हॉस्पिटल्स थेट लस उत्पादकांकडून लससाठी विकत घेत आहेत.
 
कोव्हिशील्ड लशीचा प्रत्येक डोस 600 रुपयांना तर कोव्हॅक्सिनचा प्रत्येक डोस 1200 रुपयाने उत्पादक कंपन्या हॉस्पिटल्सना देत आहेत. त्यावर स्वतःची फी आकारत खासगी हॉस्पिटल्स लसीकरणासाठीचे दर आकारत आहेत.
 
या दोन्ही लशी केंद्र सरकारला 150 रुपये प्रति डोस दराने मिळत आहेत.
 
खासगी हॉस्पिटल्सना लसीकरणासाठी किती दर आकारता येतील, याची मर्यादाही केंद्र सरकारने ठरवून दिली आहे.
 
कोव्हॅक्सिनच्या प्रत्येक डोससाठी खासगी हॉस्पिटल्सना जास्तीत जास्त रु.1,410 तर कोव्हिशील्डच्या एका डोससाठी जास्तीत जास्त रु.780 आकारता येतील.
 
स्पुटनिक - V लशीच्या एका डोससाठी हॉस्पिटल्सना जास्तीत जास्त रु. 1,145 आकारता येतील.
 
कोव्हिडची लस सुरक्षित आहे का?
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आतापर्यंत विकसित करण्यात आलेल्या सगळ्या लशींचा सुरक्षा विषयक पाहणी अहवाल व्यवस्थित असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
 
लस घेतल्यानंतर ताप येण्याची, डोकेदुखी वा इंजेक्शन घेतलेला हात दुखण्याची शक्यता असते. पण हे साईड इफेक्ट्स सौम्य असतात आणि दोन दिवसांत मावळतात.
 
ण ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनकाची लस घेतलेल्या काहींमध्ये रक्ताच्या वेगळ्या गुठळ्या आढळून आल्या आहेत.
 
ही लस घेणाऱ्या काही लोकांमध्ये 'सेरेब्रल व्हेनस सायनस थ्रॉम्बोसिस' (CVST) म्हणजे मेंदूच्या बाहेरच्या बाजूला रक्ताच्या गुठळ्या आढळून आल्या.
 
जर एखादी लस 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असेल तर तिला परिणामकारक लस म्हटलं जातं.
 
लस घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बारीकसारिक बदलांकडेही लक्ष ठेवावं, असं डॉक्टर्सनी म्हटलंय. काही त्रास होऊ लागल्यास त्वरित डॉक्टरांना विचारावं.
 
लशीचे दुष्परिणाम आहेत का?
लस टोचल्यानंतर माणसाला होणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या वैदयकीय अडचणीला 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन' असं म्हटलं जातं. हा त्रास लशीमुळे होऊ शकतो, लसीकरण प्रक्रियेने होऊ शकतो किंवा अन्य काही कारणाने होऊ शकतो. साधारणत: याचे तीन प्रकार असतात- किरकोळ, गंभीर आणि अतिगंभीर.
 
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी लसीकरणानंतर होणाऱ्या त्रासासंदर्भात सविस्तरपणे सांगितलं.
 
त्यांच्या मते, बहुतांश तक्रारी या किरकोळ स्वरुपाच्या असतात. त्यांना मायनर अॅडव्हर्स इफेक्ट असं म्हटलं जातं. कोणत्याही स्वरुपाचं दुखणं, इंजेक्शन देण्यात आलं त्याठिकाणी सूज, हलका ताप, अंगदुखी, घाबरायला होणं, अलर्जी, अंगावर पुरळ येणं अशा तक्रारी जाणवतात.
 
मात्र काही तक्रारी गंभीर असतात. त्यांना सीव्हिएर केस मानलं जातं. अशा केसेसमध्ये लस घेतल्यानंतर प्रचंड ताप येतो. ऐनफलैलिक्सची तक्रार असू शकते. याही स्थितीत जीवावर बेतेल असे परिणाम नसतात. अशा गंभीर केसेसमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते.
 
मात्र अतिगंभीर केसेसमध्ये लस दिलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशा केसेसना अतिगंभीर मानलं जातं. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो किंवा आजीवन एखाद्या स्वरुपाचा त्रास भोगावा लागू शकतो. अशा स्वरुपाच्या केसेस खूपच मर्यादित प्रमाणात असतात. मात्र अशा केसेसचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर पाहायला मिळतो.
 
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होऊ शकते?
सध्या उपलब्ध असलेल्या लशींपैकी कोणतीही लस संसर्ग पूर्णपणे रोखू शकते का, याविषयीचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.
 
पण याने संसर्गाचा धोका कमी होतो किंवा संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता कमी असू शकते.
 
इंग्लंडमध्ये 40 हजार लोकांवर एक पाहणी करण्यात आली. या लोकांनी फायझर - बायोएनटेकच्या लशीचा एक डोस घेतल्यानंतर संसर्गाचा धोका 70 टक्क्यांनी कमी झाला तर दोन डोस घेतल्यावर हा धोका 85 टक्क्यांनी कमी झाला.
 
भारतात दिली जाणारी कोव्हिशील्ड 90 टक्के परिणामकारक असल्याचं आंतरराष्ट्रीय क्लिनिकल ट्रायल्समध्ये आढळून आलं आहे. तर कोव्हॅक्सिन 81 टक्के प्रभावी आढळलं आहे.
 
रशियाच्या स्पुटनिक-व्ही लशीलाही भारतात परवानगी देण्यात आलेली आहे, ही लस 92 टक्के परिणामकारक आढळून आली आहे.
 
