शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (09:50 IST)

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?

जीम रीड
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील मुलांचंही आता लसीकरण केलं जाणार आहे. तरुणांच्या लसीकरणासाठी फायजर लशीची शिफारस करण्यात आलीय.
 
आणखी काही देशांनी तरुणांच्या लसीकरणाला सुरुवातही केलीय.
 
युरोपमध्ये काय स्थिती आहे?
मे महिन्यात युरोपियन मेडिसीन एजन्सी (EMA) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना फायजर लस देण्यास परवानगी दिली. त्यानंतर आतापर्यंत युरोपियन देशांनी आपापल्या पद्धतीनं त्या दिशेनं पावलं उचलली आहेत.
 
डेन्मार्कमध्ये (12 ते 15 वर्षे वयोगट) आणि स्पेनमध्ये (12 ते 19 वर्षे वयोगट) बहुतांश मुलांचं किमान पहिल्या डोसचं लसीकरण पूर्ण होत आलंय.
 
फ्रान्समध्ये 12 ते 17 वर्षे वयोगटातील जवळपास 66 टक्के मुलांना आतापर्यंत लशीचा पहिला डोस देण्यात आलाय, तर 52 टक्के मुलांना दोन्ही डोस देण्यात आलेत.
 
ऑक्टोबरपर्यंत फ्रान्समध्ये 18 वर्षांखालील मुलांनाही 'हेल्थ पास' दिला जाणार आहे. याचा अर्थ फ्रान्समधील 18 वर्षंखालील मुलंही सिनेमा, संग्रहालयं, रेस्टॉरंट आणि शॉपिंगसाठी बाहेर पडू शकतात.
 
मात्र, त्यासाठी हा हेल्थ पास किंवा कोव्हिड निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट सोबत बाळगावा लागेल.
 
जूनमध्ये जर्मनीतल्या सल्लागारांनी शिफारस केली की, केवळ 12 ते 15 वर्षे वयोगटातील आजार नसलेले किंवा लस घेण्यायोग्य असलेल्या मुलांनाच लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतलं पाहिजे. मात्र, ऑगस्टमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या प्रसारानंतर, 12 वर्षांवरील सगळ्यांनाच लस देण्याची सूचना देण्यात आली.
 
स्विडनमध्ये 12 ते 15 वर्षे वयोगटातील फुफ्फुसाचे आजार, अस्थमा किंवा आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक स्थितीत असलेल्या मुलांनाच लस दिली जातेय.
नॉर्वे युरोपियन युनियमध्ये येत नाहीत. मात्र, नॉर्वेतही लसीकरण मोहीम 12 ते 15 वर्षे वयोगटातही राबवली जातेय. मात्र, पहिलाच डोस दिला जात आहे. दुसऱ्या डोसचा द्यायचा की नाही, याचा अद्याप निर्णय झाला नाही.
 
अमेरिकेत लसीकरण अनिवार्य
अमेरिका आणि कॅनडात मे महिन्यात पहिल्यांदा 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी फायजर लशीला मंजुरी दिली. त्यानंतर लगेचच लसीकरणालाही तिथं सुरुवात झाली.
 
जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत 12 ते 17 वर्षे वयोगटातील 42 टक्के मुलांचा पहिला डोस पूर्णही झाला होता आणि 32 टक्के मुलांना दुसरा डोसही देण्यात आला होता. या लसीकरणासाठी फायजर किंवा मॉडर्ना या लशींचा वापर करण्यात आला होता.
 
अमेरिकेत डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वाढायला लागल्यानंतर ही लसीकरण मोहीम सुरू झाली.
 
सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, कमी संख्येत लसीकरण झालेल्या राज्यांमध्ये कोव्हिड झालेल्या मुलांचं हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण 3.4 ते 3.7 पटीनं अधिक आहे.
 
काही पालकांच्या आक्षेपानंतरही अमेरिकेच्या स्कूल बोर्डने 12 वर्षे आणि त्याहून अधिक वर्षांवरील मुलांना शाळेत जाण्यासाठी लशीचा पहिला डोस अनिवार्य केलाय.
लॉस एंजेलिसमध्ये लसीकरण मोहीम अलीकडेच 6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्यात आली होती, तर न्यूयॉर्कच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली, मात्र विद्यार्थ्यांना नाही.
 
फायजर लशीनं 12 वर्षांखालील मुलांना लस देता येईल का, यासाठी सुद्धा चाचण्या घेण्यास सुरुवात केलीय. यात सुरुवातीला घेतलेल्या चाचण्यात 5 ते 11 वर्षे वयोगटाचा समावेश होता आणि त्याचा निकाल याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्येच अपेक्षित आहे. त्यानंतर 6 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लशीची चाचणी केली जाणार आहेत.
 
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आधीच संकेत दिलेत की, आरोग्य नियामकांनी वैद्यकीय आकडेवारी आणि माहितीचा अभ्यास केल्यानंतर तरुणवर्गासाठी लवकरच लस उपलब्ध करून दिली जाईल.
 
चीनमध्ये तीन वर्षांहून अधिक मुलांसाठीच्या लशीला मंजुरी
जून महिन्यात चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील काही मुलांना सिनोव्हॅक (Sinovac) लस देण्याची परवानगी दिली. या वयोगटातील मुलांना लस देणारा चीन पहिलाच देश आहे.
 
चीननं या वर्षअखेरपर्यंत देशातील 140 कोटी लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलंय. 18 वर्षांखालील व्यक्तींचं लसीकरण केल्याशिवाय हा आकडा चीनला पार करता येणार नाही.
 
असं म्हटलं जातयं की, चीनमध्ये कोव्हिडवरील लस ऐच्छिक आहे. मात्र, काही स्थानिक सरकारांच्या मते, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातले सगळ्या सदस्यांनी दोन्ही डोस घेतले असतील तरच त्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाईल.
 
आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतल्या बऱ्याच देशांमध्ये सिनोव्हॅक लशीचा वापर केला जातोय.
 
सिनोव्हॅक लस बनवणाऱ्या कंपनीनं दक्षिण आफ्रिकेत सहा ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देता येईल का, यासाठी चाचण्या सुरू केल्या असतानाच, चिले या देशानं 6 वर्षांवरील मुलांना लस देण्यास सुरुवातही केली आहे.
 
भारतात 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला प्राधान्य
भारत जगातील सर्वाधिक किशोरवयीन मुलांची लोकसंख्या असलेला देश मानला जातो. यूनिसेफच्या आकडेवारीनुसार ही संख्या 25 कोटी 30 लाखांच्या जवळपास आहे.
नॅशनल सिरोलॉजिकल सर्व्हेच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या साथीला सुरुवात झाल्यापासून 60 टक्के मुलं कोरोना विषाणूच्या संपर्कात आली. तसंच, तरुण मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यची शक्यताही वर्तवण्यात आलीय.
 
ऑगस्टमध्ये भारतात झायडस कॅडिला लशीला परवानगी देण्यात आली. ही लस 12 वर्षांवरील मुलांनाही देता येणार आहे. तसंच, झायडस कॅडिलाचे तीन डोस असून, इंजेक्शन न देता देता येईल.
 
ऑक्टोबर महिन्यापासून भारतात 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होईल, असं भारत सरकारच्या आरोग्य सल्लागारांनी सांगितलंय. मात्र, या मोहिमेचं रुपांतर व्यापक प्रमाणात व्हायला अजून अवधी जाईल. कारण 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरणच अजून बाकी आहे. वर्षअखेरपर्यंत ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.