रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (08:44 IST)

शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करा, आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन जून-जुलै २०२० पासून सुरू होणारे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षेतून विद्यार्थ्यांचे फक्त १० टक्केच मूल्यांकन होते. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याऐवजी त्यांना उतीर्ण करण्यात यावे असेही ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
 
राज्यातील सर्व नागरिक आपल्या नेतृत्वाखाली कोरोनाचा सामना करत आहे. भारताकडून कोरोनाला चांगला प्रतिकार करण्यात येत असून, नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या देशातील विद्यार्थ्यांच्या स्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो देशातील वाढत्या कोरोनामुळे अद्यापही अनेक नागरिक घरातूनच काम करत आहेत. अशातच देशातील अनेक विद्यापीठांकडून व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त असून, रेड झोनमध्ये अद्यापही वाहतुकीवर निर्बंध आहेत. अशामध्ये प्रत्यक्षात परीक्षा घेणे शक्य नाही. जगातील अनेक देशांमध्ये शाळा व कॉलेज सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपल्याकडील बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरात त्यांचे आजी आजोबा राहत असल्याने विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फारच घातक आहे. त्यामुळे फक्त विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी असे अनेकजणांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किंवा ऑनलाईन घेण्यात येणार्‍या देशातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.