कोणत्याही लशीमुळे संसर्गाचा धोका कमी होतो पण संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं काळजीपूर्वक पालन करणं सुरुच ठेवायला हवं. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, वेळोवेळी हात धुणं या गोष्टी करायलाच हव्यात.
 
लशीचा दुसरा डोस झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो, पण तो अत्यंत सौम्य स्वरुपाचा असतो आणि त्यात हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते.
 
दुसरा डोस गरजेचा असतो कारण अनेक लशी बूस्टर डोस दिल्यानंतरच पूर्ण क्षमतेने काम करतात.
 
MMR (measles, mumps and rubella) लशीचं उदाहरण घ्या. गोवर, गालगुंड यांची लागण होऊ नये म्हणून लहान मुलांना ही लस दिली जाते. या लशीचे दोन डोस असतात.
 
आकडेवारी सांगते की फक्त पहिला डोस घेतलेल्या 40 टक्के मुलांना या तीन विषाणूंपासून संरक्षण मिळत नाही. पण दोन्ही डोस घेतलेल्या लहान मुलांमध्ये फक्त 4 टक्केच मुलांना हा धोका राहतो.
 
यावरून हेदेखील लक्षात येतं की कोणतीच लस शंभर टक्के परिणामकारक नसते. दुसरा डोस घेतल्यानंतर आपण लस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतलेल्या लोकांपेक्षा सुरक्षित असतो. त्यामुळे लशीचे डोस पूर्ण करणं महत्त्वाचं असतं.
 
 
लस काम कशी करते?
एखादा आजार किंवा विषाणू संसर्गाशी कसं लढायचं, हे लस तुमच्या शरीराला शिकवते.
 
एखाद्या आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचे निष्प्रभ वा कमकुवत अंश घेऊन लस तयार केली जाते. यामुळे तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती - इम्यून सिस्टीम या विषाणूला ओळखायला शिकते. आणि याच्याविरुद्ध लढण्यासाठी लागणाऱ्या अँटीबॉडीज - प्रतिपिंड तयार करते.
 
लशीचे साईडइफेक्ट्स वा दुष्परिणाम फार कमी लोकांवर होतात. हलकासा ताप येणं, हात दुखणं ही सामान्य लक्षणं आहेत.
 
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात. पहिल्या डोसनंतर सावकाशपणे अँटीबॉडी तयार होतात. हा शरीराचा प्राथमिक रोगप्रतिकार असतो.
 
पण दुसऱ्या डोसनंतर ज्याला बूस्टर डोस म्हणतात आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक वेगाने काम करते. यावेळी काही दुष्परिणामही पाहायला मिळतात. लस काम करतेय याचंच हे लक्षण आहे.
 
दुसरा डोस वेगळ्या केंद्रावर वा राज्यात घेता येईल का?
तुम्ही लशीचे दोन डोस, दोन वेगवेगळ्या केंद्रांत वा राज्यात घेऊ शकता. पहिला डोस जिथे घेतलाय, तिथेच जाऊन दुसरा डोस घेण्याची सक्ती नाही.
 
फक्त तुम्ही ज्या लशीचा पहिला डोस घेतलाय, त्याच लशीचा दुसरा डोस घ्यायला हवा. त्यामुळे तेच केंद्र निवडा जिथे तुम्ही घेतलेली लस दिली जातेय.
 
एका लशीचा पहिला आणि दुसऱ्या लशीचा दुसरा डोस घेऊन चालेल?
 
हा प्रश्न अनेकांना आहे. उदाहरणादाखल, कोव्हिशील्डचा पहिला आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला तर चालेल का?
 
तर भारतात तसं करता येणार नाही. एकाच लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक आहे.
 
पण युकेमध्ये दोन वेगवेगळ्या लशींचे दोन डोस दिल्याने परिणामकारकतेवर आणि व्यक्तीला मिळणाऱ्या संरक्षणावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी संशोधन सुरू आहे. पण तूर्तास तरी एकाच लशीचे दोन्ही डोस घ्यायला सांगितलं गेलंय.
 
लस घेतल्यानंतर किती काळ संरक्षण मिळतं?
कोव्हिडच्या लशी काही महिन्यांपू्र्वच पूर्णत्वाला गेल्या आहेत, त्यामुळे आत्ताच या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. संशोधन सुरू आहे. सध्याची माहिती असं दाखवते की कोव्हिडचा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडी त्यांना काही काळापर्यंत पुन्हा संसर्ग होण्यापासून संरक्षण देतात, पण हे किती काळ टिकतं याबद्दल ठोस माहिती हातात आलेली नाही.
 
मग लस घेण्याची गरज काय?
भारत सरकारने लसीकरण बंधनकारक केलेलं नाही. लस घेणं किंवा न घेणं हा तुमचा निर्णय आहे. लसीकरणासाठी परवानगी मिळालेल्या लशी संसर्गाचा धोका कमी करतात असं अभ्यासात आढळून आलंय. तसंच लस घेतल्याने तुमच्याद्वारे इतरांना संसर्ग होण्याचीही शक्यता कमी होते.
 
जाता जाता हे परत वाचा आणि लक्षात ठेवा, लशीचा पहिला डोस घेतल्यानंतरही सर्वप्रकारची खबरदारी घेणं गरजेचं आहे. दुसरा डोस घेतल्यानंतरही तुम्ही संसर्गापासून पूर्णपणे सुरक्षित झाला आहात असा समज करून घेऊ नका.