बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (22:52 IST)

कोरोना लस : डेल्टा व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन 65.2% परिणामकारक, भारत बायोटेकचा दावा

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल्सच्या आकडेवारीची विश्लेषण प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं या लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने जाहीर केलंय. डेल्टा व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन 65.2% परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केलाय.
 
SARS - CoV2 च्या B.1.617.2 म्हणजेच डेल्टा व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन लस 65.2% परिणामकारक आढळली असल्याचं भारत बायोटेकने जाहीर केलेल्या 'प्री - प्रिंट डेटा'मध्ये म्हटलंय.
 
याचा अर्थ कंपनीने प्रसिद्ध केलेल्या या संशोधन निष्कर्षांचा आढावा (Peer Review) अजून जगातल्या इतर संशोधकांनी घेतलेला नाही.
 
18 ते 98 वयोगटातल्या 25,800 लोकांवर या चाचण्या घेण्यात आल्या. देशभरात 25 ठिकाणी या चाचण्या घेण्यात आल्या.
 
भारत बायोटेकच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निकाल
 
* असिम्प्टमॅटिक (लक्षणं न दिसणाऱ्या) कोव्हिडपासून 63% संरक्षण.
 
* सिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षण आढळणाऱ्या सौम्य आणि मध्यम संसर्गापासून 78% संरक्षण.
 
* गंभीर कोरोना संसर्ग होण्यापासून आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्यापासून 93% संरक्षण.
 
*B.1.617.2 म्हणजेच डेल्टा व्हेरियंटपासून 65.2% संरक्षण.
 
 
कोव्हॅक्सिन काय आहे?
कोव्हॅक्सिन एक इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे म्हणजे यात मृत कोरोना व्हायरस वापरला आहे. ही लस शरीरात गेली तर कोरोना व्हायरसला संपवू शकते, पण त्याने काही धोका होत नाही.
 
ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. भारत बायोटेकला गेल्या 24 वर्षांचा अनुभव आहे. या काळात त्यांनी 16 लशी बनवल्या आहेत आणि 123 देशांमध्ये निर्यात केल्या आहेत.
 
भारत बायोटेकने ही लस बनवताना भारताच्या राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने अलग केलेल्या कोरोना व्हायरसचं सॅम्पल वापरलं होतं.
 
ही लस दिल्यानंतर शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्ती मेलेल्या कोरोना व्हायरसची रचना ओळखू शकते. याने रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना व्हायरस कसा आहे हे समजतं ज्यायोगे त्याच्याशी लढता येतं.
 
28 दिवसांच्या अंतराने या लशीचे 2 डोस घ्यावे लागतात.